भारत जोडो यात्रेची दिशाप्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९० )

 Prasad.kulkarni65@gmail.com

७ सप्टेंबर पासून राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारी ते श्रीनगर ही बारा राज्ये, पाच महिने,छत्तीसशे किलोमीटर अंतर पायी सुरू राहणाऱ्या भारत जोडो यात्रा सुरू झाली आहे. ही यात्रा सुरू होऊन आता पाच आठवडे होऊन गेले आहेत. अर्थात अजून ऐंशी टक्के यात्रा पूर्ण व्हायची आहे. पण पहिल्यापासूनच या यात्रेला जो लोक पाठिंबा मिळत आहे तो निश्चितच स्पृहणीय आहे. माध्यमे चर्चा करत नसली तरी या यात्रेची देशभर चर्चा सुरू आहे. काँग्रेस पक्षामध्ये एक प्रकारचे नवचैतन्य निश्चितपणाने या यात्रेने आलेले आहे .काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीनंतर ही यात्रा अधिक गतिशील होईल यात शंका नाही.

या यात्रेमध्ये भारतातील सव्वादोनशेहून अधिक जन संघटनांनी व त्यांच्या प्रतिनिधींनी सक्रिय सहभाग देण्याचा निर्णय घेतलेला आहे. तो अतिशय स्वागतार्ह आहे. अर्थात सुरुवातीलाच ही पदयात्रा केवळ काँग्रेस पक्षाची नसून सध्याच्या दूषित वातावरणात जनजागरण करण्यासाठी आहे. ही व्यापक भूमिका राहुल गांधींनी मांडलेली होती. मुंबईमध्ये ९ ऑक्टोबर रोजी एक व्यापक बैठक आयोजित करण्यात आली होती त्यामध्ये ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक बी जी पारिख, योगेंद्र यादव ,मेघा पाटकर, तुषार गांधी, फिरोज मिठीबोरवाला, उल्का महाजन,सुभाष वारे यांच्यासह विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झालेले होते.  त्यांनी या यात्रेला पाठिंबा देण्याचे निश्चित केले आहे. या प्रतिनिधींनी काँग्रेस सरकार सर्वांना सोबत घेऊन चालत होते. देशात बंधुभावाचे वातावरण होते. सिव्हिल सोसायटी व सामाजिक संघटनांशी काँग्रेस संवाद करत होते. कायदे आणि विविध कल्याणकारी योजना तयार करताना सर्वंकष चर्चा केली जात होती .पण गेल्या आठ वर्षापासून भाजप सरकार आल्यापासून संविधान ,लोकशाही ,सामाजिक संघटना, सिव्हिल सोसायटी, साहित्यिक, कलाकार अशा सर्वच घटकांचा आवाज दाबला जातो.या विरोधात राहुल गांधी यांनी काढलेली यात्रा ही या हुकूमशाही विरोधातील निर्णायक लढा आहे. म्हणून आम्ही त्यात सहभागी होत आहोत असे मत व्यक्त केले .त्यामुळे ही यात्रा एक प्रकारचे लोकआंदोलन बनलेली आहे.भारत जोडो यात्रेला लोकांचा प्रतिसाद मिळतो आहे. त्यातून जमिनीवरील प्रश्नांचे जनजागरण होत आहे. त्यामुळे सुरुवातीला या यात्रेची खिल्ली उडवणारी भाजप आता थोडी गंभीर झाली आहे. आणि तशा प्रकारची राज्यस्तरावर यात्रा काढण्याचा प्रयत्न त्यांनी कर्नाटक मध्ये सुरू झाला आहे. तसेच गुजरात मध्येही १२ ऑक्टोबरला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा यांनी गौरव यात्रा सुरू केली. अशा पाच यात्रा गुजरात मध्ये निघत आहेत..कदाचित देशभर ही तो सुरू होईल. मात्र त्यात जमिनीवरील प्रश्नांची चर्चा होणार नाही हे स्पष्ट आहे.

