भारत जोडो यात्रेचे सामाजिक सांस्कृतिक महत्त्व मोठे आहे

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

राहुल गांधी यांनी जवळजवळ दीडशे दिवस भारताच्या बारा राज्यातून साडेतीन-चार हजार किलोमीटरची कन्याकुमारी ते काश्मीर काढलेल्या पदयात्रेची सांगता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या स्मृतिदिनी अर्थात हुतात्मा दिनी झाली. ही यात्रा अनेक अर्थानी महत्त्वपूर्ण आहे.तिचे राजकीय यश- अपयश हा मुद्दा पक्षीय आहे.त्याचा लाभ काँग्रेस पक्ष कसा करून घेतो हा त्या पक्षाचा प्रश्न आहे.

 पण या यात्रेचे सामाजिक- सांस्कृतिक महत्त्व राष्ट्रीय आहे यात शंका नाही.' नफरत जोडो भारत जोडो' भूमिका प्रत्येक भारतीयाची आहे. ती भारताची संस्कृती आहे.या यात्रेवर टीका करणाऱ्यांनी भारत जोडो ची हाक द्यायला भारत तुटला आहे काय ?असा प्रश्न सुरुवातीच्या काळात केला होता. देशाची अखंडता आणि एकता एकत्र असणे अतिशय आवश्यक असते.आज खरा मुद्दा समाजात नफरत, हिंसा ,अविश्वास, अरेरावी वाढत आहे यामुळे देशातील माणूस भावनिक व मानसिक दृष्ट्या तुटेल हा आहे. माणसाकडे माणूस म्हणून बघता त्याचा जात-धर्म बघून वर्तन व्यवहार केला जावा अशी भाषणबाजी सर्रास केली जात आहे. त्यावर आळा घातला जात नाही. महागाईपासून ते बेरोजगारी पर्यंत आणि धर्मांधतेपासून ते  गुन्हेगारीच्या उदो उदो करणापर्यंत अनेक प्रश्न तसेच दुर्लक्षित ठेवले तर भारत आतून खिळखिळा होऊ शकतो याचे भान आपण सर्वांनीच ठेवले पाहिजे.. देशाचा विकास योग्य समन्यायी धोरणातून आणि त्याच्या अंमलबजावणीतूनच होत असतो.केवळ भाषण बाजीतून नव्हे.

स्वातंत्र्यानंतर भारताचा झालेला सर्व समावेशक विकास हा पंडित यांच्या नेतृत्वाखाली झाला आहे. संसदीय लोकशाही,धर्मनिरपेक्ष राष्ट्रवाद, सामाजिक न्यायावर आधारित समाजवाद आणि अलिप्ततावाद ही थोर स्वातंत्र्यसैनिक व भारताचे पहिले पंतप्रधान  पं.नेहरू यांच्या विचारातून निर्माण झालेल्या मॉडेलची ठळक वैशिष्ट्ये आहेत.आज धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाऐवजी सांस्कृतिक राष्ट्रवाद मांडला जाऊ लागला आहे.त्याला पोषक व पूरक वातावरण पद्धतशीरपणे भांडवली शक्ती तयार करत आहेत.समाजवाद आणि अलिप्ततावाद यांचे आवाज दाबून टाकण्याचा ,त्यांना क्षीण करण्याचा प्रयत्न होतो आहे.अशा वेळी नेहरूंच्या लोकशाही समाजवादातील काळाला उपयुक्त ठरणारे विचार पुढे आणण्याची गरज आहे.ते नेहरू प्रारूप पुढे नेण्याचा प्रयत्न  आणि समाजात आणि देशापुढील नेमके खरे प्रश्न राहुल गांधी यांनी  भारत जोडो यात्रेतून अनेक संवादातून सभातून आणि पत्रकार परिषदेतून मांडले आहेत. त्याचे महत्त्व निश्चितच मोठे आहे.


प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

(९८५०८ ३०२९० )

Post a Comment

Previous Post Next Post