खारघरमधील दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात

 विरोधीपक्षनेते प्रितम म्हात्रे यांची पनवेल महापालिकेकडे मागणी""


प्रेस मीडिया लाईव्ह

विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील

 पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायतीच्या हद्दीच्या बाहेरही खारघर शहर झपाट्याने वाढले आहे. या गोष्टीचा विचार करून खारघरकरांची मते जाणून दारूबंदीच्या सीमा वाढवण्यात याव्यात. तसेच पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत सोमवारी झालेल्या प्रशासकिय महासभेमध्ये पनवेल महानगरपालिका प्रशासनाने दारूबंदीसाठी ठराव घेऊन ज्या  सीमा कायम केलेल्या आहेत त्या ठरावाची मागणी मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली आहे.

          'नो लीकर झोन' म्हणून ओळख असणाऱ्या खारघर शहरात निरसुख पॅलेस नामक एका नव्या बार अँड रेस्टॉरंटला उत्पादन शुल्क विभागाने दारूविक्रीची परवानगी दिली आहे. या निरसूख पॅलेस बारला विरोध कायम असून राजकीय पक्षांसह विविध स्तरातून विरोध केला जात आहे. या बारविरोधात रविवारी (दि.२७ नोव्हेंबर) सर्वपक्षीय आणि सामाजिक संघटनांच्या माध्यमातून संघर्ष समितीच्या नियोजनाखाली एकदिवसीय खारघर बंद पाळण्यात आला. खारघरमधील या बारला विविध स्तरातून होत असलेला विरोध पाहता जनभावनेचा आदर करून दुसऱ्याच दिवशी (सोमवार दि.२८ नोव्हेंबर) पनवेल महानगरपालिका प्रशासनाने खारघर ग्रामपंचायतीचा दारूबंदीचा ठराव कायम करून पुढे त्या संदर्भात कार्यवाही करण्यासाठी निर्णय घेतला आहे.

         २७ जुलै २०१७ रोजी झालेल्या पनवेल महापालिकेच्या सर्वसाधारण सभेमध्ये पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत क्षेत्रामध्ये दारूबंदी कायम करण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायतीचे रूपांतर महापालिकेत झाल्यानंतर सदर ठिकाणी दारूविक्री परवाना देण्यास सुरूवात झाली आहे. त्यामुळे खारघर परिसरातील जनतेचे मत लक्षात घेऊन जनहिताचा कौल मान्य करत खारघर ग्रामपंचायतीच्या वतीने करण्यात आलेली दारूबंदी पनवेल महानगरपालिकेने देखील कायम ठेवावी,  या धर्तीवर मा. विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी लक्षवेधी सूचना मांडली होती. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ रोजीच्या आयत्या वेळेस विषय क्रमांक १ मध्ये हा विषय चर्चेत आला आणि प्रशासनाने त्यावेळी दारूबंदी संदर्भात ठराव केला. त्यासंदर्भात पुढील कार्यवाही न झाल्यामुळे खारघर परिसरात निरसुख पॅलेस बार यांना राज्य उत्पादन शुल्का कडून दारू विक्री परवाना देण्यात आला.

           दि.१८ डिसेंबर २०१७ रोजी बोलविण्यात आलेल्या महासभेत "पनवेल महानगरपालिका हद्दीमधील पूर्वीच्या खारघर ग्रामपंचायत क्षेत्रांमध्ये दारूबंदी कायम करण्यात आली होती. परंतु ग्रामपंचायतीचे रूपांतर महानगरपालिकेत झाल्यानंतर सदर ठिकाणी दारूविक्री परवाना देण्यास सुरुवात झाली आहे. तरी खारघर परिसर हा पूर्वीप्रमाणेच 'नो लिकर झोन' करण्याचा ठराव सर्वसाधारण सभेमध्ये पारित करण्यात यावा अशी मागणी तत्कालीन विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे यांनी केली होती आणि तत्कालीन सभागृहनेते परेश ठाकूर यांनी पनवेल महापालिका अंतर्गत येणाऱ्या शाळा व महाविद्यालयाच्या १०० मीटर भोवतालच्या शाळांमध्ये हॉटेलचा सर्व्हे करून तेथील दारूविक्री परवाने देखील रद्द करण्यात यावे अशी लक्षवेधी मांडली. 

          या मागणीबाबत पनवेल महापालिकेने सकारात्मक निर्णय घेऊन पूर्वाश्रमीच्या खारघर ग्रामपंचायतीमधील क्षेत्रामधील किरकोळ व घाऊक मद्यविक्री बंदीच्या धोरणाबाबत प्रशासकिय महासभेमध्ये मंजूरी देण्यात आली असून प्रितम म्हात्रे यांच्या मागणीला व पाठपुराव्याला यश आले आहे. 

*कोट*

मी 2017 रोजी खारघर क्षेत्रात दारूबंदी करण्यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती, जर त्याच वेळेस हा निर्णय झाला असता तर आज नागरिकांना खारघर बंद साठी रस्त्यावर येण्याची गरज नसती.याबाबत उशिरा का होईना परंतु  पनवेल महानगरपालिका प्रशासनाकडून योग्य तो निर्णय घेण्यात आला याबद्दल मी समाधानी आहे. परंतु महाराष्ट्र राज्य सरकार आणि राज्य उत्पादन शुल्क यांच्याकडे जोपर्यंत अधिकृत "खारघर नो लीकर झोन" म्हणून नोंद होत नाही तोपर्यंत मी आमच्या महाविकास आघाडीच्या नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली पाठपुरावा सुरूच ठेवणार:- प्रितम जनार्दन म्हात्रे, (विरोधी पक्ष नेता पनवेल महानगरपालिका)

Post a Comment

Previous Post Next Post