कसबा विधानसभा पोटनिवडणुक : राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार यांची पुण्यात बैठकप्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसने निवडणूक लढविण्याची भूमिका घेतली असली तरी, निवडणूकीबाबतची भूमिका ठरविण्यासाठी राष्ट्रवादीचे काँग्रेसचे नेते अजित पवार आज पुण्यात सकाळी 11 वाजता गोखले नगर येथील बारामती हॉस्टेल येथे ही बैठक घेणार आहेत अशी माहिती  राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी दिली.

दरम्यान, महाविकास आघाडी ही निवडणूक लढविणार असल्याचे अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे. तसेच आघाडीत ही जागा कॉंग्रेसकडे असल्याचेही राष्ट्रवादी कबूल करते मात्र, या निवडणुकीसाठी कॉंग्रेसकडून राष्ट्रवादी आणि शिवसेनेला (ठाकरे गट) काहीच प्रतिसाद दिला जात नाही. त्यामुळे ठाकरे गट आणि राष्ट्रवादीनेही निवडणूक लढविण्याची घोषणा केली आहे. मात्र, दोन्ही पक्षांकडून अधिकृतपणे अद्याप काहीच सांगण्यात येत नव्हते. मात्र, आता अजित पवार स्वत: बैठक घेणार असल्याने राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट होणार आहे.

कसबा विधानसभा मतदारसंघाच्या आमदार मुक्‍ता टिळक यांच्या निधनाने रिक्त झालेल्या या जागेवर 26 फेब्रुवारीला पोट निवडणूक होणार आहे. तर अर्ज भरण्यासाठी दि. 7 फेब्रुवारी ही अंतीम मुदत आहे. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत युती मध्ये ही जागा भाजपकडे तर आघाडीत कॉंग्रेसकडे होती. तर शिवसेनेचा उमेदवार बंडखोरी करत अपक्ष म्हणून उभा राहिला होता. त्यामुळे, निवडणूक जाहीर होताच कॉंग्रेसने या जागेवर दावा केला असून त्यांच्याकडून 16 जण इच्छूक आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर शिवसेना (ठाकरे गट) आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसने ही जागा कॉंग्रेसची असल्याने महाविकास आघाडीचा धर्म पाळणार असल्याचे सांगितले होते.

मात्र, निवडणूक झाल्यानंतर आतापर्यंत स्थानिक पातळीवर अथवा राज्याच्या पातळीवर महाविकास आघाडीची बैठकच झालेली नाही. त्यामुळे कॉंग्रेस विश्‍वासात घेत नसल्याने तसेच कसबा विधानसभा आधी राष्ट्रवादीकडे असल्याने शहर राष्ट्रवादीने कसब्यात उमेदवार देणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, अंतिम निर्णय पक्ष श्रेष्ठीच घेणार आहेत. त्यामुळे अर्ज भरण्यासाठी अवघे 5 दिवस शिल्लक असल्याने राष्ट्रवादीचे नेते पवार हे बैठक घेणार असून त्यात पक्षाची भूमिका निश्‍चित होणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post