तो सोहळा मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

सौ. प्रमोदीनी माने :

 जयदीप पाटील...कुटुंबातील,नातेवाईकां कडील,मित्रां कडील आणि गावातील अनेक विवाह सोहळ्यांना मी हजेरी लावलीय.. यापुढं सुध्दा अशा विवाह सोहळ्यांना हजेरी लावेन पण रविवारी 11 डिसेंबर मी ज्या सोहळ्याला हजेरी लावली तो सोहळा मी आयुष्यात कधीच विसरणार नाही.खरं तर मी स्वत:ला भाग्यवान समजतो की मी या विवाह सोहळ्याला फक्त उपस्थितच नव्हतो तर या सोहळ्याचे आयोजक दिव्यांग प्रतिष्ठानचा सक्रीय सदस्य म्हणून या सोहळ्याच्या आयोजनाचा एक घटक होतो.

    पुण्यात पार पडलेला हा विवाह सोहळा साधासुधा नव्हता तर या सोहळ्यात पंधरा दिव्यांग जोडप्यांनी आपल्या सहजीवनाची सुरुवात केली.हे दिव्यांग वधू वर, अंध,अल्पदृष्टी,अस्थिव्यंग होते.गेली पाच वर्षे दिव्यांग प्रतिष्ठान असा सोहळा आयोजित करत आहे.या सोहळ्याच्या निमित्तानं दिव्यांग वधू वरांशी नातं जोडण्याची संधी सुध्दा आम्हा दिव्यांग प्रतिष्ठानच्या सदस्यांना मिळाली.काही दिव्यांग वधू वरांचे पालक,मामा तसंच कुटुंबातील सदस्य होण्याचा मान आम्हाला मिळाला.

         या विवाह सोहळयाच्या आदल्या दिवशी हळदीचा कार्यक्रम होता यावेळेस माझ्यासोबत आलेले कोडोली व सातवेचे मित्र अमरसिंह पाटील, अविनाश देसाई ,सतीश पाटील अविनाश निकम यांनी प्रत्येकास मंडोळ्या बांधण्यापासून ते हळद लावण्यापर्यंत जे एका कुटुंबातले सदस्याची सर्व जबाबदारी या माझ्या मित्रांनी व दिव्यांग प्रतिष्ठानच्या अन्य सदस्यांनी पार पडली.विवाहाच्या मुख्य दिवशी एखादं घरचं कार्य असल्या प्रमाणे साहित्य मांडणी सर्वांनी केली.

          मी आणि सर्व सहकार्‍यांनी आपला मोर्चा व्यासपीठाकडं वळवला.लग्न विधीसाठीचं साहित्य,हार तुरे ,वधू वरांची बैठक व्यवस्था ही सगळी कामं करताना आम्हाला निस्सीम आनंद होत होता. या विवाह सोहळ्याच्या नियोजनात सहभागी होण्याची आम्हाला मिळालेली संधी आमच्यासाठी एक मोठा सन्मानच होता.त्यामुळं प्रत्येकाच्या चेहर्‍यावर एक विलक्षण समाधान दिसत होतं.विवाह सोहळ्यासाठीची सर्व तयारी झाल्यानंतर भविष्यात एकमेकांच्या आधारानं सुखाचा संसार करणार्‍या वधू वरांना विवाहस्थळी आल्यानंतर आधार देताना ,त्यांची आस्थेवाईकपणे विचारपूस करताना माझ्या सर्व सहकार्‍यांच्या डोळ्यांत जो आपुलकीचा भाव दिसत होता तो विलक्षण होताच पण सर्व विधी करताना कुटूंबातील सदस्यांची सर्व जबाबदारी आम्ही पार पाडली. एरवी काही अपवाद सोडले तर दिव्यांगांकडं बघण्याचा समाजाचा दृष्टीकोन हा संकुचितच राहिलाय..त्यामुळं दिव्यांगांना समाजात नेहमीच दुय्यम स्थान राहिलंय.पण दिव्यांग प्रतिष्ठाननं दिव्यांगांचा आत्मसन्मान जपत त्यांचा भविष्यातील उदरनिर्वहासाठी आवश्यकते प्रमाणे झेरॉक्स मशीन,पापडाचे मशीन,आटा चक्की इत्यादी वस्तू या सोबत देण्यात आले आहे.

