राष्ट्रगीत आणि राष्ट्रगानप्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९० )

 Prasad.kulkarni65@gmail. 

आपले राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान याबाबतची चर्चा अनेक कारणानी होत असते . दिल्ली उच्च न्यायालयातील एका जनहित याचिकेवर उत्तर देताना ५ नोव्हेंबर २०२२ रोजी केंद्र सरकारने' जन गण मन ' हे राष्ट्रगीत आणि वंदे मातरम हे राष्ट्रीय गीत यांच्या दर्जा समान असून नागरिकांनी दोघांनाही समान आदर दिला पाहिजे असे मत व्यक्त केले आहे.अश्विनी उपाध्याय यांनी दाखल केलेल्या याचिकेवर सध्या सुनावणी सुरू आहे.तसेच टागोरांनी लिहिलेल्या या राष्ट्रगीता बद्दलही एरवीही काहीतरी वेगळी चर्चा सुरू केली जाते.या निमित्ताने याबाबतचा इतिहास थोडा समजून घेण्याची नितांत गरज आहे.

२७ डिसेंबर १९११रोजी गुरुदेव रवींद्रनाथ टागोर यांनी ' जन गण मन' या गीताचे काँग्रेसच्या कोलकत्ता अधिवेशनात सर्वप्रथम गायन केले होते.बंगाली भाषेत असलेले हे गीत संस्कृतप्रचुर बंगालीत असल्याने अतिशय सहजतेने सर्व भारतीयांना म्हणता येते. या गीतामध्ये म्हणणाऱ्याच्या आणि ऐकणाऱ्याच्याही मनामध्ये मातृभूमी विषयी नितांत प्रेम जागृत करण्याचे मोठे सामर्थ्य आहे .या गीतावर त्या काळातही अनेकांनी टीका केली होती. यातील भारत भाग्यविधाता आणि अधिनायक हे शब्द पंचम जॉर्जला उद्देशून गेले आहेत असे काहींचे मत होते. कारण ज्या दिवशी हे गीत म्हटले गेले त्या दिवशी अधिवेशनाच्या कार्यक्रम पत्रिकेवर भारत भेटीवर आलेल्या पंचम गरजेचे स्वागत करणारा ठराव होता. पण खरे तर त्यावेळी रामभूज चौधरी यांचे 'बादशहा हमारा ' हे हिंदी गीत पंचम जॉर्जच्या स्वागतार्थ म्हटले गेले होते .पण हा वाद बराच काळ चालला .अखेर रवींद्रनाथांनी त्यांचे मित्र पुलिव बिहारी सेन यांना १० नोव्हेंबर १९३७ रोजी लिहिलेल्या पत्रात आपली भूमिका मांडलेली आहे. ते म्हणाले की ,'पंचम जॉर्जसाठी मी गाणे लिहिणे शक्यच नव्हते. तशी विनंती मला करण्यात आली होती हे खरे.पण त्यानेच मी क्षुब्ध झालो. आणि युगानयुगे भारतीय सारथ्य करणाऱ्या ज्या भाग्यविधात्यांचे विजयगीत मला स्पुरले. असंख्य अडीअडचणीतून भारताला मार्ग दाखवणाऱ्या ईश्वराचा मी उल्लेख केला होता.कोण्या पंचम जॉर्जचा नव्हे.'

देशभक्तीपर आणि मातृभूमीविषयी आदरभावना व्यक्त करण्याला गीताला राष्ट्रगीत असे म्हणतात .राष्ट्रगीताला राजमान्यता व लोकमान्यता प्राप्त झालेली असते. राष्ट्रध्वजाप्रमाणेच राष्ट्रगीत हे राष्ट्राचा मानदंड असते .म्हणून त्याचा आदर राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्राविषयाचा अभिमान, स्फूर्तीदायी इतिहास राष्ट्रगीतात असतो .आधुनिक काळामध्ये राष्ट्र- राज्य यांची संकल्पना स्थिरावल्यावर राष्ट्रगीत रूढ झाले. त्या अर्थाने १८२५ साली ग्रेट ब्रिटनमध्ये प्रथम राष्ट्रगीत सुरू झाले . एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीला आणि विसाव्या शतकाच्या प्रारंभी अनेक युरोपीय राष्ट्रांनी राष्ट्रगीताच्या प्रथेचा अवलंब केलेला दिसून येतो.

