राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या निवासस्थानी ईडीचे अधिकारी पुन्हा दाखल

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री हसन मुश्रीफ यांच्या कागलच्या  निवासस्थानी ईडीचे अधिकारी पुन्हा दाखल झाले आहेत.सलग तिसऱ्यांदा ईडीकडून ही छापेमारी सुरु आहे. पाच गाड्यांमधून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी दाखल झाले आहेत. सकाळी सात वाजल्यापासून ईडीचे अधिकारी मुश्रीफांच्या घरी आहेत.

दरम्यान, हसन मुश्रीफांच्या घरासमोर समर्थकांनी मोठी गर्दी केली आहे. मुश्रीफांच्या समर्थनार्थ सगळे कार्यकर्ते घराबाहेर जमा झाले आहेत. जनतेसाठी राबणाऱ्या माणसाला त्रास दिला जात असल्याच्या भावना समर्थकांनी व्यक्त केल्या आहेत. मुश्रीफ घरात नसताना ईडीच्या अधिकाऱ्यांनी घरावर छापेमारी सुरु केली आहे. त्यामुळं कार्यकर्ते संतप्त झाले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार हसन मुश्रीफ दोन महिन्यात तिसऱ्यांदा ईडीच्या रडारवर आले आहेत. साखर कारखान्याशी संबंधित ईडीकडून कोल्हापूर आणि पुण्यात सर्च ऑपरेशन सुरु असल्याचे वृत्त एएनआय वृत्तसंस्थेने दिलं होतं. सरसेनापती संताजी घोरपडे कारखान्याच्या कथित 40 कोटींच्या गैरव्यवहार प्रकरणी हसन मुश्रीफांची ईडीकडून चौकशी सुरु आहे. त्याच अनुषंगाने कोल्हापूर जिल्हा बँकेतील काही खात्यांचाही तपास करण्यात येत असल्याची माहिती समोर येत आहे.

आमदार हसन मुश्रीफ यांचे कनिष्ठ बंधू अनवर मुश्रीफ यांच्या घरी ही अधिकाऱ्यांनी जाऊन चौकशी सुरू केली आहे. मुश्रीफ यांच्या निवासस्थानी त्यांचे दोन पुत्र आहेत, तर आमदार हसन मुश्रीफ हे निवासस्थानी नसल्याचे समजते. कार्यकर्त्यांच्या भावना तीव्र असून, कारवाईसाठी आलेल्‍या अधिकाऱ्यांचा कार्यकर्त्यांकडून निषेध केला जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post