वासांबे ग्रामपंचायतीच्या सरपंच ताई पवार अपात्र

तर ग्रामसेवक बडे ,पालकर, दिवकर, केंद्रे यांच्यावर निलंबनाची कारवाई       

प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

जनजागृती ग्राहक मंचाचे संतोष विचारे यांची लेखी तक्रार आणि अॅड. प्राजक्ता मंगेश माळी यांनी महत्वपूर्ण बाजू मांडल्यामुळे सुमारे दिड वर्षाने न्याय मिळाला.

प्रतिनिधी याबाबत सविस्तर वृत्त असे की, खालापूर तालुक्यातील प्रतिष्ठेची समजली जाणारी व रायगड जिल्हयातील नव्याने होणा-या नगरपालिकेमध्ये समावेश असलेली वासांबे ग्रामपंचायतीच्या बरबटलेल्या व भ्रष्टाचाराच्या कारभाराची चौकशी होण्याकरीता जनजागृती ग्राहकमंच रायगडचे संपर्क व प्रसिध्दी प्रमुख संतोष विचारे यांनी दि. २५.३.२०२१ रोजी ग्रामपंचायतीची सखोल चौकशी होण्याकरीता अर्ज केला होता व दोशी सरपंच, उपसरपंच, सदस्य व ग्रामसेवक यांच्यावर ग्रामपंचायत अधिनियम १९५९ चे कलम ३९ (१) नुसार अपात्रतेच्या कारवाईची मागणी केली होती.

यानुसार गटविकास अधिकारी खालापूर यांना रायगड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी सखोल चौकशी करुन अहवाल देण्याचे आदेश दिले होते. सदर अहवाल आल्यावर श्री. विचारे यांनी अॅड. प्राजक्ता माळी यांच्यामार्फत ग्रामपंचायतीचे संबंधित सरपंच, उपसरपंच, सदस्य ग्रामसेवक यांच्यावर अपात्रतेच्या कारवाईकरीता अर्ज केला होता. व सदर अर्जावर रायगड जिल्हा परिषदेत चार वेळा व विभागीय आयुक्त यांच्या कार्यालयाची सुनावणी रायगड जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा व्हिडीओ कॉन्फरन्सिंग द्वारे झाली होती. सदर प्रकरणात ग्रामपंचायतीतर्फे अॅड. गजानन ढगे यांनी बाजू मांडली होती. श्री. विचारे यांनी केलेल्या तक्रारीत रु.२,२१,५७०/- रुपयांची तफावत ग्रामपंचायत पासबुक व कॅशबुक मध्ये असल्याबाबत त्यानंतर सुमारे १४ लाखांहून अधिक रक्कम थेट घरपट्टी वसूली व पाणीपट्टी वसूली मधून ग्रामनिधी न करता थेट खर्च केल्याबाबत यासह श्री. जयवंत म्हसकर, श्री. संपत पारंगे व श्री. अनंत पारंगे यांना बोगस वसूली ठेकेदार दाखवून वसूल झालेल्या पाणीपट्टी व घरपट्टीमधून ८टक्के ५ टक्के कमीशनप्रमाणे ३२,८७,००० /- रुपये व बेकायदेशीर अदा केल्याबाबत १६९ अनधिकृत घरांना दुकानांना व टप-यांना असेसमेंट लावल्याबाबत यासह सुमारे १६४ नोंदणीकृत नसलेल्या ठेकेदारांना १कोटी ९० लाखांहून अधिक रकमेची कामे देवून ग्रामपंचायतीचे नुकसान केल्याची बाब अॅड. प्राजक्ता माळी यांनी युक्तीवादात मांडली होती.

 श्री. विचारे यांच्या तक्रारीला यश येवून दि.३०.६.२०२२ रोजी विभागीय आयुक्त, कोकण विभाग, श्री. विलास पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या सरपंच सौ. ताई पवार यांना त्यांच्या पदाच्या अधिकारपदावरुन ग्रामपंचायतीमधून काढून टाकण्याचे आदेश दिले आहेत तर संबंधित ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी श्री. बडे, श्री. केंद्रे, श्री. दिवकर व पालकर यांना निलंबित करण्याचे आदेश दिले आहेत. तर अन्य सदस्यांचा ग्रामपंचायत कारभारात प्रशासकिय व आर्थिक बाबतीत थेट सहभाग असेल तर त्याबाबतचा प्रत्येक सदस्यवार चौकशी अहवाल सादर करण्याचा आदेश दिला आहे. सदर प्रकरणात विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांनी दिलेल्या आदेशाबाबत श्री. संतोष विचारे हे नाखूश असून याबाबत लवकरच वरील अपिलीय प्राधिकरणाकडे लेखी तक्रार करण्याचे श्री. विचारे यांनी सांगितले आहे.


श्री. संतोष विचारे

Post a Comment

Previous Post Next Post