पिंपरी-चिंचवडच्या करसंकलन कार्यालयांमध्ये शेकडो कोटींचा भ्रष्टाचार

  अन् अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे- पाटलांची गांधारीची भूमिका!

अपना वतनचे सिद्दिक शेख यांचा घणाघाती आरोप


प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करसंकलन कार्यालयातील करोडो रुपयांचा भ्रष्टाचार उघडकीस येऊन देखील महापालिका प्रशासनाकडून अद्यापही कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. पालिका अधिकारी तसेच कर्मचारी मनपाचे आर्थिक नुकसान करत असून महापालिका प्रशासनाची लूट होत असताना करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांची कार्यपद्धती व भूमिकेविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. यातून देशमुख यांनी प्रशासकीय कामकाज करतांना किंवा कर्तव्य बजावतांना प्रशासकीय नियम, मार्गदर्शक तत्वे यांचा भंग केल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांचा पदभार काढून त्यांच्यासह सर्व विभागीय कार्यालयातील गैरकारभाराची 'स्वतंत्र चौकशी समिती' नेमून सखोल चौकशी करण्यात यावी तसेच दोषी आढळणाऱ्या अधिकारी - कर्मचाऱ्यांचे सेवानिलंबन करुन मनपाचे आर्थिक नुकसान करणाऱ्यावर  गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.


             यासंदर्भात अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री, पुणे जिल्हा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक, तसेच पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्तांकडे तक्रारी केल्या आहेत. दिलेल्या तक्रारीत त्यांनी म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहराचे वाढते शहरीकरण लक्षात घेता महापालिकेचे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान व पारदर्शक करणे आवश्यक आहे. त्यानूसार महापालिकेच्या सेवा, सोयी-सुविधा नागरिकांना तात्काळ उपलब्ध व्हाव्यात,म्हणून अनेक विभागाचे विकेंद्रीकरण करण्यात आले. त्यानूसार शहरातील नागरिकांना जलदगतीने सेवा-सुविधा मिळण्यासाठी करसंकलनचे विकेंद्रीकरण करण्यात आले. सर्व क्षेत्रीय कार्यालयाकडून नागरिकांना मालमत्ता नोंदी, करआकारणी, हस्तांतर प्रक्रिया, थकबाकी वसुली यासह अनेक कामकाजाचे क्षेत्रीय  कार्यालयाच्या ठिकाणीच निरसन केले जात होते. 

मात्र, करसंकलनचे विभाग प्रमुख निलेश देशमुख यांनी मनमानी कारभार करीत स्वत:च्या सोयीसाठी विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे नागरिकांना पुन्हा पत्येक कामकाजास महापालिका मुख्य भवन कार्यालयास हेलपाटे मारावे लागत आहे. पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या करआकारणी व करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह 17 विभागीय कार्यालयात अधिकारी- कर्मचाऱ्यांचा नियम बाहय तसेच बेकायदेशीरपणे कारभार सुरु आहे. 

          दरम्यान, मागील काही महिन्यांपासून कर संकलन  विभागातील विकेंद्रीकरणाचा निर्णय रद्द ,केवळ प्रतिज्ञा पत्राद्वारे नोंदणी , ठेकेदार व एजन्सीकडून मिळकतीच्या नोंदी नसणे , तळवडे येथील एकाच दस्तावर ३१ नोंदी , चिखली विभागातील अनधिकृत खोल्यांची नोंद , काही व्यावसायिकांचा मिळकत कर चक्क माफ , करसंकलन तृतीयपंथी बांधवानी केलेली तक्रार असे अनेक प्रकार घडले आहेत. या अनागोंदी कारभाराविषयी वारंवार येत असलेल्या बातम्यांच्या माध्यमातून पिंपरी चिचंवड महानगरपालिकेच्या करसंकलन विभागाचे वाभाडे काढले जात आहेत. संबंधित विभागाची जबाबदारी असलेले अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांची भूमिका शंकास्पद वाटत आहे. इतक्या मोठ्या प्रमाणावर महापालिका प्रशासनाची बदनामी होत असताना त्यांना अभय देऊन एकप्रकारे त्या अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभाराला मूकसंमती देण्याचे काम अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे-पाटील यांच्याकडून केले जात असल्याची जोरदार चर्चा महापालिका वर्तुळात रंगली आहे. त्यामुळे हे सर्व प्रकरण माहित असूनही जांभळे-पाटील गांधारीची भूमिका पार पाडत आहेत.हा मोठा आर्थिक गैरव्यवहार असून त्यामुळे दोषी अधिकारी कर्मचाऱ्यांवर कारवाई न करता अप्रत्यक्षरीत्या त्यांनी केलेल्या गैरकारभाराला प्रोत्साहन तसेच संरक्षण दिले जात आहेत. त्यामुळे करसंकलनच्या भ्रष्टाचाराच्या चिखलात अनेक जन रुतलेले आहेत. करसंकलन विभागातील भ्रष्टाचाराची प्रकरणे उघडकीस येऊनही अतिरिक्त आयुक्त संबंधितांवर कारवाई करण्यास धजावत नसल्याने या प्रकारांची खोलवर गेलेली पाळेमुळे शोधण्याची गरज आहे. यातून सर्रासपणे महापालिकेचा तिजोरीची लूट केली जात आहे. त्यामुळे महापालिकेच्या करसंकलन विभागाचे सहायक आयुक्त निलेश देशमुख यांच्यासह सर्व विभागीय कार्यालयातील अधिकाऱ्यांनी केलेल्या गैरकारभाराची स्वतंत्र समिती गठीत करुन चौकशी करावी, चुकीच्या नोंदी लावून बेकायदेशीर, नियमबाह्य कामकाज करणाऱ्या अधिकारी- कर्मचाऱ्यांचे सेवानिलंबन करुन खातेनिहाय चौकशी करण्यात यावी, दोषी आढळणाऱ्या व मनपाची आर्थिक फसवणूक करणाऱ्यांवर फौजदारी खटला दाखल करण्यात यावा तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल अपना वतन संघटनेला ७ दिवसात कळवावा .अन्यथा नाईलाजास्तव आम्हाला पालिका प्रशासनाच्या भ्रष्ट कारभाराविरोधात लोकशाही पद्धतीने तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा अपना वतन संघटनेचे सिद्दिक शेख यांनी दिला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post