प्रसारमाध्यमे जनतेचा आवाज झाली पाहिजेत

प्रबोधिनीच्या चर्चा सत्रातील मत

प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी ता.३०, न्यायपालिका, कार्यपालिका आणि विधिमंडळ या तीन स्तंभांबरोबरच लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून प्रसारमाध्यमांकडे पाहिले जाते. या चारही स्तंभाचे स्वतःचे असे अधिकार क्षेत्र आहे.त्यांनी एकमेकात ढवळाढवळ करू नये असा लोकशाहीचा संकेतही आहे.पण आज अन्य सर्व संकेतांप्रमाणे हा संकेतही झुगारून दिला जात आहे .मध्यप्रवाही माध्यमे सत्तेला प्रश्न विचारत नाहीत.आणि सत्ताधारी माध्यमांना सामोरे जात नाहीत. 

अशावेळी ही पोकळी पर्यायी समाज माध्यमे भरून काढत असतात. प्रसार माध्यमे ही जनतेचा आवाज म्हणून काम करत असतात. ते काम त्यांनी प्रामाणिकपणे करावे ही अपेक्षाही असते. सत्याचा अनुल्लेख आणि असत्याचा गाजावाजा फार काळ टिकत नसतो. कारण लोकशाही व्यवस्थेमध्ये जनतेचे सामूहिक शहाणपण नेहमीच महत्त्वाचे ठरत आले आहे हा जगभरचा इतिहास आहे,असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.' प्रसारमाध्यमांचे कर्तव्य व जबाबदारी ' या विषयावर हे चर्चासत्र आयोजित करण्यात आले होते.

या चर्चासत्रामध्ये भारतीय स्वातंत्र्य आंदोलनातील प्रसारमाध्यमांच्या योगदानापासून आजच्या काळातील प्रसारमाध्यमांच्या भूमिकेपर्यंत तसेच सत्तेच्या आधारे होणाऱ्या दमनशाहीपासून आमिषशाहीपर्यंत विविध विषयांची चर्चा करण्यात आली. लोकशाहीमध्ये चारही स्तंभ आपापले कार्य करत असताना अंतिम सत्ता ही लोकांची आहे. म्हणजेच आम जनतेची आहे याचे भान ठेवावेच लागते हे अधोरेखित करण्यात आले. या चर्चेत प्रसाद कुलकर्णी, प्रा.रमेश लवटे,तुकाराम अपराध,डी.एस. डोणे ,दयानंद लिपारे, पांडुरंग पिसे,शकील मुल्ला, महालींग कोळेकर,रामभाऊ ठीकणे,मनोहर जोशी, गजानन आंबी,आनंद जाधव इत्यादी सहभागी झाले होते.

Post a Comment

Previous Post Next Post