लोकशाहीत लोक हीच अंतिम सत्ता असते.... प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादनप्रेस मीडिया लाईव्ह :

कळे ता.१८, भारतीय राज्यघटनेने दिलेल्या आणि आपण भारतीयांनी स्वीकारलेल्या भारतीय लोकशाही समोर सद्यस्थितीत आव्हाने जरूर उभी राहिली आहेत. मात्र अंतिम सत्ता लोकांची आणि लोक हीच सर्वश्रेष्ठ सार्वभौम शक्ती  असल्यामुळे लोकशाहीच्या भवितव्याची चिंता करण्याचे कारण नाही. मात्र त्यासाठी नव्या पिढीचे भारतीय राज्यघटनेच्या मूल्यांबाबतचे प्रबोधन होणे आवश्यक आहे. मतदान करण्यापेक्षा मताचा अधिकार वापरणे. आणि प्रजासत्ताकापेक्षा  लोकसत्ताक म्हणून देश घडवणे याला अग्रक्रम देण्याची गरज आहे. ते काम अशा कार्यशाळेमधून होत असते. नव्या पिढीला लोकशाहीचे महत्व समजून घेता व देता येते हेअतिशय महत्त्वाचे आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले .ते श्री दत्त शिक्षण प्रसारक मंडळ पणूत्रे संचलित विठ्ठलराव पाटील महाविद्यालय ,कळे (ता. पन्हाळा जि. कोल्हापूर) येथे "भारतीय लोकशाहीची सद्यस्थिती व भवितव्य " या विषयावरील एक दिवसीय कार्यशाळेत बीजभाषक म्हणून बोलत होते.अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ.के. एन .राक्षसे  होते.मंचावर कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्राचे वक्ते प्रा. एस.एम. गायकवाड (मेढा), प्रा.नितीन पाटील, कार्यशाळेचे समन्वयक प्रा.डॉ.मधुकर धुतुरे हे होते. डॉ.मधुकर धुतूरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. प्रा.डॉ.शार्दुल सेलुकर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.प्रा. नितीन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,आज लोक एकीकडे व शाही दुसरीकडे असे चित्र आहे.लोकशाहीच्या मूल्यांची काही प्रमाणात परवड सुरू असली तरी इतर कोणत्याही पद्धतीपेक्षा संसदीय लोकशाही ही सर्वाधिक लोकाभिमुख पद्धत आहे.दमन आणि प्रलोभन या दोन्हीचा एकत्रित धोका आज लोकशाहीपुढे आहे. पण याला दुर्जनांच्या क्रियाशीलतेपेक्षा सज्जनांची निष्क्रियता कारणीभूत आहे. निवडणूक उमेदवार केंद्रित नव्हे तर मतदार केंद्रित झाली पाहिजे. मतदारांचा जाहीरनामा प्रकाशित केला गेला पाहिजे. शेवटी लोकशाही राज्यव्यवस्था जनतेच्या संमतीवर आधारित असते. लोकशाहीत लोकांचा सहभाग महत्त्वाचा असतो .तिच्यामध्ये समतेचे अधिष्ठान आणि व्यक्तीस्वातंत्र्य गृहीत धरलेली असते. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या बीज भाषणात  भारतीय लोकशाहीची सद्यस्थिती आणि भवितव्य या विषयाचा सखोल व उदाहरणासहित उहापोह केला.

अग्रणी महाविद्यालय योजनेअंतर्गत आयोजित केलेल्या या कार्यशाळेच्या दुसऱ्या सत्रामध्ये प्रा. एस.एम. गायकवाड यांनी या विषयाची सविस्तर मांडणी केली.प्राचार्य डॉ.के.एन.राक्षसे यांनी अध्यक्षीय समारोप केला. यावेळी सहभागी प्राध्यापक मंडळींनी मनोगत व्यक्त केले. यावेळी प्रा. डी. एन.सोनकांबळे ,डॉ.जे.ए. कांबळे यांच्यासह महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक  व विद्यार्थी- विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रा. यु. ए. मोरस्कर यांनी आभार मानले. प्रा. रेखा मदगे व प्रा. अलका कांबळे यांनी सूत्रसंचालन केले.

Post a Comment

Previous Post Next Post