शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारली



प्रेस मीडिया लाईव्ह :

मुंबई : शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आज आर्थर रोड तुरुंगामध्ये असणारे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारली असल्याचे सांगण्यात येत आहे.पत्राचाळ प्रकरणातील गैरव्यवहारा प्रकारणामध्ये ईडीने राऊत यांना अटक केली आहे. ५ सप्टेंबर रोजी संजय राऊत यांच्या न्यायालयीन कोठडीत १४ दिवसांनी वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे राऊत आता १९ सप्टेंबरपर्यंत कोठडीमध्येच असणार आहेत.

उद्धव ठाकरेंना संजय राऊत यांना भेटण्याची परवानगी नाकारताना तुरुंग प्रशासनाने, "त्यांना भेटायचं असेल तर यासंदर्भात उद्धव ठाकरेंनी न्यायालयाची परवानगी घ्यावी" असे सांगितले आहे. सर्वसामान्य कैद्यांना ज्यापद्धतीने भेटायची व्यवस्था असते तशाच पद्धतीने उद्धव यांना संजय राऊतांना भेटता येईल असे तुरुंग प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

उद्धव ठाकरेंनी राऊत यांना जेलरच्या रुममध्ये भेटण्यासंदर्भात परवानगी मागितली होती. मात्र अशी विशेष परवानगी देता येणार नाही. इतर सर्वसामान्य कैद्यांप्रमाणेच ठाकरेंना राऊत यांना भेटता येईल, असं तुरुंग प्रशासनाकडून कळवण्यात आलं आहे.

समोर आलेल्या वृत्तानुसार यासंदर्भात उद्धव यांनी कोणतेही लेखी निवेदन तुरुंग प्रशासनाला दिले नव्हते. उद्धव यांच्या तर्फे एका व्यक्तीचा फोन तुरुंग प्रशासनाकडे आला होता. उद्धव ठाकरेंना संजय राऊतांना पोलीस अधीक्षकांच्या रुममध्ये भेटायचं आहे असे सांगण्यात आले. मात्र तुरुंग अधीक्षकांनी राऊत यांना भेटायचे असेल तर सर्वसामान्य व्यक्तींप्रमाणे भेटावे मात्र ही भेट घेण्यासाठीही न्यायालयाची परवानगी घ्यावी लागेल असे सांगण्यात आले

Post a Comment

Previous Post Next Post