पुणे – मनपा कडून वीज बचती सोबतच, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि बंडगार्डन बंधाऱ्यातून वीज निर्मिती केली जाणार


प्रेस मीडिया लाईव्ह :

 पुणे – मनपा कडून वीज बचती सोबतच, सांडपाणी शुद्धीकरण प्रकल्प आणि बंडगार्डन बंधाऱ्यातून वीज निर्मिती केली जाणार आहे. यासाठी सल्लागाराकडून सविस्तर प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्यात येत आहे. या प्रकल्पातून दिवसाला 4,800 युनिट्‌स वीज निर्मिती होऊ शकण्याचा अंदाज आहे. दरम्यान, शहरातील 10 सांडपाणी शुद्धीकरण केंद्रातून नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यातूनही वीज निर्मिती करण्यासाठी काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे महापालिकेची वीज खर्चात बचत होणार आहे.

महापालिकेचा वीज खर्च वर्षाला 150 कोटींवर गेला आहे. त्यामुळे बचतीसाठी उपाययोजना सुरू केल्या असून केंद्रशासनाच्या अख्त्यारितील “महाप्रीत’ कंपनीकडे हे काम देण्यात आले आहे. त्याअंतर्गत वीज बचतीचा आराखडा तयार केला जात असून सौरउर्जेचा वापरही केला जाणार आहे. मात्र, त्या सोबतच आता पालिकेने नदीतील पाण्यापासून वीज निर्मितीसाठी पुढाकार घेतला आहे.

दरम्यान, मुळा-मुठा नदीवर बंडगार्डन येथे बंधारा उभारलेला आहे. तर नदी सुधार प्रकल्पात हा बंधारा महत्त्वाचा ठरणार आहे. येथून मुठा नदीत सोडल्या जाणाऱ्या पाण्यावर हा प्रकल्प उभारला जाणार आहे. प्राथमिक माहितीनुसार या पाण्याद्वारे प्रत्येक तासाला 200 युनिट वीज निर्मिती शक्‍य आहे.

सांडपाणी प्रकल्पातूनही वीज निर्मिती

बंडगार्डन बंधाऱ्यासह शहरातील दहा सांडपाणी केंद्रांतून मुठा नदीत सोडण्यात येणाऱ्या पाण्यातूनही पालिका वीज निर्मिती करणार आहे. मुठा नदीकाठावर उभारलेल्या या प्रकल्पांचे नूतनीकरण केले जाणार आहे. या कामासोबतच हे वीज निर्मिती युनिट उभारले जाणार आहेत. यातील काही केंद्रावर प्रत्येक तासाला 50 युनिट वीज निर्मिती शक्‍य असून, ही वीज प्रकल्पाच्या अंतर्गत भागांतील कामांसाठी वापरली जाणार आहे.

Post a Comment

Previous Post Next Post