प्रबोधन वाचनालयात डॉ.रंगनाथन यांना अभिवादन



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी ता.१२ समाजाची सांस्कृतिक व वैचारिक उंची मोजण्याचे महत्वाचे परिमाण म्हणजे सार्वजनिक ग्रंथालये होय.ज्ञानाधिष्ठीत समाज निर्माण करण्यासाठी सार्वजनिक ग्रंथालये अधिक सक्षम करावी लागतील. त्यासाठी राजकीय व सामाजिक पातळीवर मोठे सक्रिय सहकार्य व पाठबळ उभे राहिले पाहिजे. डॉ. एस. आर. रंगनाथन यांचे ग्रंथालय चळवळीत अमूल्य योगदान आहे.ते विचार घेऊन पुढे जाण्याची गरज आहे असे मत ज्येष्ठ लेखक,शिक्षक व प्रबोधन वाचनालयाचे सभासद मधुकर आपटे यांनी व्यक्त केले. ते समाजवादी प्रबोधिनी व प्रबोधन वाचनालयाच्या वतीने भारतीय ग्रंथालय चळवळीचे जनक डॉ.एस.आर. रंगनाथन यांच्या १३० व्या जन्मदिनी अभिवादन करताना बोलत होते. यावेळी त्यांच्या हस्ते डॉक्टर रंगनाथन यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.

 यावेळी बोलताना प्रसाद कुलकर्णी म्हणाले , सार्वजनीक ग्रंथालयासारखी ज्ञानदानाची सांस्कृतिक केंद्रे व समाज एकमेकांपासून दुरावणे हे कोणत्याही काळात अराजकतेला आमंत्रण असते. सार्वजनिक ग्रंथालयांचा उपयोग समाजातील प्रत्येक घटकाने करून ग्रंथालय चळवळ ही सामाजिक जीविताची चळवळ बनवली पाहिजे.आजच्या एकूणच सार्वत्रिक अस्वस्थतेच्या वातावरणात ग्रंथच आधार देऊ शकतात. म्हणूनच व्यक्ती विकासातून राष्ट्र विकासाची चळवळ पुढे नेणे हीच डॉ.एस.आर.रंगनाथन यांना खरी आदरांजली ठरेल.यावेळी पांडुरंग पिसे ,सौदामिनी कुलकर्णी, नंदा हालभावी, अश्विनी कोळी ,राजेंद्र देशिंगे ,मधुकर धुमाळ, कृष्णात सुतार, प्रवीण रावळ,मनोहर जाधव यांच्यासह अनेकजण उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post