समाज शिक्षक ' प्रधान मास्तर

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

 ( ९८ ५०८ ३० २९० )

 Prasad.kulkarni65@gmail.com


शुक्रवार ता. २६ ऑगस्ट २०२२ रोजी समाज शिक्षक' प्रधान मास्तर ' यांची जन्मशताब्दी आहे. स्वीकारलेल्या मूल्यांवर प्रखरनिष्ठा ठेवून आणि आदर्श व त्यागमय जीवनाचा एक वस्तू पाठ प्रा.ग.प्र. प्रधान म्हणजेच 'प्रधान मास्तर 'यांनी घालून दिला. १६ ऑगस्ट १९२२ रोजी जन्मलेले प्रधान मास्तर २९ मे  २०१० रोजी कालवश झाले. काही ठिकाणी त्यांची जन्मतारीख १९ ऑगस्ट अशी सांगितली गेली आहे. पण जन्मसाल १९२२ हेच आहे. लोकशाही समाजवादाच्या मूल्यावर श्रद्धा ठेवून त्याच्या प्रस्थापनेसाठी प्रधान मास्तर  तन,मन,धनाने आयुष्यभर कार्यरत राहिले. गेल्यानंतरही त्यांनी नेत्र व देहदान केले.आपल्या सत्तर वर्षाच्या सार्वजनिक जीवनात प्रधान सर सातत्यपूर्ण कार्यरत होते. भारताचे स्वातंत्र्य आंदोलन, संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन , त्या नंतरची महाराष्ट्राची पन्नास वर्षाची वाटचाल या सगळ्याचे प्रधान मास्तर अतिशय सूक्ष्म साक्षीदार होते.

साहित्य पासून राजकारणापर्यंत आणि शिक्षणापासून आरोग्य सेवेपर्यंत ते अविरत कार्यतर राहिले. प्रधान मास्तर आदर्श शिक्षक तर होतेच.पण त्याचबरोबर ते विचारवंत, लेखक, वक्ते, कार्यकर्ते, नेते, स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार, संपादक आणि राजकारणीही होते. या सर्व क्षेत्रात त्यांनी आदर्श असे काम केले.स्वतःचा ठसा उमटवला.साधी रहाणी व उच्च विचारसरणीचा एक शुद्ध चरित्र्याचा दीपस्तंभ म्हणून त्यांची ओळख होती. वार्धक्याने त्यांच्यावर वाढता अंमल केला त्यावेळी 'माझ्या मरणाची तारीख मी निश्चित केली आहे ' असे ते म्हणत होते.आणि त्याला अनुसरूनच त्यांनी अन्नत्याग करून केवळ ताक आणि फळांचा रस एवढाच मर्यादित आहार ठेवला होता. विचार आणि आचारातील हे कठोरता जपता येणे फार अवघड असते. प्रधान मास्तरांनी ती जपली होती.

पुण्यात जन्मलेले प्रधान मास्तर इंग्रजी साहित्य हा विषय घेऊन एम.ए. झाले. इंग्रजी साहित्यावर ते अखेरपर्यंत अतिशय सकस व कसदार बोलत,लिहीत राहिले. अनेकांना घडवत राहिले. प्रधान मास्तर स्वतः विद्यार्थीदशेत  असल्यापासूनच स्वातंत्र्य आंदोलनाही जोडले गेले.१९४२ च्या आंदोलनात वीस वर्षाच्या प्रधान मास्तरांनी ११ महिन्यांचा तुरुंगवास भोगला. १९४५ ते १९६६ ची एकवीस वर्षे ते पुण्याच्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून कार्यरत होते. नंतर सामाजिक व राजकीय कार्यासाठी त्यांनी नोकरीचा राजीनामा दिला.