                  खरं तर दिव्यांग प्रतिष्ठान  बरोबरच असंख्य संस्था दिव्यांगांचं जीवनमान सुधारण्यासाठी काम करतायत. यापैकी अनेक जण समाजऋण फेडण्याच्या निरपेक्ष हेतूनच हे सगळं करतात. या विवाह सोहळ्यासाठी मदत करणारे संघ परिवार,सर्व सहकारी व दानशूर व्यक्ती संस्था बरोबरचयांचे आभार.

     या प्रसंगी विशेष उपस्थिती दिव्यांग कल्याण आयुक्त मा.संजय कदम, बार्टीच्या अतिरिक्त आयुक्त मा. सुमिना भोसले, उप महापौर श्री.सुरेश नाशिककर, श्री.सचिन कुलकर्णी,श्री.उमेश कुदळे सर व मा.भाजप प्रदेश उपाध्यक्ष श्री.आशिष कंटे साहेब संघचालक कसबा पेठ ॲड. प्रशांत कदम यांचेही आभार.

दिव्यांग प्रतिष्ठानच्या सोहळ्याच्या निमित्तानं झालेला आनंद तुमच्या पर्यंत याद्वारे पोहचवणं हाच उद्देश.. पण प्रामाणिकपणे सांगतो दिव्यांग प्रतिष्ठानचे सर्व कार्यकर्ते,मी आणि माझ्या सोबत कोडोली व सातवेहून आलेल्या सर्वांनी त्या विवाहसोहळ्यात जी अनुभूती घेतली त्याचं वर्णन शब्दांत करताच येण्या सारखं नाही.पण मी आणि माझ्यासह सर्वांनी विवाहस्थळी पोहचल्या पासून तिथून बाहेर पडे पर्यंत जो भावनांचा कल्लोळ अनुभवला तो कुठं तरी व्यक्त करणं गरजेचं होतं.. व्यक्त केल्या शिवाय रहावंत नव्हतं.. म्हणून आणि म्हणूनच विवाह सोहळ्यातलं भारावून टाकणारं वातावरण तुमच्या पर्यंत पोहचवण्याचा प्रयत्न केला.

               खरं तर प्रत्येकाच्या जगण्यातला आनंद घेण्याच्या संकल्पना वेगळ्या असतात. सर्वसाधारणपणे सगळेचजण मी आणि माझे जीवलग यांच्या सुखातच आपला आनंद शोधतात. पण दिव्यांग प्रतिष्ठान सारख्या संस्था मी आणि माझे याच्या पलीकडं जाऊन समाजासाठी करत असताना मिळवत असलेला आनंद किती बेगडी आहे याची प्रचिती येते.नेहमीच आपल्या पुरता विचारणार करणारे आपण समाजासाठी निरपेक्षपणे काम करणार्‍यांपुढं कसे खुजे आहोत याची जाणीव अस्वस्थ करते.याच अस्वस्थेतून आपण सुध्दा समाजासाठी उरलेल्या आयुष्यात तरी उपयोगी पडावं ही भावना अधिक तीव्र झाली.मी आणि माझ्या सहकार्‍यांना स्वत:कडं एका वेगळ्या नजरेतून बघायला भाग पाडणारी हीच भावना तुमच्या पर्यंत पोहचावी म्हणूनच दिव्यांग सोहळ्यात मिळालेली निरपेक्ष आनंदाची भावना तुमच्या पर्यंत पोहचवली.. यातून आपण सगळेच जण इतरांना आनंद देण्यात आपला आनंद मिळवूया हीच अपेक्षा.

Post a Comment

Previous Post Next Post