पुणे महागरपालिकेचे या शिक्षण क्षेत्राप्रती असलेले दुर्लक्ष पुन्हा चव्हाट्यावर

 महानगपालिका पुरेसे वेतन देत नाही; त्यामुळे फक्‍त 120 शिक्षकच नोकरीवर रुजू झाले आहेत.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे महागरपालिकेचे  या शिक्षण क्षेत्राप्रती असलेले दुर्लक्ष पुन्हा चव्हाट्यावर आले आहे. विविध शाळांत नियुक्‍ती करण्यासाठी पालिकेने 289 जणांना नियुक्‍तीपत्र दिले होते. पण, महानगपालिका पुरेसे वेतन देत नाही; त्यामुळे फक्‍त 120 शिक्षकच नोकरीवर रुजू झाले आहेत.

करोना काळात खासगी शाळांतील विद्यार्थ्यांची शालेय फी थकल्यामुळे अनेक पालकांनी पालिकेच्या शाळांमध्ये पाल्यांना प्रवेश दिले. त्यामुळे साहजिकच महानगरपालिका शाळांचा पट वाढला आहे. त्यामुळे शिक्षक-विद्यार्थी गुणोत्तर लक्षात घेता 350 शिक्षकांची भरती होणे आवश्‍यक होते. त्यातील 289 उमेदवारांना नियुक्तीपत्र देण्यात आली. पण, या शिक्षकांना एकवट 15 हजार रुपये दरमहा मानधन दिले जाते. महागाईच्या या काळात इतके वेतन अपुरे असल्याची काही शिक्षकांची भूमिका आहे. त्यामुळे त्यांनी नोकरी नाकारली असल्याची शक्‍यता आहे. तर, शेजारच्या पिंपरी चिंचवड महापालिकेतील कंत्राटी शिक्षकांना 25 हजार रुपये दरमहा मानधन दिले जाते. पण, पुणे महापालिका मात्र याबाबत निर्णय घेत नसल्याने अनेक वर्ग शिक्षकांविनाच आहेत. त्यामुळे थेट मुलांच्या शिक्षणावर परिणाम होत आहे.

सामान्य कुटुंबांतील मुलांच्या भविष्यासाठी तातडीने आवश्‍यक शिक्षक भरती करावी. महानगरपालिका शाळांतील विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचे शिक्षण व सुविधा देण्यासाठी योग्य ती कारवाई करण्यात यावी, ही आमची मागणी आहे.

– नितीन कदम, अध्यक्ष, अर्बन सेल, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष

Post a Comment

Previous Post Next Post