शाहीर संजय जाधव यांचा इचलकरंजी नगरीच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार

 सत्कार समारंभानंतर शाहीर संजय जाधव हे 'रंग शाहिरीचे'हा कार्यक्रमही सादर करणार 


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.२४ इचलकरंजीच्या शाहिरी परंपरेमध्ये शाहीर संजय जाधव हे अतिशय सक्रिय असलेले आणि महाराष्ट्रभर ज्ञात असलेले एक महत्वाचे नाव आहे. बालशाहीर म्हणून शाहिरीत आपली स्वतःची ओळख निर्माण करणाऱ्या शाहीर संजय जाधव यांच्या शाहिरी कारकीर्दीला चाळीस वर्षे आणि वयाची एकावन्न वर्षे पूर्ण झाल्याबद्दल इचलकरंजी नगरीच्या वतीने त्यांचा जाहीर नागरी सत्कार रविवार ता. २६ फेब्रुवारी २०२३ रोजी सायं. ४ वाजता इचलकरंजीच्या श्रीमंत घोरपडे नाट्यमंदिरा मध्ये आयोजित केला आहे. ज्येष्ठ नेते माजी खासदार सहकार महर्षी मा.कलाप्पाण्णा आवाडे यांच्या अध्यक्षतेखाली आणि ज्येष्ठ विचारवंत साहित्यिक प्रा. डॉ.बाबुराव गुरव यांच्या हस्ते आणि इचलकरंजीतील सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक क्षेत्रातील सर्व मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत हा नागरी सत्कार होणार आहे .

मानपत्र, शाल व श्रीफळ असे या सत्काराचे स्वरूप आहे.या सत्कार समारंभानंतर शाहीर संजय जाधव हे 'रंग शाहिरीचे'हा कार्यक्रमही सादर करणार आहेत.अशी माहिती शाहीर संजय जाधव नागरी सत्कार सोहळा समितीचे अध्यक्ष शाहीर विजय जगताप ,कार्याध्यक्ष प्रसाद कुलकर्णी आणि  सचिव किरण माळी आणि समिती सदस्य अहमद मुजावर,अभिजित पटवा पत्रकार परिषदेत दिली.

शाहीर संजय जाधव हे प्राथमिक शाळेत असल्यापासून शाहिरी क्षेत्रात कार्यरत आहेत. राजकीय,सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रबोधनासाठी त्यांनी आपली शाहिरीकला उपयोगात आणलेली आहे.राज्य व केंद्र सरकारच्या अनेक सांस्कृतिक कार्यक्रमात यांचा सक्रिय सहभाग राहिलेला आहे. तसेच साहित्य दरबार, हास्यरंग,धुमशान यासारख्या वाहिन्यांवरील कार्यक्रमातही त्यांचा सहभाग राहिलेला आहे. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्यावर निघालेल्या चित्रपटातील शाहीर संजय जाधव यांनी गाण्यांमध्ये आपला सहभाग नोंदवलेला आहे. वस्त्रनगरी इचलकरंजीची विविधरंगी असलेली ओळख शाहिरीच्या क्षेत्रातूनही त्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर पोहोचवण्याचे काम केले आहे. अशा या मनस्वी कलाकाराचा व सामाजिक भान असणाऱ्या  कार्यकर्त्याचा नागरी सत्कार झाला पाहिजे या भूमिकेतून हा कार्यक्रम आयोजित केला आहे.त्याला उपस्थित राहून  नागरिक बंधू भगिनींनी प्रतिसाद द्यावा असेही आवाहन पत्रकार परिषदेत करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post