कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी

 


प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे : 

कोल्हापूर : महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद पुन्हा एकदा पेटला आहे.या पार्श्वभूमीवर कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून जमावबंदी (Section 144) आदेश लागू झाला आहे. कोल्हापुरात 15 दिवसांसाठी जमावबंदी असेल. या काळात पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र येण्यास बंदी आहे. तसंच मिरवणुका आणि सभांनाही बंदी असेल. अप्पर जिल्हा दंडाधिकारी दत्तात्रय कवितके यांनी काल (8 डिसेंबर) जमावबंदीचे आदेश जारी केले आहेत. आदेशाचं उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल, असं जिल्हा प्रशासनाच्या वतीने सांगण्यात आलं आहे.सीमाप्रश्नावरुन महाविकास आघाडीच्या कर्नाटक सरकारविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर आणि ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 9 डिसेंबरपासून 23 डिसेंबरपर्यंत जमावबंदीचे आदेश लागू असतील. महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 चे पोट कलम (1)अ ते फ आणि कलम 37 (3) अन्वये जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत.

महाविकास आघाडीचं आंदोलन

महाराष्ट्र कर्नाटक सीमाप्रश्न आणि छत्रपती शिवाजी महाराज अवमानाच्या निषेधार्थ शनिवारी (10 डिसेंबर) कोल्हापुरातील शाहू समाधी स्थळावर आंदोलन करण्याची घोषणा जिल्ह्यातील महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. कर्नाटक सरकारचे सीमावासियांवर होणारे अत्याचार यावर विचारविनिमय करण्यासाठी मविआ नेत्यांची बैठक झाली. या बैठकीला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीम, काँग्रेसचे सतेज पाटील, जयश्री जाधव, शिवसेनेचे संजय पवार यांच्यासह मविआचे नेते उपस्थित होते.

महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान मोदींची भेट घेणार

दरम्यान महाराष्ट्रातील खासदार आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत. आज सकाळी महाराष्ट्राचे भाजप खासदार मोदींसोबत अनेक विषयांवर चर्चा करणार आहेत. सीमावाद, राज्यपालांची वक्तव्यं यावर भाजप खासदार गाऱ्हाणं मांडणार असल्याची माहिती आहे. यासोबतच पंतप्रधान मोदी इतर दोन राज्यांच्या खासदारांशीही चर्चा करणार आहेत.




Post a Comment

Previous Post Next Post