पनवेलचा शिंदे गट भाजपच्या दावणीला..?

 "फक्त शेकापच्या बालेकिल्ल्यातच शिवसेना फुटत असल्यामुळे चर्चेला उधाण!"

प्रेस मीडिया लाईव्ह 

सुनील पाटील :

  सध्या पनवेल महानगरपालिका क्षेत्रात निवडणुकीचे वारे वाहत आहेत. अशातच महानगरपालिका क्षेत्रात खातेही न उघडलेल्या शिवसेनेला आता ही निवडणूक प्रतिष्ठेची बनलेली आहे. परंतु पनवेल मधील चित्र पाहिले तर वेगळे आहे येथील भाजप नेत्यांनी शेतकरी कामगार पक्षाला शह देण्यासाठी शिंदे गटाला ताकद देण्यास सुरुवात केली आहे अशी चर्चा पनवेलमध्ये सध्या रंगत आहे त्याचे कारणही तसेच आहे.

       सर्वप्रथम शेकापचा बालेकिल्ला असलेला *"कळंबोली विभाग"* जिथून नेहमी शेतकरी कामगार पक्षाला आघाडी मिळते ज्या ठिकाणाहून शेकापचे नगरसेवक जास्त प्रमाणात निवडून येतात तिथून शिंदे गटाचे नेते श्री.रामदास शेवाळे यांचे नाव शिंदे गटामधून नेतेपदी जाहीर झाले. त्यानंतरच आमदार बाळाराम पाटील यांचे प्राबल्य असणाऱ्या *"तळोजे परिसरातून"* तिथे शेकापची ताकद आहे तिथूनच शिवसेनेचे श्री.परेश पाटील यांनी शिंदे गटात प्रवेश केला. त्यांच्यासोबत पनवेल शहरांमधील *"प्रभाग क्रमांक 18"* जो विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे यांचा प्रभाग आहे आणि तिथे शेतकरी कामगार पक्षाला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आहे भविष्यात पनवेल शहरातून श्री.प्रितम म्हात्रे यांना पनवेलकरां कडून झूकते माप मिळण्याची शक्यता आहे त्या पनवेल शहरातून शिवसेनेचे श्री.प्रथमेश सोमण यांनी शिंदे गटात प्रवेश केला. यानंतर खांदा कॉलनी परिसरातील शिवसेनेचे नेतृत्व सक्षम नाही त्यातच भाजपमधून शेकापमध्ये प्रवेश केलेले श्री.गणेश पाटील यांच्यामुळे शेतकरी कामगार पक्षाचा खांदा कॉलनी विभागात एक नवचैतन्य संचारले होते. खांदा कॉलनी मधील काही परिसर हा विरोधी पक्ष नेते श्री.प्रितम म्हात्रे यांच्या प्रभागात मोडला जातो त्यांनी केलेले कामही भविष्यात शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक निवडून आणण्यास सोयीचे आहे हे हेरून पूर्वाश्रमीचे शेतकरी कामगार पक्षाचे माजी नगरसेवक नंतर काँग्रेसवासी होऊन पुन्हा आमदार श्री.विवेक पाटील यांची माफी मागून शेतकरी कामगार पक्षात स्वगृही परतलेले श्री. शिवाजीराव थोरवे यांना शिंदे गटाने गळाला लावले. या सर्व घडामोडीत महाविकास आघाडीचा मुख्य घटक असलेला शेतकरी कामगार पक्षाचे खच्चीकरण होत असल्याची जाणीव शेतकरी कामगार पक्षाच्या कार्यकर्त्याला होत आहे.

    भाजपाने सुद्धा ज्या ठिकाणी आपले नगरसेवकच नाही त्या ठिकाणी शेतकरी कामगार पक्षाचा उमेदवार असेल तर त्या प्रभागा मध्ये शिवसेनेची जी निर्णायक मते आहेत ती वाढवण्यासाठी आणि वळवण्यासाठी शिंदे गटाला *पनवेल, खांदा कॉलनी, तळोजे, कळंबोली* या ठिकाणी काही पाच ते आठ जागा सोडून शेकापच्या बालेकिल्ल्यातच सुरुंग लावून त्यांना गुंतवून ठेवण्यासाठी चांगल्या प्रकारे रणनीती आखली आहे. जेणेकरून भविष्यात हे नगरसेवक जर निवडून आले तरी ते भाजपचेच नगरसेवक म्हणून भाजपलाच मतदान करतील.

      तसेच भाजपा मध्ये सुद्धा नगरसेवक पदासाठी इच्छुकांची भाऊ गर्दी भरपूर आहे त्यामुळे शेतकरी कामगार पक्षातून आयात केलेल्या उमेदवाराला जर ऐनवेळी तिकीट दिले तर बंडखोरी होऊन भाजपाची जागा धोक्यात येऊ शकते हे टाळण्यासाठी शिंदे गट उत्तम पर्याय आहे त्यांना ताकद दिली तर स्वपक्षातील इच्छुकांना सुद्धा वरिष्ठांचा आदेश आहे  असे उत्तर देऊन गप्प करता येईल असे राजकीय विश्लेषकांचे मत आहे.

   महाविकास आघाडीतील शेकापच अस्तित्व अगोदरच नगरसेवक आणि पक्षांतर केल्यामुळे संख्या बळ कमी झाले आहे सद्यस्थितीला ही संख्या टिकवणे हे शेकापच्या पुढे आव्हान असेल. शिवसेनेला खारघर किंवा कामोठे परिसरातून एक आकडी संख्या जरी मिळाली तरी सुद्धा खाते उघडल्याचे समाधान मातोश्रीवर असेल. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला सध्या परिस्थिती नुसार दोन किंवा तीन नगरसेवक आले तरीसुद्धा आमची ताकद कमी झाली नाही याचे समाधान मिळेल.

     खरी कसोटी शेकाप नेतृत्वाची आहे. सध्या त्यांना पक्ष वाढवण्यापेक्षा आहे ते संख्याबळ टिकवणे हे महत्त्वाचे आहे जेणेकरून भविष्यातील होणाऱ्या इतर निवडणुकांमध्ये शेकापला बळ मिळेल. जर शेतकरी कामगार पक्षाने 'एकला चलो रे' ची भूमिका घेतली तरीसुद्धा आहे त्या संख्याबळानुसार पुढील पाच वर्षे विरोधी पक्षनेतेपद शेतकरी कामगार पक्षाकडेच राहू शकते किंवा त्रिशंकू स्थिती उद्भवल्यास सत्तेचा रिमोट कंट्रोल हा शेतकरी कामगार पक्षाकडे असेल असे राजकीय विश्लेषकांकडून वर्तवण्यात येते.

Post a Comment

Previous Post Next Post