म्हाडाच्या ५९१५ घरांसाठीच्या सोडतीचा निकालपुढे ढकलण्यात आला

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणाच्या (म्हाडा) पुणे मंडळाने जानेवारी महिन्यात ५९१५ सदनिकांसाठी सोडत काढली होती. या सोडतीचा निकाल प्रणालीमधील तांत्रिक अडथळ्यांमुळे पुढील आठ दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतरच सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून निकालाच्या प्रतीक्षेत असलेल्या अर्जदारांना आणखी काही दिवस वाट पाहावी लागणार आहे.

म्हाडा पुणे मंडळाकडून यंदा प्रथमच इंटिग्रेटेड हाउसिंग लॉटरी मॅनेजमेंट सिस्टिम (आयएचएलएमएस) २.० या नूतन प्रणालीद्वारे पुणे आणि चिंचवड महापालिका क्षेत्रात ५९१६ सदनिकांसाठी सोडत काढण्यात आली. त्यासाठी अर्जदारांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात आले आहेत. या लॉटरीसाठी ३१ हजार ६०० अर्जदारांनी घरासाठी आवश्यक कागदपत्रे जोडली असून या कागदपत्रांची छाननी होऊन संबंधितांनी पैसे भरले आहेत. त्यानुसार या लॉटरीची सोडत चालू आठवड्याच्या सुरुवातीला जाहीर होणार होती. मात्र, संगणकप्रणालीतील तांत्रिक अडचणींमुळे ही सोडत जाहीर करण्यास आणखी काही कालावधी लागणार असल्याचे म्हाडाकडून सांगण्यात आले.

दरम्यान, आयएचएलएमएस २.० या ऑनलाइन प्रणालीचा अर्जदारांना पहिल्या दिवसापासून फटका बसला. त्याचा परिणाम म्हाडाच्या अर्जांवर देखील झाला आहे. त्यातच आता सोडत जाहीर करताना देखील अडचणी निर्माण झाल्या आहेत. प्रणालीमध्ये तात्रिक बिघाड निर्माण झाल्याने मंगळवारी (७ मार्च) निकाल जाहीर होणार होता. मात्र, तो रद्द कऱण्यात आला आहे. तांत्रिक अडथळे दूर करण्याचे काम सुरू असून सोडत जाहीर करण्याबाबत नियोजन सुरु आहे. या कामासाठी आठ दिवसांचा कालावधी लागणार आहे. राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन मुंबई येथे सुरू असून अधिवेश संपल्यानंतर सोडतीचा निकाल जाहीर होण्याची शक्यता आहे, असे म्हाडाकडून सांगण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post