गेल्या 14 महिन्यांत लोकशाही दिनात केवळ सात तक्रारी

 गेल्या वर्षभरात परिमंडळ 1, 2, 3,4 या तीन ठिकाणी एकही तक्रार नाही. प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे – राज्य शासनाच्या आदेशानुसार गेल्या वीस वर्षांपासून पुणे महापालिकेत महापालिका आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. ज्यामध्ये नागरिक त्यांचे महापालिकेच्या विविध विभागांमध्ये न सुटणारे प्रश्‍न मांडून प्रश्‍नांची तड लावण्यासाठी प्रयत्न करतात. मात्र, गेल्या 14 महिन्यांत लोकशाही दिनात केवळ सात तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे शहरातील नागरिकांच्या समस्या उरल्याच नसून, सर्व काही आलबेल सुरू आहे, असे म्हणावे लागेल. अथवा नागरिकांचा या उपक्रमावरील विश्‍वास उडाला आहे, असा निष्कर्ष काढावा लागेल. महापालिकेकडून या उपक्रमाबाबत आवश्‍यक जनजागृती करण्यात आखडता हात घेतला जात असल्याने ही स्थिती उद्‌भवली आहे….

लोकशाही दिन का महत्त्वाचा?

महापालिकेने सुमारे 20 वर्षांपूर्वी लोकशाही दिन सुरू केला होता. सुरुवातीला नागरिक यात सहभागी होत होते. मात्र अनेकदा प्रश्‍नांची सोडवणूक होण्याऐवजी टोलवाटोलवीचे अनुभव नागरिकांना येऊ लागल्याने नागरीकांचा उत्साह कमी झाला. त्यातच 2017 साली तत्कालीन महापालिका आयुक्तांनी लोकशाही दिन दोन टप्प्यांत राबविण्याचा निर्णय घेतला. ज्यामध्ये नागरिकांनी अगोदर आपली तक्रार महापालिकेच्या परिमंडळ कार्यालयात नोंदवायची, मग दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी परिमंडळ स्तरावर लोकशाही दिन आयोजित करुन या तक्रारींचे निराकरण करण्यासाठी प्रयत्न केले जात. या ठिकाणी समाधान न झाल्यास नागरिक महापालिका आयुक्त कार्यालयात दर महिन्याच्या पहिल्या सोमवारी होणाऱ्या लोकशाही दिनात आपली तक्रार दाखल करू शकतात. त्या तक्रारीवर थेट विभाग प्रमुखांच्या उपस्थितीत महापालिका आयुक्त सुनावणी घेत. त्यामुळे नागरिकांच्या तक्रारी विभाग प्रमुख अथवा परिमंडळ उपायुक्तांकडून दखल घेतली न गेल्यास आयुक्तांच्या लोकशाही दिनात नागरिकांना न्याय मिळून त्यांच्या समस्या सुटत असत.

तीन परिमंडळात तक्रारच नाही

शहरात महापालिकेची 15 क्षेत्रीय कार्यालये असून, त्यांच्यावर नियंत्रणासाठी पाच परिमंडळे आहेत.
करोनामुळे परिमंडळासह महापालिका आयुक्तांचा लोकशाही दिनही रद्द करण्यात आला होता.गेल्या वर्षभरापासून तो पुन्हा सुरू करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात परिमंडळ 1, 2, 3,4 या तीन ठिकाणी एकही तक्रार नाही. परिमंडळ पाचमध्ये 14 महिन्यांत फक्त नऊ तक्रारी.
महापालिका आयुक्त कार्यालयात आयोजित लोकशाही दिनात 14 महिन्यांत फक्त सात तक्रारी. महापालिकेकडून जनजागृती होत नसल्याचे चित्र आहे. लोकशाही दिनाच्या द्विस्तरीय प्रक्रियेची परिपूर्ण माहिती देणारे फलक महापालिकेच्या मुख्य इमारतीत, परिमंडळ कार्यालयात तसेच सर्व क्षेत्रीय कार्यालयांत ठळकपणे दिसतील, अशा प्रकारे लावावेत. तसेच महापालिकेच्या संकेतस्थळावरही ही माहिती सहज सापडेल, अशा पद्धतीने प्रसिद्ध करावी. तसेच यासाठीचे अर्ज ऑनलाइन पद्धतीने भरण्याची सोयही व्हावी.


– विवेक वेलणकर, अध्यक्ष, सजग नागरिक मंच

Post a Comment

Previous Post Next Post