बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपवणा-या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने उघडकीस आणला

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे ,: 

कोल्हापूर : . बनावट नोटा तयार करून त्या बाजारात खपवणा-या टोळीला स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने  उघडकीस आणला. संशयित संदीप बाबू कांबळे (वय ३८, रा. आंबेडकरनगर, कळे, ता. पन्हाळा) याला पोलिसांनी बेड्या ठोकल्‍या असून बनावट नोटा छपाईचे रॅकेट समोर आले आहे. 


.

याप्रकरणी चंद्रशेखर बाळासाहेब पाटील (वय ३४, रा. कसबा तारळे, ता. राधानगरी), अभिजीत राजेंद्र पवार (वय ४०, रा. गडमुडशिंगी, ता. करवीर), दिग्विजय कृष्णात पाटील (वय २८, रा. जयभवानी तालमीसमोर, शिरोली पुलाची) या तिघांना अटक करण्‍यात आली आहे.

कळे गावाहून काही संशयित बनावट नोटा घेवून शहरातकडे जाणार असल्‍याची गोपनीय माहिती स्‍थानिक गुन्‍हे शाखेचे पोलीस अंमलदार विजय गुरखे यांना मिळाली होती. त्‍यांनी पोलीस निरीक्षक संजय गोर्ले यांना ही माहिती कळवली. यानंतर तातडीने उपनिरीक्षक शेषराज मोरे, वैभव पाटील, सचिन देसाई, अनिल पास्ते, हिंदूराव केसरे, रणजित पाटील, दीपक घोरपडे, सोमराज पाटील व रफिक आवळकर यांचे पथकाने कोल्हापूर ते गगनबावडा जाणारे रोडवरील मरळी फाटा येथे सापळा लावला होता. यावेळी संशयास्‍पद कार येताच ती अडविण्‍यात आली. यातील संशयित चंद्रशेखर पाटील, अभिजीत पवार, दिग्‍विजय पाटील यांच्‍याकडे चौकशी करुन अंगझडती घेतली असता बनावट नोटा मिळून आल्‍या.

कळे येथे छपाई

संशयितांकडे मिळालेल्‍या नोटा त्‍यांनी कळे येथील संदीप कांबळेकडून आणल्‍याचे सांगितले. पोलिसांनी त्‍याच्‍या घरी जावून झडती घेतली असता बनावट नोटा तयार करण्याचे संगणक, प्रिंटर व इतर साहित्य मिळून आले. तसेच बनावट नोटाही जप्‍त करण्‍यात आल्‍या.

Post a Comment

Previous Post Next Post