स्वातंत्र्य पाहिलेली माणसे.....प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :- श्रीमती ठकनबाई निवृत्ती निकाळजे यांनी स्वातंत्र्याच्या दिनानिमित्त काही आठवणी सांगितल्या. श्रीमती ठकनबाई निकाळजे या वर्ष १९४७-४८  मध्ये इयत्ता दुसरी मध्ये शिकत होत्या  . त्या वेळेच्या स्वातंत्र्यदिनी ज्या काही आनंदोत्सवाच्या घटना घडल्या, त्या त्यांनी त्यांच्या शब्दात व्यक्त केल्या. श्रीमती निकाळजे त्यावेळी आठ वर्षाच्या होत्या. पण त्यांच्या मनात आजही स्वातंत्र्याच्या आठवणी तितक्याच घर करून बसलेल्या  आहेत . श्रीमती निकाळजे त्यावेळी पुणे  शहरातील  औंध व दापोडी याच्या मध्यभागी असलेल्या सध्याच्या एस.टी. वर्कशॉप जवळील सांगवी गावात राहात होत्या. त्यावेळी सांगवी गावाची लोकसंख्या ४००  उंबरे म्हणजे ४०० घरे होती. त्यावेळी शाळेमध्ये बाकडे किंवा फरशा नसायच्या, म्हणून घरूनच प्रत्येकाने पोते घेऊन शाळेत जायचे व ते पोते खाली अंथरून त्यावर बसून शाळेचा अभ्यास करायचा. त्यावेळी काटे मास्तर, सुतार बाई व सुतार सर हे पोट तिडकेने विद्यार्थ्यांना शिकवायचे. अधून मधून आम्हा शाळकरी मुलांच्या कानावर स्वातंत्र्याच्या चर्चा   पडत. कालांतराने भारताला स्वातंत्र्य मिळाले. तो दिन आज ७५  वर्षे होऊनही  तेवढाच ताजा  आहे. सांगवी मधील शाळेमध्ये झेंडावंदन झाले. या झेंडावंदनाला विद्यार्थी-  शिक्षक, त्यावेळचे पोलीस पाटील बाळासाहेब, गावकरी,   ज्ञानोबा पाटील उपस्थित होते. झेंडावंदन झाल्यानंतर संपूर्ण सांगवी गावामध्ये विद्यार्थी व गावकऱ्यांनी फेरी काढली.  विद्यार्थी पुढे व गावकरी मागे होते. तत्पूर्वी शाळेमध्ये लाडूचे खाऊ वाटप झाले. ही फेरी गावामध्ये चालू असताना काटे मास्तर, सुतार बाई,  सुतार सर यांनी तयार केलेले गाणे आम्ही गात चाललो होतो. त्यातील काही शब्द पुढीलप्रमाणे:-

             भारत माझा स्वतंत्र झाला,

             गरुडा येथे थांब जरासा, 

            गरजत  गरजत  दहाही दिशांना, 

             उडवा सर्वांच्या झोपा, 

             भारत माझा स्वतंत्र झाला.....

त्या दिवशी संपूर्ण सांगवी गावामध्ये एक प्रकारे सण, उत्सव साजरा केला गेला. यावेळी प्रत्येक घरामध्ये गावकऱ्यांनी पुरणपोळीचे जेवण तयार केले होते. गावातील सर्व कामगारांना सुट्टी जाहीर केली होती. आज भारताच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षे पूर्ण होताना पाहताना खूप आनंद होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post