गझल प्रेमऋतूची" ला सांडू प्रतिष्ठानचा प्रतिष्ठेचा 'प्रथम' पुरस्कार प्रदानप्रेस मीडिया लाईव्ह : 

मुंबई  ता.२८ ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी (इचलकरंजी )आणि ज्येष्ठ गझलकारा प्रा.सुनंदा पाटील उर्फ गझलनंदा (मुंबई ) यांच्या " गझल प्रेमऋतूची " या गझलसंग्रहाला 'दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठान, चेंबूर, मुंबई ' या संस्थेचा सर्वोत्कृष्ट काव्यसंग्रहाचा ' प्रथम पुरस्कार' प्रमुख पाहुणे वामन हरी पेठे ज्युवेलर्सचे भागीदार आशिष  रामकृष्ण पेठे व विश्वनाथ  प्रकाश पेठे  यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. यावेळी सांडू प्रतिष्ठानचे विश्वस्त आनंद श्रीधर सांडू मंचावर उपस्थित होते.प्रसाद कुलकर्णी व गझलनंदा यांनी तो संयुक्तपणे स्वीकारला.प्रमाणपत्र,सन्मानचिन्ह व पाच हजार रुपये रोख असे पुरस्काराचे स्वरूप होते.स्वागत व सूत्रसंचालन उर्मिला म्हात्रे यांनी केले.आनंद सांडू यांनी प्रास्ताविक केले.यावेळी प्रमुख पाहुणे आशिष पेठे व विश्वनाथ पेठे यांची प्रकट मुलाखत आनंद सांडू यांनी घेतली.त्यातून पेठे ज्युवेलर्सची शतकोत्तर व्यावसायिक वाटचाल उलगडून दाखवली.

यावेळी प्रसाद कुलकर्णी,दिपाली थेटे ,डॉ.क्षमा शेलार,डॉ.रवींद्र तांबोळी, जयश्री भिसे यांनी मनोगत व्यक्त केले.डॉ.क्षमा शेलार,रमेश तांबे,दीपाली थेटे- राव,प्रतिभा जाधव डॉ.रविंद्र लक्ष्मीकांत तांबोळी,जोसेफ तुस्कानो,माधवी कुंटे,वृंदा दाभोलकर आदी साहित्यिकांना त्यांच्या विविध साहित्य प्रकारातील पुस्तकांसाठी गौरविण्यात आहे. परीक्षक म्हणून पुष्पा कोल्हे,  उर्मिला म्हात्रे,आर्या आपटे,जयश्री भिसे,निलीमा मोकल यांनी काम पाहिले.

मराठी साहित्य विश्वात सांडू प्रतिष्ठानच्या पुरस्काराची प्रतिष्ठित पुरस्कारात गणना केली जाते. दत्तात्रेय कृष्ण सांडू प्रतिष्ठानच्या वतीने गेली वीस वर्षे प्रतिवर्षी कविता, कथा, कादंबरी ,ललित, बालसाहित्य आदी साहित्य प्रकारातील उत्कृष्ट ग्रंथांना ' साहित्य पुरस्कार ' देऊन गौरवले जाते. १ एप्रिल २०२० ते ३१ मार्च २०२२ या दोन वर्षातील  पुस्तकांचे एकत्रित परीक्षण करून यावर्षीचे पुरस्कार प्रदान करण्यात आले.

" गझल प्रेमऋतूची " हा गझलनंदा व प्रसाद कुलकर्णी यांचा संयुक्त  गझलसंग्रह गझलविश्वात अतिशय लोकप्रिय ठरला आहे.मराठी गझलेत अनेक वैशिष्ट्यांनी युक्त असलेल्या या संग्रहाला यापूर्वी कोल्हापूर , ठाणे, अहमदनगर आदी विविध भागातील  पुरस्कारांनी सन्मानित केले गेले आहे. आता दत्तात्रेय कृष्ण  सांडू प्रतिष्ठानचा ' प्रथम '  पुरस्कारही प्रदान करण्यात आला. याचा विशेष आनंद होत आहे अशी प्रतिक्रिया गझलकार प्रसाद कुलकर्णी व प्रा.सुनंदा पाटील यांनी दिली. साहित्य,कला यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित असलेला हा पुरस्कार वितरण सोहळा चेंबूरच्या बालविकास संघ सभागृहात अतिशय दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला.पसायदानाने सांगता झाली.

Post a Comment

Previous Post Next Post