श्रीमंतांना रिबेट आणि मध्यमवर्गीयांना डिबेट देणारा हा अर्थसंकल्प

प्रबोधिनीच्या परिसंवादात प्रा.ककडे यांचे मत


प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.८ अमृत काळातील पहिले बजेट असे विशेषण लावत अर्थसंकल्प सादर करत असताना अमृताची खरी गरज कोणाला आहे याच्याकडे मात्र पूर्णतः दुर्लक्ष झालेले आहे. ऑक्सफॅम च्या अहवाला पासून इतर सर्वांनी वाढती विषमता दाखवलेली आहे. त्यावर चर्चा किंवा कोणतीही उपाययोजना हा अर्थसंकल्प करत नाही. भांडवल गुंतवणूक कुठून होणार ?निर्गुंतवणूक किती करणार? याचीही योग्य चर्चा केली जात नाही.या अर्थसंकल्पात जे सांगितलं जात आहे त्यापेक्षा जास्त लपवलं गेलं आहे .लोकशाहीत केवळ मताधिकाराचा नव्हे तर जगण्याच्या अधिकाराची किमान हमी अपेक्षित असते. गरिबांना मोफत अन्नधान्याचे गाजर ,श्रीमंतांना रिबेट आणि मध्यमवर्गीयांना डिबेट देणारा हा अर्थसंकल्प आहे. असे मत जेष्ठ अर्थतज्ञ प्रा.डॉ. व्ही.बी.ककडे यांनी व्यक्त केले.

ते समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने आयोजित 'केंद्रीय अर्थसंकल्प २०२३-२४ ' या विषयावरील जाहीर परिसंवादात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते. कर सल्लागार सुनील नागावकर आणि गुंतवणूक मार्गदर्शक अनिल पाटील हे सहवक्ते होते. अध्यक्षस्थानी प्राचार्या.डॉ. त्रिशला कदम होत्या. समाजवादी प्रबोधिनीच्या केंद्रीय अर्थसंकल्प व्याख्यानमालेचे हे ४५ वे वर्ष होते. गेल्या ४५ वर्षाच्या अर्थसंकल्प व्याख्यानमालेच्या नियोजनात, मांडणीत आणि एकूणच प्रबोधिनीच्या कामात सक्रिय स्वरूपाची मौलिक भागीदारी केलेले प्रबोधिनीचे अध्यक्ष ज्येष्ठ अर्थतज्ञ कालवश प्रा.डॉ.जे.एफ.पाटील यांच्या प्रतिमेला त्यांच्या दुसऱ्या मासिक स्मृतिदिनानिमित्त पुष्पहार अर्पण करण्यात आला. जयकुमार कोले व तुकाराम अपराध यांनी पाहुण्यांचे ग्रंथभेट देऊन स्वागत केले.प्रसाद कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले.


                      प्रा.डॉ. ककडे म्हणाले,अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकास, शेवटच्या स्तरापर्यंत पोहोचणे, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूक, क्षमतेचा पुरेपूर उपयोग करणे, हरित वृद्धी, युवाशक्ती, पर्यटन आणि आर्थिक क्षेत्र हे सात प्राधान्यक्रम असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटले आहे. मात्र या प्राधान्यक्रमांच्या उद्दिष्ट पूर्तीसाठीच्या सुयोग्य तरतुदी या अर्थसंकल्पात दिसत नाही. परावलंबन शून्यावर आल्याशिवाय महासत्ता आकाराला येत नसते. विकासाच्या क्षमता प्रचंड असल्या तरी त्याचा सुयोग्य पद्धतीने वापर करावा लागतो. रोजगार वृद्धी आणि महागाई कमी करण्याची उपाय योजना या अर्थसंकल्पात दिसत नाही. अर्थसंकल्पाचे एकूण वरवरचे स्वरूप हे गुलाबी चित्र दाखवते.मात्र त्यात करण्यात आलेल्या तरतुदी जुजबी स्वरूपाच्या आहेत.निवडणुकपूर्व असा हा पूर्ण अर्थसंकल्प असल्याने काही सवलतींचे गाजर दाखविले आहे. ऐंशी कोटी जनतेला मोफत अन्नधान्य देण्याचा दावा करणारा हा अर्थसंकल्प जो हे अन्नधान्य पिकवतो त्या शेतकऱ्यांसाठी फारसे काही करताना दिसत नाही. प्राध्यापक डॉक्टर काकडे यांनी या अर्थसंकल्पातील सर्व तरतुदी आणि त्याचे महत्त्व याचे सविस्तर विवेचन केले.