'जन गण मन 'हे भारताचे राष्ट्रगीत मूळ पाच कडव्यांचे आहे .पण त्यापैकी फक्त पहिलेच कडवे म्हटले जाते .रवींद्रनाथांनी लिहिलेले हे राष्ट्रगीत जरी १९११ साली काँग्रेस अधिवेशनात म्हटले गेले असले तरी भारतीय राज्यघटना समितीने त्याच्या  २४ जानेवारी १९५० रोजी राष्ट्रगीताचा सर्वोच्च बहुमान देत स्वीकारले. हे गीत थोर गायक पंडित विष्णू दिगंबर पलूसकर यांनी स्वरबद्ध केलेले आहे.तथापी या चालीबद्दलही अनेक प्रवाद आहेत.या राष्ट्रगीतात भारताच्या यशोगाचे चे स्मरण केलेले आहे .मातृभूमीच्या जयजयकाराचा घोष त्यामध्ये आहे .भारतमातेला रक्षण करणारी संबोधलेले आहे. भारताच्या विविधतेचे वर्णन करून भारताच्या ऐक्य भावनेला दृढ करण्याचे आवाहनही त्यात आहे.

'वंदे मातरम 'हे भारताचे राष्ट्रगीत आहे. ते थोर बंगाली साहित्यिक बकीमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेले आहे. १८८२ मध्ये त्यांनी लिहिलेल्या 'आनंदमठ 'या कादंबरीने भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला एक वेगळे परिमाण दिले. बकीम चंद्रांनी १८७५ लिहिलेले वंदे मातरम हे गीत या कादंबरीत कथानकाच्या ओघात नेमकेपणाने घातलेले आहे.ते १८९२च्या काँग्रेस अधिवेशनाचे वेळी म्हटले गेले. घटना समितीने २४ जानेवारी १९५० रोजी या गीताला ' राष्ट्र गान ' , म्हणून मान्यता दिली. भारताच्या राष्ट्रगीता संदर्भात घटना समितीचे अध्यक्ष आणि भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांनी म्हटले आहे की,' जन गण मन हे गीत राष्ट्रीय प्रसंगाच्या वेळी गायले जाईल. तसेच 'वंदे मातरम 'या गीतानेही भारताच्या स्वातंत्र्यलढयात ऐतिहासिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे. त्यालाही 'जन गण मन ' या गीता इतकेच श्रेष्ठत्व आहे. '

जन गण मन हे आपले राष्ट्रगीत पूर्वी ब्राम्हो समाजाचे प्रार्थना गीत म्हणूनही म्हटले जात होते.तसेच रवींद्रनाथ संपादक असलेल्या 'तत्त्वबोध प्रकाशिका' या ब्राह्मो समाजाच्या नियतालिकामध्ये ते प्रकाशितही झाले होते. काही वर्षांपूर्वी डॉ. सुरेश चांदवणकर यांनी याबाबत लिहिले होते की, रवींद्रनाथांच्या आवाजात हे गीत ग्रामोफोन कंपनीने ध्वनिमुद्रित केले होते .त्याचे पहिले कडवे इंटरनेटवर व युट्युब वर ऐकायला मिळते. ती चाल कविता वाचनासारखी आहे. विश्वभारती म्युझिक बोर्डाच्या गायन वृंदाने एच.एम. व्ही लेबलवर ,तर हरिपाद चटर्जींच्या समूहाने हिंदुस्थान रेकॉर्डवर हे गाणे टागोरांच्या संगीतात ध्वनीमुद्रित केलेले आहे.

डॉ. चांदवणकरांनी पुढे म्हटले आहे की, आझाद हिंद सेनेच्या स्फूर्ती गीतातही या गीताचा समावेश होता. अश्वथम्मांच्या आवाजात अमीर कल्याणी रागात ओडियन लेबलवर ते ऐकायला मिळते. राजन सरकार यांच्या सुरश्री वाद्यवृंदात कोलंबीया लेबलवरती ते ध्वनिमद्रीत झाले होते. स्वातंत्र्यानंतर राज्यघटनेने राष्ट्रगीताला अधिकृत दर्जा दिल्यावर ग्रामोफोन कंपनीने एक मिनिटाची कंठ व वाद्य संगीताची ध्वनिमुद्रिका आकाशवाणीसाठी बनवली. मात्र अपवादात्मक व विशेष प्रसंगीच ती रेडिओवर वाजवली जाते.' वंदे मातरम' गीताच्या १२५ हून अधिक प्रकारच्या गायन वादनाच्या दोन्ही मुद्रिका निघाल्या.' जन गण मन 'च्या मात्र आठ- दहाच आहेत. २००७ साली भारत बालसमूहाने राष्ट्रगीत गायनाचे व वादनाचे सर्व संकेत धुडकावून आघाडीच्या सर्व गायक, गायिका व वादकांकडून हे गीत गाऊन व वाजवून घेतले. आपल्या या गीताचे रवींद्रनाथ टागोरांनी स्वतःच इंग्रजी भाषांतरही केले होते .ते आजही आंध्र प्रदेशातील मदनपल्ली या गावातील 'बेझंट थिओसोफिकल कॉलेज ' मध्ये उपलब्ध आहे.

