चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असल्याचे जाहीर वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटलेप्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील बालेवाडीत काल झालेल्या नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेत राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी महाराष्ट्रातील सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण हे कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात असल्याचे जाहीर वक्तव्य केल्यानंतर वादाला तोंड फुटले आहे.शरद जोशी प्रणित शेतकरी संघटना, शिरोळ तालुका युवासेना तसेच ताुलक्यातील शेतकऱ्यांनी सुद्धा त्यांच्या वक्तव्याचा समाचार घेतला आहे.

चंद्रकांतदादांना या मधील काडीचाही अनुभव नाही

शरद जोशी प्रणित शेतकरी संघटनेच्या युवा आघाडीचे अध्यक्ष संजय कोले यांनी चंद्रकात पाटलांनी केलेलं वक्तव्य निकालस खोटं असल्याचे म्हटले आहे. ते म्हणाले की, रासायनिक खतांमुळे कॅन्सर होतो हे त्यांचे वक्तव्य निकालस खोटं आहे. याबाबत शेतकरी संघटनेने गावोगावी जाऊन कॅन्सरग्रस्तांचे संख्येचे मोजमाप केले होते. त्यांचे वय, आर्थिक परिस्थिती, आनुवांशिकता यांचा अभ्यास केला होता. त्यानंतर इतर तालुक्यांमध्ये जेवढे प्रमाण आहे तेवढंच प्रमाण या तालुक्यात आहे. त्यामुळे चंद्रकांत पाटलांसारख्या मंत्र्यांनी अशा प्रकारची भीती पसरवणारी वक्तव्ये करू नयेत. चंद्रकांतदादांना यामधील काडीचाही अनुभव नाही, अशी आमची खात्री आहे. ते कष्टकरी नाहीत, शेतकरी नाहीत, त्यांचे पोट शेतीवर अवलंबून नाही.

शेतकरी संघटनेने प्रबोधन करणाऱ्या परिषदा आयोजित केल्या आहेत. त्यामुळे चंद्रकांतदादांचा आम्ही निषेध करतो. मंत्री आहेत म्हणून अव्वाच्या सव्वा बोलण्याचे बंद करावे, असेही संजय कोले यांनी म्हटले आहे. शिरोळ तालुक्यातील युवासेना उपप्रमुख वैभव गुजरे यांनी चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याला आक्षेप घेतला आहे. ते म्हणाले की, शिरोळ तालुक्यात सर्वाधिक कॅन्सरचे रूग्ण आहेत ही अफवा आहे. त्यामुळे सर्वत्र शिरोळ तालुक्याच्या भाजीपाल्याकडे संशयाने बघितले जात असून त्याचा शेतकऱ्याला फटका बसत आहे. चंद्रकांत पाटील यांनी केलेले वक्तव्य दुर्दैवी आहे.

चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्याने  संताप..

शिरोळ तालुक्यात महाराष्ट्रातील सर्वाधिक कॅन्सरचे रूग्ण आहेत ही साफ खोटी माहिती आहे. या आधीही अशाच काही दूर्दैवी अफवा पसरवून शिरोळ तालुक्याची बदनामी करण्यात आली आहे. त्याचा परिणाम शिरोळ तालुक्यातील शेतकरी भोगत आहे. तालुक्यातील शेतमाल हा मोठ्या प्रमाणावर मुंबई पुणे कर्नाटक विजापूर पनवेल अशा अनेक ठिकाणी जात असतो. मात्र, गेल्या काही वर्षांत या अनाठायी अफवा पसरवून शिरोळ तालुक्यातील शेतकऱ्याची बदनामी केली जात आहे. आणि ही भीती पसरवून सेंद्रीय शेतीचा प्रसार करण्याचा घाट घातला जात असल्याचे प्रगतीशील शेतकरी श्रेणिक नरदे यांनी म्हटले आहे.

चंद्रकांतदादांसारख्या ज्येष्ठ मंत्र्यांनी कोणतीही माहिती न घेता अशा अफवा पसरविणे चुकीचे आहे. त्यांच्या वक्त्व्याचा आम्ही निषेध करतो. तसेच त्यांनी कोल्हापूर जिल्हा आणि शिरोळ तालुक्याची जाहीर माफी मागावी, असेही त्यांनी म्हटले आहे.

शिरोळ तालुक्यात 2019 मध्ये अजित नरदेंच्या नेतृत्वाखाली आम्ही शेतकरी विज्ञान परिषद घेतली होती. या अफवेसंदर्भात जनजागृती केली होती. त्यानंतर ही चर्चा थांबली होती. मात्र, चंद्रकांत दादांनी परत अशा अफवा पसरवून जनतेत संभ्रमाचं वातावरण निर्माण केले आहे. आमचा विरोध सेंद्रीय शेतीला कदापी नव्हता आणि नाही. दरवर्षीचा येणारा पूर आणि पावसाने होणाऱ्या नुकसानीने आधीच शेतकरी त्रस्त आहे. त्याला कसलाही दिलासा न देता त्याचीच बदनामी करणे दूर्दैवी आहे. चंद्रकांत पाटलांनी जाहीर माफी मागावी, असेही श्रेणिक नरदे म्हणाले.

काय म्हणाले होते चंद्रकांत पाटील...?

पुण्यातील बालेवाडीत काल झालेल्या नैसर्गिक शेती राज्यस्तरीय परिषदेत बोलताना चंद्रकांत पाटील म्हणाले होते की, कोल्हापूर जिल्ह्यातील शिरोळ तालुक्यात ऊस पीक घेतले जाते. त्याला जे पाणी दिले जाते आणि त्यावेळी जी रासायनिक खते घातली जातात. ही खते पिण्याच्या पाण्यामध्ये रासायनिक खते मिसळू लागली. त्यामुळे राज्यातील सर्वाधिक कॅन्सरचे प्रमाण हे शिरोळ तालुक्यात आहे. त्या ठिकाणी वेळीच कॅन्सर लक्षात यावा यासाठी खूप मोठी मिशन्स काम करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post