मुसळधार पावसाने रस्त्यांवर पाणी साचल्याने महापालिकेच्या कामातील त्रुटी तसेच कामाचा दर्जा पावसाच्या पाण्यात उघड



प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे -शहरातील मध्यवस्तीतील पेठांसह कात्रज, धायरी, कोथरूड, वारजे, सिंहगड रोड, बिबवेवाडी, मार्केट यार्ड परीसराला गुरूवारी सायंकाळी  मेघगर्जनेसह मुसळधार पावसाने झोडपले. वाहनचालकांना हेडलाइट लावून वाहने चालवावी लागली. शहरातील उकाडा गेल्या दोन-चार दिवसांपासूनच वाढला होता. दुपारनंतर उकाडा वाढत पावसाळी स्थिती निर्माण झाली. रेनकोट, छत्री नसल्याने अनेकांना पावसात भिजावे लागले. यामुळे आता उन्हाळ्यामध्ये देखील रेनकोट व छत्री ठेवण्याची वेळ आली आहे काय, अशी मिश्‍कील चर्चा नागरिक करीत होते. शहर तसेच उपनगरांतील रस्त्यांवर पाणी साचल्याने महापालिकेच्या कामातील त्रुटी तसेच कामाचा दर्जा पावसाच्या पाण्यात उघड झाला.

शहरात सलग दुसऱ्या दिवसी अवकाळी पावसाने हजेरी लावली. दुपारपासूनच शहरात ढगाळ वातावरण होते. सायंकाळी 04:00 ते 05:00 या एका तास झालेल्या पावसांत नागरिकांची तारांबळ उडाली. सायंकाळी 06:00 वाजेपर्यंत शिवाजीनगर केंद्रात तीन मिली मीटर पावसाची नोंद झाली. लवासा केंद्रात सर्वाधिक 35 मिली मीटर पावसाची नोंद झाली आहे. पुढील दोन दिवस शहरांत हलक्‍या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

राज्यातील बहुतांशी भागाला गेल्या काही दिवसांपासून अवकाळी पावसाने झोडपले आहे. उत्तर आणि मध्य महाराष्ट्रातील काही जिह्यात गारपीट झाली आहे. याचा फटका नगदी पिकांना बसला आहे. आंबा, केळी, द्राक्षे आदि फळांचे नुकसान झाले आहे. दक्षिण पश्‍चिम राजस्थान आणि कच्छ भागात चक्रीवादळ सदृश्‍य परिस्थिती निर्माण झाली आहे. तसेच, बंगालच्या उपसागरातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे मध्य भारतात विशेषत: महाराष्ट्रावर पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे कोकण आणि परिसरात 18 मार्चपर्यंत यलो अलर्ट दिलेला आहे. मध्य महाराष्ट्रात 20 मार्चपर्यंत सोसाट्याचा वारा आणि मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडणार आहे. 20 मार्चनंतर राज्यातील पावसाची स्थिती कमी होईल तर त्यानंतर तापमान वाढण्याची शक्‍यता पुणे हवामान विभागाचे प्रमुख अनुपम कश्‍यपी यांनी वर्तविला.

बिबवेवाडी :दिवसा उकाडा वाढलेला असताना संध्याकाळी अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्व रस्ते तुडूंब भरले. पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. सलग दोन दिवस होत असलेल्या पावसामुळे मार्केट यार्डात येणाऱ्या शेतकऱ्यांची ताराबंळ झाली. मार्केट यार्ड परिसरात पावसामुळे बऱ्याच भाज्या व फळे खराब झाली. पीकांना अवकाळी पावसाचा फटका बसत असताना मार्केट यार्डात आणलेला काही शेतकऱ्यांचा तयार मालही भिजल्याने खराब झाला, प्रतिवारी कमी झाल्याने भाव कमी मिळाल्याने शेतकऱ्यांनी मोठी नाराजी व्यक्‍त केली.

कोथरूड :कोथरूड, बावधन, वारजे परिसरातील नागरिकांची धांदल उडाली. पौड रस्त्यावरील कचरा डेपो येथील रस्ता पाण्याखाली गेला होता. कोथरूड डेपो चौक, नळस्टॉप, वारजे उड्डाणपूल, कर्वेनगर, कोकण एक्‍स्प्रेस चौकासह विविध ठिकाणी पाणी साचले होते. कचऱ्याच्या गाडीतून पडत असलेले दूषीत पाणी आणि कचरा यामुळे कचरा डेपो येथील मुख्य रस्ता अस्वच्छ आणि निसरडा झाल्याने बॅरिकेट लावून अर्धा तास बंद केला होता. यामुळे वाहतूक कोंडी झाली. मेट्रोचे पिलर आणि दुभाजकामुळे रस्त्यावरील पाणी जाण्यासाठी अडथळा निर्माण झाला. पाणी वाहून जाण्यासाठी कोणतीही ठोस उपाययोजना नसल्याचे उघड झाले. कोथरूड डेपो चौकासह नळस्टॉप चौक, जयभवानीनगर, कर्वे पुतळा चौक, कोकण एक्‍स्प्रेस आणि वारजे परिसरातही ठिकाठिकाणी पाणी साचले होते.

Post a Comment

Previous Post Next Post