१९६६ ते १९८४ अशी अठरा वर्षे प्रधान मास्तर महाराष्ट्राच्या विधान परिषदेचे सदस्य होते.१९८०-८२ या काळात ते विरोधी पक्षनेतेही होते.विधान परिषदेतील या दीड तपाच्या काळाविषयी त्यांनी लिहिलेले 'माझी वाटचाल ' हे पुस्तक प्रत्येकाने वाचण्यासाठी आहे ).ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक दत्तू काका साठे यांची उमेदवार म्हणून शिफारस करणाऱ्या प्रधान मस्तरांनाच प्रजा समाजवादी पक्षाने पदवीधर मतदारसंघातून निवडणूक लढवण्याचा आदेश दिला. निवडणुकीसाठी लागणारे किमान पैसेही जवळ नसल्याने पत्नीने दागिने विकून त्यांनी सहाय्य केले. १९६६ ची निवडणूक जिंकून पुन्हा १९७२ व १९७८ च्या निवडणुकाही त्यांनी आपल्या कार्याच्या आधारे जिंकल्या. १९८४ सालीही त्यांनी पुन्हा उभे राहावे असे पक्षानी सुचवले तेव्हा त्यांनी विनम्रपणे मी उभा राहणार नाही असे सांगितले. आपल्या कामाचा सर्व तपशील 'माझी वाटचाल ' मधून मांडताना त्यांनी राजकारण, राजकीय व्यवस्था, विचारधारा यावरही उत्तम प्रकाश टाकला आहे. या पुस्तकात त्यांनी एके ठिकाणी म्हटले आहे ,' राजकारणात काम करताना वैचारिक भूमिका स्पष्ट असावी लागते. आणि त्या भूमिकेवरून निष्ठापूर्वक काम करताना खूप सोसावे लागते. तत्वांबाबत तडजोड करून चालत नाही. परंतु ,धोरण विषयक प्रश्नांबाबत काही वेळा लवचिक व्हावे लागते. स्वमताला मुरडही घालावी लागते.या सर्व अनुभवातून जाताना वैचारिक भूमिके इतकेच विविध पक्षातील कार्यकर्त्यांशी येणारे मानवी संबंधही महत्त्वाचे असतात. याचा मला प्रत्यय आला. ' ' 'पॉलिटिक्स इज दि आर्ट ऑफ प्रॉबेबल ' हे इंग्रजी वाक्य मी वयाच्या  पंचविशीत वाचले होते. परंतु या वाक्याचा खरा अर्थ मला सक्रिय राजकारणात वीस वर्षे काम करतानाच उमजला.'

 'साधना'साप्ताहिकाचे संपादकत्व अनेक वर्ष त्यांनी स्वीकारले. सल्लागार तर ते अखेरपर्यंत होते. स्वतःचे राहते घरी अखेर त्यांनी साधनाला दिले.साधनांच्या वाटचालीत प्रधान मास्तरांचे योगदान फार मोठे आहे. तसेच प्रधान मास्तरांनी अनेक उत्तम इंग्रजी व मराठी ग्रंथ लिहिले. शेकडोलेख लिहिले. सुधारकाग्रणी आगरकरांपासून ते महात्मा फुलेंपर्यंतच्या अनेक सदर सुधारकांच्या साहित्याचे त्यांनी संपादन केले. त्याला विवेचक अशा प्रस्तावना लिहिल्या. टिळकांपासून नेहरूपर्यंत अनेकांची चरित्रे त्यांनी लिहिली. बांगलादेशबाबमुक्तिसंग्रामावरचे 'सोनार बांगला' हे प्रवास वर्णन, भारत पाक संघर्षावरचे 'हाजीपीर ' हे पुस्तक, विकसनशील राष्ट्रांपुढील आर्थिक व राजकीय प्रश्नांची मांडणी करणारे 'भाकरी आणि स्वातंत्र्य ',भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाचा दीर्घ व सविस्तर पट मांडणारे 'स्वातंत्र्यसंग्रामाचे महाभारत'हा ग्रंथ ,१९४० ते १९८० या काळातील विचार प्रवाहांचे दर्शन घडवणारी ' साता उत्तरांची कहाणी ' ही कादंबरी असे वैविध्यपूर्ण आणि विपुल लेखन त्यांनी केले. प्रधान मास्तरांचे लेखन हे नेहमीच विचारणा चालना देणारे ठरते.