भारत जोडो यात्रा अजून ऐंशी टक्के शिल्लक असताना तिच्या यशपयशाची चर्चा करणे योग्य ठरणार नाही. पण जनता, महागाई, बेरोजगारी, राजकीय केंद्रीकरण, भीती ,कट्टरता, द्वेष या साऱ्यावर बोलू इच्छित आहे हे वास्तव नाकारून चालणार नाही.जनतेला बोलकं करणं आणि आपण भयमुक्तपणे बोलू शकतो हा जनतेला विश्वास देणं फार महत्वाचे आहे. भारत जोडो यात्रेकडे राज्यशास्त्रीय व समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून एक अभ्यास  म्हणून बारकाईने पाहावे लागेल.पक्षीय राजकारण ,बांधणी व पुनर्बांधणी करण्याचा प्रत्येक राजकीय पक्षालाच अधिकार आहे. कोणी घोषणा केली म्हणून अमुक मुक्त भारत, प्रमुख मुक्त भारत होत नसतो. तर भारत  लोकशाही पासून धर्मनिरपेक्षतेपर्यंतच्या सर्व संवैधानिक मूल्यांनी युक्त असलेला देश आहे.जनतेच्या नेमक्या प्रश्नांवर,जमिनीवरील बाबींवर जनतेला बोलते करणे आणि नेते मंडळीनी ते ऐकणे फार शहाणपणाच आणि महत्त्वाचं असतं.राहुल गांधी याबाबत यशस्वी ठरत आहेत हे दिसत आहे. त्यांच्या प्रतिमेचे तर संवर्धन होत आहेत पण त्याचबरोबर त्यांची विश्वासार्हता ही वाढते आहे हेहीदिसून येत आहे.

अभिव्यक्ती स्वातंत्र्यापासून सर्वच घटनात्मक मूल्यांची गळचेपी होत असताना ,सत्तेला विरोध म्हणजे राष्ट्रद्रोह अशी अत्यंत विकृत व्याख्या केली जात असताना सुरू असलेली ही भारत जोडो यात्रा व तिला मिळत असलेला लोकपाठिंबा निश्चितच महत्वाचा आहे.हे या यात्रेतून घडत आहे याला मोठा राजकीय अनव्यार्थ आहे.तो सुदृढ राजकीय भूमिकेतून समजून घेतला पाहिजे. या यात्रेचा राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक अशा सर्व अंगांनी बारकाईने केलेला अभ्यास झाला पाहिजे. खऱ्या अर्थाने भारताचा शोध घेण्यासाठी तो उपयुक्त ठरेल.

'भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व 'या भारतीय राष्ट्रवादाच्या व्यापक पायाला सांस्कृतिक राष्ट्रवादाच्या संकुचित विचारांचा सुरुंग लावण्याचे काम गेली काही वर्षे अतिशय पद्धतशीर पणाने सुरू आहे .पूर्वीची कुजबुज यंत्रणा जाऊन आता त्या जागी जाहीरता प्रस्थापित झालेली आहे. ही यात्रा जरी केवळ काँग्रेसची नसली तरी या निमित्ताने काँग्रेसची चर्चा करणे ही गरजेचे आहे. भारतीय स्वातंत्र्य आंदोलनात काँग्रेस हा मुख्य प्रवाह होता .तसेच डावे आणि समाजवादी गटही होते.२८ डिसेंबर १८८५ रोजी मुंबईत झालेल्या बैठकीत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली होती. त्यावेळी बॅ. उमेशचंद्र बॅनर्जी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे पहिले अधिवेशन झालेले होते. त्यामध्ये फिरोजशहा मेहता ,दादाभाई नौरोजी, दिनशा वाछा, न्यायमूर्ती रानडे ,बद्रुद्दीन तय्यबजी, रा.गो. भांडारकर ,आगरकर, लोकमान्य टिळक ,पंडित मोतीलाल नेहरू, गोपाळकृष्ण गोखले ,पंडित मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय यांच्यासह देशभरातील बहात्तर नामवंत सहभागी झालेले होते.

