रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानधारक औषध विव्रेत्याकडून औषध खरेदी करू शकतात

अमुक एका दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती नियमबाह्य 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

रूग्णालयाशी संलग्न औषध दुकानातूनच औषध खरेदी करण्याच्या सक्तीविरुद्ध राज्याच्या अन्न आणि औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर पाऊल उचलले आहे. अशी अमुक एका दुकानातूनच औषधे खरेदी करण्याची सक्ती नियमबाह्य असून रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानधारक औषध विव्रेत्याकडून औषध खरेदी करू शकतात, असे एफडीएचे आयुक्त अभिमन्यू काळे यांनी बजावले आहे.

रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांवर रुग्णालयाशी संलग्न औषध दुकानांतूनच औषध खरेदी करण्यासाठी सक्ती करण्यात येत असल्याच्या तक्रारी सातत्याने एफडीएकडे येत होत्या. त्याची गंभीर दखल घेत एफडीएने अशा सक्तीला लगाम घालण्यासाठी परिपत्रक जारी केले आहे. एफडीए आयुक्तांच्या स्वाक्षरीने हे परिपत्रक जारी करण्यात आले असून त्याची तातडीने अंमलबजावणी करण्याचे निर्देश दिले गेले आहेत.

रुग्णालयाने त्यांच्या संलग्न दुकानातून औषध खरेदी करण्याची सक्ती नियमबाह्य आहे. त्याविरोधात आपण कारवाई करावी, असे पत्रकात नमूद करण्यात आले आहे. विभागीय सहआयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि औषध निरीक्षक (औषधे) यांना याबाबत त्यांनी निर्देश दिले आहेत.

दर्शनी भागात फलक लावा!

'रुग्णालयातील औषध दुकानातून रुग्णांनी औषध खरेदी करावी अशी सक्ती नाही. रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक कोणत्याही परवानाधारक औषध विव्रेत्याकडून औषधांची खरेदी करू शकतात', अशा आशयाचा फलक ठळकपणे संबंधित रुग्णालयांनी रुग्णांना दिसेल अशा दर्शनी भागात लावावा. याबाबत संबंधितांना सूचना द्याव्यात, असेही पत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post