उरण मध्ये टपरींवर गुटख्यासह चरस, गांजाची विक्री; कारवाईची मागणी



प्रेस मीडिया लाईव्ह

रायगड जिल्हा प्रमुख प्रतिनिधी : सुनील पाटील

 उरण तालुक्याचा औद्योगिक विकास झपाट्याने होत असतानाच छोट्या पान टपऱ्यांवर अमली पदार्थांची सर्रासपणे विक्री केली जात आहे. यामुळे अनेकजण याच्या आहारी गेल्याने त्यांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आहेत. तरी अशा अमली पदार्थांची विक्री करणाऱ्यांवर कडक कारवाई अशी मागणी जोर धरू लागली आहे.

वाढत्या औद्योगिकरणामुळे अनेक छोट्या मोठ्या उद्योग धंद्यांची निर्मिती झाली आहे. त्या मध्ये तालुक्यात आणि शहरात नाक्यांनाक्यांवर पान टपऱ्या सुरू झाल्या आहेत. या पान टपऱ्यांमधून पानापेक्षा अमली पदार्थांची सरासर्पणे विक्री होत असते. त्यामध्ये प्रामुख्याने गुटखाबंदी असतानाही तसेच दारू, चरस आणि गांजाची विक्री ही कोणतीही भीती न बाळगता विकली जात असल्याचे चित्र पहावयास मिळते. याबाबत अनेकवेळा वृत्त प्रसिद्ध होऊन ही त्यांच्यावर कारवाई होताना दिसत नाही. याचा अर्थ शासकीय यंत्रणेचे आर्थिक साटेलोट असल्याची चर्चा उरणमध्ये सुरू आहे.

भाड्याने पान टपरी घेऊन व्यवसाय करणाऱ्यानी आजच्या घडीला द्रोणागिरी नोडमध्ये ३० ते ४० लाखाचे गाळे खरेदी केल्याचे समजते. यावरून अमली पदार्थांची विक्री करून पानटपरीधारक मालामाल झाल्याचे दिसते. सरकारचे नियम फक्त कागदावर असून प्रत्यक्षात या नियमांचे उल्लंघन खुलेआम सुरू असतानाही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होताना दिसत नाही. उलट कोणी याचा जाब विचारला तर आम्ही अधिकाऱ्यांचे आर्थिक चोचले पुरवीत असल्याने जरी काही झाले तरी आमच्यावर कोणतीच कारवाई होणार नसल्याचे हे टपरी धारक करीत आहेत.

याला वेळीच आळा घातला नाहीतर तरुण पिढी वाममार्गाला लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे राज्याचे गृहमंत्री यांच्याकडे याबाबत सामाजिक व महिला संघटना तक्रार करून दाद मागून दोषींना कडक शासन करण्याची मागणी करणार असल्याचे समजते

Post a Comment

Previous Post Next Post