अखेरच्या काळात त्यांनी गांधी, टॉल्स्टॉय, शेक्सपियर, दोस्तोवस्की वगैरेवर नव्या स्वरूपात चिंतनशील लेखन केले होते. प्रधान मास्तरांचे वाचन अफाट आणि अचाट होते. तसेच त्यांचे लेखनही कसदार होते.कवी मीर यांनी एके ठिकाणी म्हटले आहे," चांगले वाचणे म्हणजे खरी पुस्तके खऱ्या भाव बळाने वाचणे.असे वाचन हा एक अतिशय श्रेयस्कर व्यायाम व परिपाठ आहे. हा व्यायाम असा आहे की तो ,वाचणाऱ्याला दिवसभरात केलेल्या अन्य कुठल्याही कामापेक्षा अधिक राबवितो, अधिक कष्टवितो. ग्रंथ ज्या हेतुपुरस्सरतेने व संयमाने लिहिले जातात, त्याच हेतुपुरस्सर व संयमाने ते वाचले गेले पाहिजेत. कारण बोललेली भाषा ,लिहिलेली भाषा, ऐकलेली भाषा आणि वाचलेली भाषा यात संस्मरणीय कालांतर असते. " प्रधान मास्तर हा वाचनाचा व्यायाम अखेरपर्यंत करीत राहिले.

पुलंनी एके ठिकाणी म्हटले होते की," निर्मळ मनाने वाचणाऱ्याला साहित्यात जीवनाचे दर्शन कुठे घडते आणि कुठे नुसतेच प्रदर्शन मांडले गेले हे बरोबर कळतेच '. प्रधान मास्तर निर्मळ मनाने वाचत होते म्हणूनच त्यांना जीवनाचे दर्शन सापडत गेले. गांधी आणि टॉल्स्टॉय यांच्यात काल्पनिक संवाद झाला तर तो कसा असेल हे प्रधान मास्तरांनी फार उत्तम लिहिलंय. त्यात गांधीजी एके ठिकाणी म्हणतात 'आणि माझ्यावर गोळी झाडणाऱ्या व्यक्तीला ते आता फाशीही देतील. त्याला फाशी देऊ नका ,असे माझा एक जरी अनुयायी बोलला तरी मला समाधान वाटेल.' गांधीजींचे अहिंसेचे तत्वज्ञान किती व्यापक होते हेच प्रधान मास्तर या संवादातून दाखवून देतात.

टिळक, गोखले ,गांधी साने गुरुजी ही त्यांची प्रेरणास्थानी होती. एस.एम.जोशी व नानासाहेब गोरे हे त्यांचे आदर्श होते. लोकशाही समाजवाद जगाचे कल्याण करेल यावर निष्ठा ठेवून प्रधान मास्तर आयुष्यभर प्रामाणिकपणाने वाटचाल करत राहिले. त्यांचे सुसंपन्न ,सुसंस्कृत ,अनुभव संपन्न ,व्यासंगी, चिंतनशील ,परोपकारी ,त्यागी व्यक्तिमत्व सर्वांनाच भावत होते. लबाडीने वागणाऱ्यांना, गैरकृत्य करणाऱ्यांना ज्यांचा नैतिक धाक वाटावा अशा व्यक्तिमत्त्वात प्रधान मास्तरांचे नाव अग्रस्थानी होते.पुणे विद्यापीठाने १९९८ त्यांना 'डिलीट ' ही सन्माननीय पदवी देऊन गौरवले होते. इतरही अनेक पुरस्कार त्यांना मिळाले. अर्थात प्रधान मास्तरांची उंची या सर्व पुरस्कारांहून मोठी होती. 'मास्तर' या उपाधीने ओळखणारा हा माणूस लोकशिक्षक होता ,समाजशिक्षक होता. ज्ञानापासून धनापर्यंत सारे त्यांनी समाजालाच अर्पण केले. महाराष्ट्रातील सर्व परिवर्तनवादी, पुरोगामी, प्रबोधन चळवळीशी त्यांचा जवळचा संबंध होता. समाजवादी प्रबोधिनीशीही त्यांचे ऋणानुबंध होते.१९९६ साली 'स्वतंत्र भारतातील राजकारण ' या विषयावर तिसरे विचारवेध संमेलन समाजवादी प्रबोधिनीने घेतले होते. त्याचे ते उद्घाटक होते .त्यांना भेटण्याची,बोलण्याची,ऐकण्याची अनेकदा मला संधी मिळाली तो ठेवा मनस्वी जपून ठेवावा असा आहे. अशा या थोर  विचारवंसंपन्न व्यक्तीत्वाला जन्मशताब्दीच्या निमित्त विनम्र अभिवादन... !


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीच्या वतीने गेली तेहत्तीस वर्षे  नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post