कविता हा सहजोद्गार असला तरी तिच्या निर्मिती प्रक्रियेचे शास्त्र असते.वाचन,लेखन आणि श्रवण या कलांनी मानवी जीवन समृद्ध केले आहे... प्रसाद कुलकर्णी



प्रेस मीडिया लाईव्ह :

जयसिंगपूर ता. ३० साहित्य हे स-हित नेणारे असले पाहिजे. लेखन हा शरीर आणि मनाला व्यापून टाकणारा व्यायाम असतो. लेखक हा आत्मजीवनाचा ,त्याच्या काळाचा आणि युगाचाही भाष्यकार असतो. समाजाला दृष्टा विचार देण्याचे काम कवी व लेखक करत असतात. म्हणूनच साहित्याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. कविता हा सहजोद्गार असला तरी तिच्या निर्मिती प्रक्रियेचे शास्त्र असते.वाचन,लेखन आणि श्रवण या कलांनी मानवी जीवन समृद्ध केले आहे, असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस व ज्येष्ठ गझलकार प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले .ते जयसिंगपूर महाविद्यालयाच्या वतीने आयोजित वाङ्मय मंडळाचे उद्घाटक आणि कवी संमेलनाचे अध्यक्ष म्हणून बोलत होते.

स्वागत व  प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ . नितीश सावंत यांनी केले. उपप्राचार्य सुनील बनसोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांच्या सुत्रसंचालनात हे कवी संमेलन संपन्न झाले.यावेळी महाविद्यालयाच्या मराठी,हिंदी व इंग्रजी विभागाच्या भित्तीपत्रकांचेही      अनावरण करण्यात आले.

कवी संमेलनाच्या प्रारंभी अभिजीत पाटील( सांगली )यांनी आपली 'मोबाईल' ही कविता सादर करून युवा मनाचा वेध घेतला. त्यांच्या 'तू बोलायचीस आणि बोलतच राहायचीस'... या कवितेने उपस्थितांची मने जिंकून घेतली आणि 'कवीची बायको' या गंभीर कवितेने समारोप केला.

कवी आबासाहेब पाटील ( मंगसुळी )यांनी 'मोनालिसा' या कवितेतून तरुणांच्या मनातील प्रेम आणि दारिद्र्य यातील संघर्ष रसिकांना भावेल अशा अभिव्यक्तीत पोहोचविला. 'काळीज आतून जळतंय' या कवितेत ते म्हणतात-

मला तर काय माहित,

 टीव्ही मधली छलकाटी बाई म्हणाली

 तेव्हा कळालं की घामात किटाणू असतात.

 मग कसं काय झालं नाही बरं इन्फेक्शन ज्वारीच्या कणसाला अन् गव्हाच्या लोंबीला

 आमच्या घामाचं..?"

 अशा उपहासात्मक शब्दांतून त्यांनी श्रीमंती आणि गरिबीतील  उपहासात्मक भेद व्यक्त केला.

प्रा.डॉ.सुनंदा शेळके यांनी 'धुकटात हरवली वाट' ही निसर्ग- प्रेम कविता सादर केली. त्याचबरोबर 'इंग्रजीतच प्रेम करते अन् मराठी लाजते'... ही हजल ऐकविली. 'ऊन माथी झेलताना'... या गझलेमधून  शेतकऱ्याचे कष्टमय आणि दारिद्र्याने भरलेले जीवन मांडले.प्रसाद कुलकर्णी यांनी 'हे मीपण जातच नसते जग सारे फिरल्यानंतर, वैश्विकता येते ध्यानी घरट्यात परतल्यानंतर ' आणि ' शब्दात कशाला सांगू इतकाच खुलासा करतो, या काळजात फक्त तुला मी वावरताना बघतो ' यासारख्या आशयघन गझला सादर करून संमेलनाचा समारोप केला. वांड्:मय मंडळ समन्वयक डॉ संदीप तापकीर यांनी आभार मानले. या कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक वृंद आणि विद्यार्थी-विद्यार्थिनी यांचा उत्तम प्रतिसाद लाभला.

Post a Comment

Previous Post Next Post