फॅसीझम काल्पनिक शत्रू निर्माण करत असतो प्राचार्य आनंद मेणसे यांचे प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता. १४ भांडवलशाहीशी जोडून घेणे, कार्पोरेटशी मैत्री करणे, सामाजिक विविधता नाकारून तिचे सरसकट सपाटीकरण करणे, गतइतिहासामध्ये रमणे आणि अस्तित्वात नसलेले शत्रू निर्माण करून त्या शत्रूला नेस्तनाबूत केल्याशिवाय गतवैभव प्राप्त होणार नाही असे सतत लोकांच्या मनावर बिंबवण्याचा  प्रयत्न करणे. आणि  तो प्रयत्न यशस्वी करण्यासाठी त्या पद्धतीचे कार्यकर्ते तयार करायचे व संघटन उभे करायचे हे फॅसिझमचे वैशिष्ट्य असते, असे मत ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे सदस्य प्राचार्य आनंद मेणसे( बेळगाव )यांनी व्यक्त केले.ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या पंच्याणव्या जन्मदिनानिमित्त आयोजित व्याख्यानात ' फॅसीझमचे स्वरूप ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी प्रबोधिनीचे अध्यक्ष प्रा.अशोक चौसाळकर होते. प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी स्वागत व प्रास्ताविक केले.

प्राचार्य आनंद मेणसे ,म्हणाले जागतिक मंदीतून फॅसिझमची निर्मिती झाली. आपला लोकशाहीवर विश्वास आहे असे फॅसीझम सतत दाखवण्याचा व ते लोकांवर बिंबवण्याचा प्रयत्न करत असतो. हिटलरच्या पक्षाचे नाव ' नॅशनल सोशालिस्ट वर्कर पार्टी 'असे होते. पण त्याच्या पक्षाचे नाव आणि त्याची भूमिका यांच्यात प्रचंड अंतर होते. तर मुसोलिनीने आपल्या पक्षाला 'नॅशनल फॅसिस्ट पार्टी ' असे नाव दिले होते. त्यांने शास्त्रशुद्ध फॅसिझम मांडला. कम्युनिस्ट, समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि व्यापक विचारधारा असलेल्या सर्वांनाच फॅसिस्टांचा विरोध असतो. ते विस्तारवादाचे समर्थक असतात. हिंसेचे जाहीर समर्थन करतात. लोकांच्या जीवनात मोकळेपणा आणण्याऐवजी समाजाचे लष्करीकरण करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. शिक्षण, आरोग्य यापेक्षा लष्करी साहित्यावर ते जास्त खर्च करत असतात. उपेक्षिताला अधिक उपेक्षित करणे हे त्यांचे धोरण असते आणि फॅसिस्ट नेहमीच अतिशय व्यवस्थितपणे खोटे बोलत असतात. हा जगभरचा इतिहास आहे. म्हणूनच जगाच्या इतिहासात फॅसिझमची चाहूल लागताच अँटी फॅसिस्ट आघाडी उघडण्याचे राजकारण महत्त्वाचे ठरत आले आहे. प्राचार्य मेणसे यांनी त्यांच्या भाषणात या विषयाचे अनेक पैलू सूत्रबद्ध पद्धतीने मांडले.प्रा.डॉ. अशोक चौसाळकर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील यांनी आभार मानले. या व्याख्यानास समाजवादी प्रबोधिनीच्या विविध शाखांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post