संस्कार आणि संस्कृतीचे प्रतीक असलेला हा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा -- प्रविण तरडेप्रेस मीडिया लाईव्ह :

उभं आयुष्य संस्कार,नितीमूल्य आणि संस्कृती जोपासणा-या यशवंतराव चव्हाण यांच्या नावाचा हा पुरस्कार जबाबदारी वाढविणारा असल्याची भावना सुप्रसिद्ध दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे यांनी आज येथे व्यक्त केली.

स्व. प्रकाश ढेरे चॅरिटेबल ट्रस्ट व गंगालाॅज मित्र मंडळ यांच्या वतीने महाराष्ट्राचे साहित्यप्रेमी, व पहिले मुख्यमंत्री ,लोकनेते स्व.यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त प्रख्यात दिग्दर्शक व अभिनेते प्रविण तरडे यांना कै. प्रकाश ढेरे स्मृतिप्रित्यर्थ ‘कला जीवन गौरव पुरस्कार’ आज प्रदान करण्यात आला. रोख  २५,हजार रुपये व मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते. माईर्स एम. आय.टी.चे संस्थापक व महासंचालक डॉ .विश्वनाथ कराड यांच्या शुभहस्ते त्यांचा सन्मान करण्यात आला. येथील  टिळक स्मारक मंदिरात झालेल्या या कार्यक्रमाला जागतिक मराठी अकादमीचे अध्यक्ष रामदास फुटाणे,माजी आमदार उल्हासदादा पवार, सुप्रसिद्ध हास्यकवी अशोक नायगावकर, ट्रस्टचे विश्वस्त विजय ढेरे आदी यावेळी उपस्थित होते. 

या प्रसंगी राज्याच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या प्रख्यात कवींचे कवी संमेलन व अन्य पुरस्कारांचे वितरण देखील करण्यात आले .

तरडे यांनी यावेळी, २५ वर्षांपूर्वी एकांकिका स्पर्धेत नंबर आल्यानंतर याच पुण्यात माझा  झालेला हा सत्कार आणि आजचे हेच प्रमुख  पाहुणे तेव्हा उपस्थित होते आणि आजही तेच उपस्थित आहेत ही संयोग व अभिमान वाटणारी बाब आहे असल्याचे त्यांनी म्हटले.

डॉ कराड यांनी , कविता करणे ही एक प्रकारची साधना असून कवीच्या मुखातून ईश्वर दर्शन होते हा सिध्दांत असल्याचं आपल्या भाषणात नमूद केले.

यावेळी संपन्न झालेल्या कवी संमेलनात वर्जेश सोलंकी (वसई),आबा पाटील (जत), नितीन देशमुख(चांदूरबाजार-अमरावती), हर्षदा सुंठणकर (बेळगाव), किरण येले(मुंबई), प्रभाकर साळेगावकर(माजलगाव), अबीद शेख(पुसद), गजानन मते(परतवाडा), मगोपाळ मापारी(बुलढाणा) यांनी सहभाग घेतला.  जेष्ठ कवी रामदास फुटाणे व अशोक नायगावकर यांनी याचे सूत्रसंचालन केले.

या प्रसंगी चार नामवंत कवींचा प्रत्येकी अकरा हजार रुपये व स्मृतीचिन्ह असा साहित्य पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. 

त्यामध्ये ’वेरवीखेर' या काव्यसंग्रहाचे कवी वर्जेश सोलंकी (वसई) यांना  कै.शिवाजीराव ढेरे स्मृती पुरस्कार, ‘घामाची ओल धरून’ या काव्यसंग्रहाचे कवी आबा पाटील यांना कै.बाबासाहेब जाधव स्मृती पुरस्कार . ‘प्रश्न टांगले आभाळाला’ या काव्यसंग्रहाचे कवी नितीन देशमुख(चांदूरबाजार-अमरावती) यांना कै.धनाजी जाधव स्मृती पुरस्कार, आणि ‘कपडे वाळत घालणारी बाई’ या काव्यसंग्रहाच्या कवयित्री हर्षदा सुंठणकर(बेळगाव) यांना कै.सुगंधाताई ढेरे स्मृती पुरस्कार, देऊन गौरविण्यात आले.


 Post a Comment

Previous Post Next Post