पूर नियंत्रणासाठी पाटबंधारे विभागाचे काटेकोर नियोजन

-कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांची माहिती

प्रेस मीडिया लाईव्ह :

  कोल्हापूर :  (जिमाका): सध्या कोल्हापूर जिल्ह्यात संततधार पाऊस सुरु आहे. आपत्कालीन परिस्थितीत नियोजनासाठी जलसंपदा विभागाच्या सर्व यंत्रणा सक्षमपणे कार्यरत आहेत. दरवर्षीच्या नियोजनाप्रमाणे यावर्षीही धरण उशिरा भरण्याचा एक मोठा प्रयत्न लोकप्रतिनिधी व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनानुसार जलसंपदा विभागामार्फत केला जात आहे, जेणेकरून पूरपरिस्थिती निर्माण झाल्यास धरणात पाणी साठवता येईल. तसेच पुराचे गांभीर्य थोडे कमी होईल, यापद्धतीने काटेकोर नियोजन केले असल्याची माहिती जलसंपदा विभागाचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी दिली.

 राधानगरी धरणाचे आपत्कालीन कक्ष 24 तास सुरु आहेत. 

या ठिकाणी कर्मचारी नियुक्त केले असून धरणावर हे कर्मचारी रात्रंदिवस चोखपणे कार्यरत आहेत. आपत्कालीन परिस्थितीच्या दृष्टीने आवश्यक त्या सूचना, इशारे हे विभागीय कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाला तसेच व्हाट्सअपच्या माध्यमातून नागरिकांपर्यंत पोहोचवण्यात येत आहेत. तसेच पूर्वसूचना (अलर्ट) वेळेच्या आधी दिल्या जातील, याची दक्षताही जलसंपदा विभागाकडून घेतली जात आहे. 

           राधानगरी धरण हे राजर्षी शाहूकालीन ऐतिहासिक धरण म्हणून ओळखले जाते. या धरणाची क्षमता 8.36 टीएमसी असून गेले पंधरा दिवस पावसाचा रोज जोर आहे. साधारण 120 ते 130 मिलिमीटर रोज पाऊस पडतोय. धरणाची क्षमता 8.36 असली तरी आज रोजी धरण 4.7 टीएमसी म्हणजे साधारण 55 टक्के पाणीसाठा आज आहे. दाजीपूर, हसणे आणि पडळी मधला पाऊस या धरणामध्ये एकत्रित येतो. असाच जर पावसाचा जो रोज सुरू राहिला तर साधारण धरण भरायला आठ ते दहा दिवस लागू शकतात. धरणावर बीओटी तत्त्वावर पॉवर हाऊस आहे, ज्यावर 1350 क्यूसेक्सचा विसर्ग आणि पॉवर जनरेशन सुरु आहे, असेही श्री. बांदिवडेकर यांनी सांगितले.


Post a Comment

Previous Post Next Post