कोल्हापूर जिल्ह्यात एनडीआरफच्या दोन तुकड्या दाखल

जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी साधला जवानांशी संवाद .


प्रेस मीडिया लाईव्ह :

कोल्हापूर, दि. 5 (जिमाका): संततधार पावसामुळे कोल्हापूर जिल्ह्यात पंचगंगा नदीची पाणीपातळी इशारा पातळीकडे सरकत आहे. या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात एनडीआरफच्या 2 तुकड्या दाखल झाल्या. एक तुकडी शिरोळकडे रवाना झाली असून दुसरी तुकडी मंगळवारी रात्री सव्वा 9 च्या दरम्यान कोल्हापूरमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाली.   जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी या तुकडीचे प्रमुख व जवानांची भेट घेऊन बचाव व मदत कार्याच्या अनुषंगाने संवाद साधला. यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार, शरद पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

एनडीआरफच्या 2 तुकड्यांपैकी एक तुकडी कोल्हापूर शहरात तर दुसरी तुकडी शिरोळ तालुक्यात काम करेल. प्रत्येक तुकडीत 25 जवानांचा समावेश आहे.

  निरीक्षक बृजेश कुमार रैकवार आणि शरद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कोल्हापूर मधील टीम काम करेल. तर निरीक्षक लोकेश रत्नपारखी व प्रशांत चिता यांच्या मार्गदर्शनाखाली शिरोळ येथील टीम काम करणार आहे. आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास एनडीआरएफचे जवान व जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाचे पथक बचाव व मदत कार्य चांगल्याप्रकारे करेल, त्यामुळे कोल्हापूरकरांनी घाबरु नये, असे आवाहन यावेळी निरीक्षक बृजेश कुमार रैकवार यांनी केले.Post a Comment

Previous Post Next Post