पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात मोठय़ा जल्लोषात श्रीगणरायाचे आगमन झाले.


प्रेस मीडिया लाईव्ह :

मुरलीधर कांबळे :

 पश्चिम महाराष्ट्रात सातारा, सांगली, कोल्हापूर, नगर आणि सोलापूर जिल्ह्यात मोठय़ा जल्लोषात श्रीगणरायाचे आगमन झाले.  सार्वजनिक मंडळांसह घरोघरी वाजतगाजत आणि भक्तिपूर्ण वातावरणात गणरायाचे स्वागत करण्यात आले. गणपती अथर्वशीर्ष, गणेश मंत्राचा जप अशा धार्मिक वातावरणात बाप्पाची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. उकडीच्या मोदकांचा नैवेद्य, सुवासिक अत्तर, जास्वंदाची फुले अर्पण करून बाप्पाची मनोभावे पूजा करण्यात आली.कोल्हापुरात चैतन्याचे वातावरण : 
कोल्हापूर जिल्ह्यात घरोघरी आणि सार्वजनिक तालीम मंडळांत श्रीगणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. गणेश आगमनाच्या पार्श्वभूमीवर सर्व जिल्ह्यात चैतन्य आणि मांगल्याचे वातावरण आहे. रात्री उशिरापर्यंत कोल्हापूर शहरातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या गणेशाचे वाजतगाजत आगमन होत होते.

यंदा गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर दोन आठवडय़ांपासूनच सार्वजनिक मंडळात श्रींच्या मूर्ती वाजत-गाजत दाखल झाल्या आहेत. गणेश चतुर्थीच्या पूर्वसंध्येपासूनही ढोलताशे, हलगी-कैचाळ अशा पारंपरिक वाद्यांसह लेझर शोच्या झगमगाटात आणि साऊंड सिस्टिमच्या दणदणाटात रात्री उशिरापर्यंत श्रीगणेशाचे भव्य मिरवणुकीने आगमन होत होते. आगमनाच्या मुख्य दिवशी बापट कॅम्प, शाहूपुरी, पापाची तिकटी आदी कुंभार गल्लीत सकाळपासूनच अबालवृद्धांनी लाडक्या बाप्पाला घरी घेऊन जाण्यासाठी गर्दी केली होती. 'गणपती बाप्पा मोरया', 'मंगलमूर्ती मोरया'च्या अखंड जयघोषात घरोघरी श्रींचे आगमन होत होते .

.सांगलीत वाजतगाजत 'श्रीं'चे आगमन

'मंगलमूर्ती मोरया'च्या गजरात बुधवारी गणरायाचे वाजतगाजत आगमन झाले. दुपारी काही वेळ वरुणराजाचेही आगमन झाले होते. शहरातील हजारो घरांत विधिवत 'श्रीं'ची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्याचप्रमाणे सकाळपासून रात्रीपर्यंत विविध मंडळांच्या कार्यकर्त्यांनी वाद्यांच्या निनादात बाप्पांचे स्वागत केले. सकाळी सांगलीतील प्रसिद्ध गणपती पंचायतन संस्थानच्या गणेशाची पालखी मिरवणूक काढण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post