आज 14 जानेवारी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामविस्तार दिवस. त्यानिमित्ताने एक आठवण म्हणून सादर   प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

    डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद नामांतराचा लढा खूप मोठा होता. या लढ्यासाठी कित्येक भिमसैनिकांनी आपल्या प्राणांची आहुती दिली होती.नेहमी प्रमाणे सिद्धार्थनगर मध्ये देखील या लढ्याची धगधगती मशाल पेटली होती. त्यावेळी या आंदोलनात सिद्धार्थनगर मधील तरूण वर्ग , महिला व प्रौढांचा देखील सक्रिय सहभाग होता.नामांतराचा लढा एवढा तीव्र झाला होता की सिद्धार्थनगरला अतिसंवेदनशील भाग म्हणून घोषित केले होते व पोलीस प्रशासनाने कर्फ्यु देखील लावला होता.

  हा नामांतराचा लढा सुरू असताना सिद्धार्थनगर मधील तरुण अतिशय उग्र आंदोलनाच्या तयारीत होते , ही खबर पोलिसांना लागताच पोलीस प्रशासनाने सिद्धार्थनगरचे पोलिस छावणीत रुपांतर केले होते. कारण सिद्धार्थनगरच्या मेनरोडवरून म्हणजे जोतिबा - पन्हाळा रोडवरून जाणाऱ्या एस.टी. बसेस या दगडाने फोडल्या जात होत्या.अशातच रात्रीची वेळ होती , सिद्धार्थनगर मधील तरुण वर्ग हा या नामांतराच्या लढ्यात पेटून उठला होता. सरकार नामांतरासाठी तयार होत नव्हते. त्यामुळे सिद्धार्थनगर मधील तरुण वर्ग हा उग्र आंदोलनाच्या दिशेने जात असताना ,  डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे एकनिष्ठ कार्यकर्ते दा.म . शिर्के  यांचे चिरंजीव सामाजिक कार्यकर्ते वसंतराव दादासाहेब शिर्के यांनी समाज मंदिर शेजारी आमच्या दारातच तातडीची बैठक बोलावली व सिद्धार्थनगर मधील सर्व तरूण , महिला वर्ग यांना उपदेश केला की " हा लढा तीव्र होत असताना जर प्राणांची आहुती द्यावी लागली तर सर्वप्रथम माझे रक्त सांडेल व नंतर माझ्या सिद्धार्थनगर मधील बांधवांचे सांडेल "अशी घोषणा करताच तरुण वर्गाला एक वेगळीच उर्जा मिळाली व जयभीम चे नारे दुमदुमू लागले. ही बैठक खाली रस्त्यावर बसूनच संपन्न होत असताना, एवढ्यात पोलिस तेथे दाखल झाले व त्यांनी सर्व परिस्थिती आटोक्यात आणली व आंदोलकांना पांगवण्यात आले.

    पुढे जाऊन सर्वांच्या प्रयत्नातून या मराठवाडा विद्यापीठ औरंगाबादचे नामविस्तार करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद असे करण्यात आले.

   सांगण्याचे तात्पर्य एवढेच आहे की आपले सिद्धार्थनगर हे एक महाराष्ट्रातील आंबेडकरी चळवळीचे केंद्र बिंदू आहे आणि यापुढेही कायम राहणार यात शंका नाही.


*जयभीम*

*जयबुध्द*

*जयभारत*

Post a Comment

Previous Post Next Post