                गुंतवणूक मार्गदर्शक अनिल पाटील यांनी  ' गुंतवणूक संधी ' याबाबत बोलतांना म्हणाले, भांडवली बाजारात म्हणजे सेन्सेक्स आणि निफ्टी यामध्ये तिप्पट वाढ झाल्याने गुंतवणुकीच्या संधी निर्माण झालेल्या आहेत. उत्तम रस्ते ,वाढती निर्यात यासारख्या बाबीतून भारत निश्चितच आर्थिक दृष्ट्या सक्षम होऊ शकते. कुटुंब समृद्ध झाले तरच ते समृद्ध होऊ शकतो. अर्थव्यवस्थेचा वाढता आकार हा गुंतवणुकीच्या संधी निर्माण करू शकतो.

                  कर सल्लागार सुनील नागावकर  ' कररचना ' या विषयावर बोलताना म्हणाले प्रत्येक जण बजेटमध्ये माझ्यासाठी काय हे पाहत असतो. कराशिवाय प्रगती नाही हे खरे आहे. पण त्याच वेळी जास्त उत्पन्नाला कमी कर  आणि किमान उत्पन्नाला जादा कर हे धोरण आर्थिक विषमता वाढवत नेत असते. त्यावर या अर्थसंकल्पात विशेष विचार झालेला दिसत नाही. त्याचबरोबर नव्या कररचनेमध्ये चारिटेबल ट्रस्ट, बँका,पतसंस्था,दूधसंस्था आदी सहकारी संस्था यांच्याबाबतचे नवे करनियम अन्यायकारक ठरण्याची शक्यता आहे.    

  अध्यक्षस्थाना वरून बोलताना प्राचार्या.डॉ. त्रिशला कदम म्हणाल्या, तरुण पिढीला मोबाईलचे इंजेक्शन देऊन ठेवलेले आहे. वास्तविक अर्थसंकल्प हा त्यांच्यावर परिणाम करणारा असतो. तो त्यांनी समजून घेण्याची गरज आहे. सार्वत्रिक आय आणि व्ययचा लेखाजोखा अर्थसंकल्प मांडत असतो. सरकार खर्च कशा कशावर व किती करणार हे त्यातून सूचित होत असते.आयची बाजू ही लोकांकडूनच काढून घेतली जात असते. त्यामुळे व्ययसुद्धा सर्वसामान्य ,गरजू लोकांवर अधिक केला पाहिजे.तळातल्या वर्गाची भाषा केलेली आहे. पण त्याच्या हाती फारसे काही हा अर्थसंकल्प ठेवताना दिसत नाही. श्रोत्यांच्या प्रश्नांचे व शंकांचे योग्य निरसनही सर्व  वक्त्यांनी केले.या परीसंवादाला प्राचार्य ए.बी.पाटील,अहमद मुजावर,दत्ता माने, अजित मिणेकर,सुनील बारवाडे,डी.एस. डोणे ,आनंदराव चव्हाण,पांडुरंग पिसे,अशोक मगदूम, अशोक नागावकर, नौशाद शेडबाळे,कृष्णात लिपारे,दीपक पंडित यांच्यासह अनेक जिज्ञासू बंधू भगिनीची उपस्थिती होती .अन्वर पटेल यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post