पिंपरी-चिंचवड मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या वसतिगृहात प्रवेशप्रक्रिया सुरू


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागांतर्गत पिंपरी-चिंचवड येथील मागासवर्गीय गुणवंत मुलांच्या शासकीय वसतिगृहात २०२२-२३ साठी अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विजाभज, इतर मागासवर्ग, विशेष मागास प्रवर्ग, दिव्यांग, अनाथ आदी प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांना विनामूल्य प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू आहे. 

प्रवेशासाठी विद्यार्थी हा बाहेरगावचा परंतू पुणे, पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरातील ११ वी, पदविका व औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) शिक्षण घेणारा असावा. विद्यार्थ्याने अर्जासोबत मागील वर्षी उत्तीर्ण झाल्याची गुणपत्रिका, सक्षम प्राधिकाऱ्याच्या सहीचे जातीचे प्रमाणपत्र, तहसीलदारांच्या स्वाक्षरीचे वडिलांचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र, महाराष्ट्र निवासाचे प्रमाणपत्र, तसेच महाविद्यालयाचे बोनाफाईड प्रमाणपत्र, मुलाचे आणि वडिलांचे आधारकार्ड, शिधापत्रिकेची सत्यप्रत, शाळा अथवा महाविद्यालय प्रत्यक्ष सुरू असल्याबाबत मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांचे लेखी हमीपत्र जोडावे.

शासकीय वसतिगृहात विनामूल्य निवास व भोजनाची सुविधा आहे. शासनाने ठरवून दिलेल्या दराने पुस्तके, इतर शैक्षणिक साहित्य आदीकरिता रक्कम आणि दरमहा निर्वाह भत्ता रक्कम ८०० रुपये आधार क्रमांक जोडलेल्या विद्यार्थ्याच्या बचत खात्यावर जमा होते.

बाहेरगावाकडील परंतू पुणे पिंपरी-चिंचवड, मोशी प्राधिकरण परिसरात शिक्षण घेणाऱ्या गरीब होतकरू विद्यार्थ्यांनी अर्ज भरण्याकरिता वसतिगृहात येऊन नोंदणी करावी, असे आवाहन वसतीगृह अधीक्षक एम.डी. वाघमारे यांनी केले आहे.


Post a Comment

Previous Post Next Post