आळंदीत पार्किंची क्षमता वाढविण्याची भाविक आणि ग्रामस्थांकडून मागणी

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

आळंदी : तीर्थक्षेत्र आळंदीत पार्किंगसाठी जागा अपुरी पडत असून, नो पार्किंगमधील गाड्यांवर कारवाई होत असल्यामुळे आळंदीला आलेल्या भाविकांना मोठा दंड भरावा लागत आहे. आळंदीत पार्किंची क्षमता वाढविण्याची भाविक आणि ग्रामस्थांकडून मागणी होत आहे.

तीर्थक्षेत्र आळंदी हे राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या संजीवन समाधीचे दर्शनासाठी तसेच लग्नकार्यासाठी येथे मोठ्या संख्येने लोक येत असतात.अशा वेळी पार्किंगला जागा मिळत नसल्याने मिळेल त्या जागी वाहनचालक गाडी पार्क करतात. परिणामी शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. अनेकदा पोलिसांच्या कारवाईलाही वाहनचालकांना सामोरे जावे लागत आहे. यावर कायमस्वरूपी तोडगा निघावा यासाठी भाविक आणि ग्रामस्थांची मागणी जोर धरीत आहे.


लग्नाची तारीख असल्यास अथवा एकादशी, रविवार अशा दिवशी आळंदीला येणाऱ्यांची संख्या अधिक असते. शेकडो गाड्या आळंदीत येतात; मात्र आळंदीत नगरपरिषदेचे अधिकृत केवळ एकच पार्किंग कार्यरत आहे. तेथे 40 ते 50 चारचाकी गाड्या पार्क केल्या जातील एवढीच सुविधा आहे. तर पालिकेचे वडगाव रस्त्यावर गो-शाळेशेजारी 50 गाड्यांचे पार्किंग प्रस्तावित आहे, ते सुरु केल्यास काहीअंशी पार्किंगची समस्या शिथील होईल, अशी अपेक्षा आहे.

पार्किंगची अपुरी सुविधा असल्याने रस्त्यावर बेशिस्त पार्किंगमुळे अनेकदा वाहतूक कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून वन-वेची ट्रायल घेतली जाणार आहे. आळंदीत पुण्याच्या दिशेने येणाऱ्या वाहनांना चाकण चौकाकडून नवीन पुलावरून प्रवेश देण्यात येणार आहे. तर आळंदीतून बाहेर पडण्यासाठी पीएमटी चौकाकडून जुन्या पुलावरून बाहेर पडता येईल, अशी ही ट्रायल असेल. आठ दिवस ही ट्रायल घेऊन त्यानंतर शहरात पी-1, पी-2 अशाप्रकारे व्यवस्था करण्याबाबत विचार केला जाणार आहे. त्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यास मदत होईल, अशी माहिती आळंदी-दिघी वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शहाजी पवार यांनी दिली.

आम्ही परभणीवरून माऊलींच्या दर्शनासाठी आलो होतो. पार्किंगमध्ये वाहन लावण्यासाठी जागा नव्हती. त्यामुळे रस्त्यावर गाडी पार्क करून आम्ही दर्शनासाठी मंदिरात गेलो. नो पार्किंगमुळे 500 रुपयांचा दंड भरावा लागला. प्रशासनाने पार्किंगची सुविधा करावी.
-संतोष जाधव, भाविक

आळंदी शहरातील पार्किंगची समस्या सोडविण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न केले जाणार आहेत. लवकरच वाहतूक शाखेशी संपर्क साधून योग्य त्या ठिकाणी पी-1, पी-2 पार्किंगसाठी नियोजन केले जाणार आहे. अधिकचे कायमस्वरूपी पार्किंगसाठी उपाययोजना केल्या जाणार आहेत.
– कैलास केंद्रे, मुख्याधिकारी आळंदी नगरपरिषद

Post a Comment

Previous Post Next Post