या अधिवेशनात अध्यक्ष बॅ.उमेशचंद्र बॅनर्जी यांनी चार उद्दिष्टे स्पष्ट केलेली होती .ती म्हणजे ( १) देशाच्या विविध भागातील राष्ट्रवादी राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित करण्यास उत्तेजन देणे .(२) जात, धर्म, प्रांत भेद विरहित राष्ट्रीय एकात्मतेच्या भावनेचा विकास करणे.(३)  महत्त्वाच्या निगडीच्या प्रश्नांवरील लोकांच्या मागण्या सरकार पुढे मांडणे.(४) देशात विविध प्रश्नांवर लोकमत तयार करणे आणि त्यांचे संघटन करणे. ब्रिटिश राजवटीच्या काळात ब्रिटिशांविरोधी लढ्याचा तो एक राजकीय आवाज होता. आज भारत जोडो यात्रा एतद्देशीय  सरकारच्या हुकूमशाही व मनमानी धोरणाविरोधात आहे. स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत असताना स्वातंत्र्याच्या सर्व मूल्यांची मोडतोड व तोडफोड केली जात आहे.या पार्श्वभूमीवर अनेक अर्थाने महत्त्वाची ठरू शकते.

२६ डिसेंबर १९२३ रोजी आंध्र प्रदेशातील कोकोनाडा येथे काँग्रेसचे अडतीसावे अधिवेशन झाले होते.त्यामध्ये पंडित नेहरू यांनी काँग्रेस स्वयंसेवकांची संघटना असावी असा ठराव मांडला होता. त्यातूनच पुढे काँग्रेस सेवा दल ही संघटना तयार झालेली होती. पत्रकार आणि स्वातंत्र्यसैनिक डॉक्टर नारायण सुब्बाराव हर्डीकर हे त्याचे अध्यक्ष होते. २६ डिसेंबर १९२४ रोजी बेळगाव येथे महात्मा गांधी यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचे एकोणचाळीसावे अधिवेशन झाले .गंगाधरराव देशपांडे  स्वागताध्यक्ष असलेल्या या अधिवेशनापासून डॉ. हर्डीकर यांच्या नेतृत्वाखालील काँग्रेस सेवा दल अधिक सक्रिय झाले. त्यानंतर प्रभात फेऱ्या, स्फूर्ती गीते ,स्वातंत्र्याचे पोवाडे, व्याख्याने, शिबिरे या आधारे काँग्रेस सेवा दलाने अतिशय भरून स्वरूपात काम केले. पण स्वातंत्र्य मिळाल्यानंतर काँग्रेस सेवा दल संघटनेची गरज असून सुद्धा ती दुर्लक्षित आणि कमजोर झाली. पक्षीय कार्यकर्त्यांच्या प्रबोधनाकडे, सेवावृत्तीकडे ,दलवृत्तीकडे दुर्लक्ष केल्यामुळे काँग्रेसची पक्ष म्हणून कमालीची दुरावस्था झाली. आज झालेली अवनती हे त्याचेच कारण आहे. म्हणूनच भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने काँग्रेसने पक्ष म्हणून उभारी घेण्याबरोबरच काँग्रेस सेवा दलाची उभारणीही करण्याची गरज आहे. नव्याने निवडून येणाऱ्या काँग्रेसच्या अध्यक्षांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. भारत जोडो यात्रेतून हा संदेश स्वीकारणे ही पक्ष नेतृत्वाची, पक्षाची आणि आजच्या अस्वस्थ वर्तमानात देशाचीही गरज आहे. भारत जोडो यात्रेतून राष्ट्रवादी विचारांचे जनजागरण आणि जनसंघटन होणे गरजेचे आहे. ही यात्रा केवळ प्रतिक्रियावादी न राहता सक्रियता आणणारी ठरली पाहिजे. या यात्रेत काँग्रेसेतर सहभागी झालेल्या मंडळीनाही  भारतीयत्व हेच राष्ट्रीयत्व आणि भारतीय राष्ट्रवाद यांच्या प्रस्थापनेच्या दिशेने ही यात्रा जावी असे वाटते यात शंका नाही.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे गेले सदतीस वर्षे कार्यकर्ते आहेत. तसेच गेली तेहत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)Post a Comment

Previous Post Next Post