पंतप्रधान घरकुल योजनेच्या टेंडर मध्ये घोटाळा ईडी कडून शहरात 9 ठिकाणी छापेमारी
पंतप्रधान घरकुल योजनेच्या टेंडर मध्ये झालेल्या घोटाळा प्रकरणात ईडीने शहरात 9 ठिकाणी छापेमारी केली असून यात काही बिल्डरांसह महापालिकेतून ईडीने या घोटाळ्याशी संबंधित कागदपत्रे ताब्यात घेतली आहेत. मनपा सह ६ नगर परिषदा, नगरपंचायतच्या निविदा रिंग करण्याच्या हेतूने एकाच आयपी अ‍ॅड्रेसवरून भरण्यात आल्याच्या तक्रारीवरून ही कारवाई करण्यात आली. दरम्यान, या प्रकरणात आणखी काही बिल्डर तसेच महापालिकेच्या अधिकार्‍यांची झाडाझडती होणार असल्याने खळबळ उडाली आहे.

छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पडेगाव, सुंदरवाडी, तीसगाव, चिकलठाणा आणि हर्सूल येथे 127 हेक्टरवर पंतप्रधान घरकुल योजना प्रस्तावित करण्यात आली असून, 40 हजार सदनिका बांधण्यात येणार आहेत. या सदनिकांच्या बांधकामासाठी 4 हजार 600 कोटी रुपयांची निविदाही काढण्यात आली. परंतु, घरकुल बांधणीसाठी योग्य जागा नसतानाही योजना उभारण्याचा आटापिटा करण्यात आला. समरथ कन्स्ट्रक्शनला हे काम देण्यात आले. परंतु, प्रकल्प उभारणीसाठी योग्य जागा नसताना आणि त्या जागेवर 39 हजार घरे बांधण्याचे नियोजन करण्यात आल्याचा आक्षेप घेत स्थानिक लोकप्रतिनिधींनी याविषयी तक्रार केली. ई-निविदा प्रक्रियेतील अटींचा भंग करून सुमारे 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय आल्यामुळे पंतप्रधान कार्यालयाने हे प्रकरण ईडीकडे सोपविले होते.

स्थानिक लोकप्रतिनिधींनी केलेल्या तक्रारीवरून शुक्रवारी सकाळीच ईडीचे पथक छत्रपती संभाजीनगरात धडकले. पानदरिबा भागातील नाज गल्लीत असलेले समरथ कन्स्ट्रक्शन्सचे अमर बाफना यांचा बंगला, जवाहरनगर पोलीस ठाण्याजवळील कार्यालय, समर्थनगरमधील बाफना यांचे नातलग, आकाशवाणीसमोरील अहिंसानगरातील डॉ. सतीश रुणवाल यांच्या घरासह 9 ठिकाणी एकाच वेळी ईडीच्या अधिकार्‍यांनी छापा मारला. यावेळी ईडीच्या अधिकार्‍यांना स्थानिक पोलिसांचा बंदोबस्त देण्यात आला होता. ईडीच्या अधिकार्‍यांनी दिवसभर चौकशी करून अनेक कागदपत्रे ताब्यात घेतली.

पंतप्रधान घरकुल घोटाळ्यात मनपाच्या तक्रारीवरून समरथ कन्स्ट्रक्शन, समरथ मल्टीबीज इंडिया प्रा.लि. चे संचालक अमर अशोक बाफना, पूजा अमर बाफना, मे. सिद्धार्थ प्रॉपर्टीजचे नीलेश वसंत शेंडे, अभिजित वसंत शेंडे, योगेश रमेश शेंडे, स्वप्निल शशिकांत शेंडे, नवनिर्माण महिला बहुउद्देशीय संस्थेचे प्राधिकृत प्रतिनिधी हरीश मोहनलाल माहेश्वरी, सुंदर कन्स्ट्रक्शनचे सतीश भागचंद रुणवाल, इंडो ग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस तसेच इंडो ग्लोबल इन्प्रâास्ट्रक्चर सर्व्हिसेसचे रितेश राजेंद्र कांकरिया, हितेश मनसुख कर्नावट, अभिनव रेनबो डेव्हलपर्स प्रमोटर्सचे भागीदार श्यामकांत जे. वाणी, सुनील पी. नहार, हरिओम नवोदय बहुउद्देशीय संस्थेचे प्राधिकृत प्रतिनिधी प्रवीण भट्टड, इस्सर टॉवर्स, जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस तसेच जग्वार ग्लोबल सर्व्हिसेसचे भागीदार सुनील मिश्रीलाल, आनंद फुलचंद नहार, न्याती इंजिनीअर्स कन्सल्टंट प्रा.लि. संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती, गुंजल अ‍ॅण्ड असोसिएट्सचे प्राधिकृत प्रतिनिधी मनोज अर्जुन गुंजल यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post