मुंबई-पुणे जलद प्रवास : चिरले खालापूर रस्त्याचा बृहत आराखडा तीन महिन्यात सादर होणार



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा : सुनील पाटील

मुंबई : मुंबई- पुणे प्रवासाचा वेळ कमी व्हावा या उद्देशाने चिरले - खालापूर दरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे.

पुढील तीन महिन्यांत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे.

मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे मुंबई ते चिरले प्रवास वेगवान होणार आहे. मात्र चिरलेवरून पुढे पुण्याला राष्ट्रीय महामार्गावरून जावे लागणार असून हे अंतर बरेच मोठे आहे. त्यामुळे चिरलेवरून मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर पोहचण्यासाठी सागरी सेतू थेट मुंबई-पुणे द्रुतगती मार्गाला जोडण्याचा निर्णय एमएमआरडीएने घेण्यात आला आहे. त्यानुसार चिरले ते खालापूर असा ६.५ किमी लांबीचा रस्ता बांधण्यात येणार आहे. यातील १.५ किमीचा रस्ता पूर्णतः नवीन असणार आहे.

या प्रकल्पाचा बृहत आराखडा तयार करण्यासाठी एमएमआरडीएने प्रकल्प सल्लागाराची नियुक्ती करण्याचा निर्णय घेत निविदा मागविल्या होत्या. या कामासाठी एकूण आठ निविदा सादर झाल्या होत्या. मात्र यापैकी केवळ तीन निविदा पात्र ठरल्या. यापैकी एकाची निवड करून संबंधित कंपनीला कंत्राट देण्यात आल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. टेक्नोजेन कन्सल्टंट कंपनीला हे काम देण्यात आले असून आराखडा तयार करण्याचे काम सुरू करण्यात आल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. कंपनीला तीन महिन्यांत आराखडा तयार करावा लागणार आहे. आराखडा सादर झाल्यानंतर त्याला मंजुरी घेऊन रस्त्याच्या बांधकामासाठी निविदा काढण्यात येणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post