'असा घडला भारत ' या ग्रंथामध्ये वंदे मातरम च्या संदर्भात जे लिहिले आहे तेही फार महत्त्वाचे आहे .यात म्हटले आहे ,या गाण्याच्या काही ओळींवर मुस्लिम संघटनानी आक्षेप घेतला. त्यांच्या मते या गाण्यात हिंदूंच्या दुर्गादेवीची तुलना मातृभूमीशी केलेली होती. त्याचप्रमाणे आनंदमठ कादंबरीतील काही अंश मुस्लिम समाजाविरुद्ध संदेश देणारा होता. १९३७ च्या काँग्रेस अधिवेशनात याबाबत बराच वापर झाला. या गाण्यातील पहिली दोन कडवी मातृभूमीच्या सौंदर्याबद्दल, पावित्र्यबद्दल असून नंतरच्या अंतऱ्यामध्ये दुर्गादेवीचा उल्लेख असल्याच निदर्शनास आणल गेल.

याबाबत सुभाष चंद्र बोस यांच्याकडे आपले विचार व्यक्त करताना रवींद्रनाथ टागोर यांनी अशी भूमिका घेतली की ,हे बंगालच्या दुर्गादेवी बद्दलचे स्तोत्र आहे याबद्दल वाद नाही. बंकीमचद्रांनी कादंबरीच्या अखेरीस बंगालची भूमी आणि शक्तीची देवी दुर्गा यात एकत्व सुचित केलेल आहे. पण कोणत्याही मुसलमानाकडून देशभक्तीच्या दृष्टीने त्याने दहा हात असलेल्या देवीची स्वदेशाचे दैवत म्हणून पूजा करावी अशी अपेक्षा ठेवली जाऊ शकत नाही.... संसद ही विविध धर्माच्या लोकांच संघटन करणारी जागा आह.त्यामुळे तिथं हे गाणं संयुक्तिक ठरत नाही. जेव्हा बंगाली मुसलमान आडमुठ्या धर्माँन्मदी ( स्टबर्न फेनॅटिक ) भूमिकेचे सूचन करतात. तेव्हा ती भूमिका सहन करण्याजोगी नाही, अस आपण म्हणतो.जर आपणही त्याच अनुकरण करून गैरवाजवी मागण्या करू लागलो तर ते स्व- पराभूत ( सेल्फ डिफीटिंग)करून घेण्यासारखं ठरेल. पुढे त्यांनी असंही म्हटलं की ,याबाबतीत बंगाली हिंदु त्रस्त झाले आहेत. पण त्यांची चिंता केवळ हिंदून पुरती मर्यादित नसावी. दोन्ही बाजूंच्या भावना तीव्र असल्याने संतुलित न्यायाची आवश्यकता आहे.आपल्या राजकीय उद्दिष्टांसाठी शांती, एकात्मता व सद्भावना राहण आवश्यक आहे.एकमेकांवर कुरघोडी करू पाहणाऱ्या मागण्या करून निर्माण होणारा अंतहीन संघर्ष आपल्याला नको आहे.'

या इतक्या सर्व वादंगा नंतर या गीताला स्वातंत्र्य लढ्यातील ऐतिहासिक भूमिका बजावली असल्याने राष्ट्रगानाचा दर्जा देण्यात आला.पण यानंतरही हा वाद पुन्हा पुन्हा वर उफाळून आला.१९९८  मध्ये भाजप सत्तेवर आला तेव्हा उत्तर प्रदेश सरकारने हे गाणं सर्व शासकीय शाळातून सक्तीच केल.तेव्हा बराच वाद झाला. आणि अखेर पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांनी या गाण्याची सक्ती करण्याची आवश्यकता नसल्याचा निर्णय दिला. पुढे २००६ साली या गाण्याच्या निर्मितीला १२५ वर्षे झाली म्हणून ७ सप्टेंबर २००६ हा दिवस साजरा केला गेला.देशभर दूरदर्शन वरून शाळेतील मुलं हे गाणं जाताना दाखवली गेली. तेव्हाही याबाबत ते सक्तीच केलेल नसतानाही वाद झाला. काही ठिकाणी शाळांनी ते सक्तीचे केलं, तेव्हा काही मुसलमान पालकांनी आपल्या पाल्यांना शाळेत पाठवलं नाही. पण अनेक मुस्लिम,शीख, ख्रिश्चन संघटनाने हे गाणं म्हणण्यास हरकत नसल्याचही स्पष्ट केलं. अशा संमिश्र प्रतिक्रिया व्यक्त झाल्या. काही वाद असले तरी १९५४ च्या जागृती पासून ते २००६ च्या लगे रहो मुन्नाभाई पर्यंत चित्रपटांतील गाण्यांमध्ये 'वंदे मातरम ' या शब्दांचा स्फूर्तीदायी शब्द म्हणून वापर करण्यात आला आहे.ऑस्कर विजेत्या(२००९ ) ए .आर .रहमान यांनी १९९७  मध्ये स्वातंत्र्याला पन्नास वर्षे पूर्ण झाली तेव्हा आधुनिक संगीत रचनेसह वंदे मातरम सादर केलं.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले सदतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली तेहत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)Post a Comment

Previous Post Next Post