चिखली गावकऱ्यांनी इशारा पातळी ओलांडण्याआधीच स्थलांतर होण्यास सुरुवात केली

 ग्रामपंचायतीने सुद्धा आपल्या कार्यालयातील सर्व दप्तर सुरक्षितस्थळी हलविले आहे.



प्रेस मीडिया लाईव्ह : 

अशोक ठोंमके :

  कोल्हापुरात महापूराचा सर्वाधिक फटका ज्या चिखली गावाला बसतो, त्या गावकऱ्यांनी इशारा पातळी ओलांडण्याआधीच स्थलांतर होण्यास सुरुवात केली आहे. सध्या पंचगंगा नदीची पाणीपातळी 37.4 फुटांवर पोहोचली  असून, पुढच्या काही तासांमध्ये इशारा पातळी ओलांडण्याची शक्यता आहे. पंचगंगा नदीची इशारा पातळी 39 फूट इतकी आहे, तर धोका पातळी 43 फूट आहे. त्यामुळे नागरिकांनी स्थलांतर करायला सुरुवात केली आहे. ग्रामपंचायतीने सुद्धा आपल्या कार्यालयातील सर्व दप्तर सुरक्षितस्थळी हलविले आहे. आज ( 14 जुलै ) सायंकाळपर्यंत गावातील जनावरे सुद्धा स्थलांतरित होतील, अशी माहिती ग्रामविकास अधिकारी गोरख गिरीगोसावी यांनी दिली.



गावात 'इतकी' लोकसंख्या - 

चिखली गावाची लोकसंख्या जवळपास 6 हजार 350 इतकी लोकसंख्या असून, सर्व गावच पाण्याखाली जात असते. त्यामुळे खबरदारी म्हणून गेल्या 4 दिवसांपासून गावामध्ये दवंडी देऊन तसेच एनडीआरएफ पथकाकडून पाहणी करून स्थलांतर होण्याच्या सूचना दिल्या आहेत. गावात जागोजागी सूचना फलक लावण्यात आले आहेत. 2019 आणि 2021 च्या महापुराचा अनुभव नागरिकांना असल्याने नागरिक स्वतःचे आणि जनावरांचे स्थलांतर करत आहेत.

चिखलीतील नागरिकांच्या स्थलांतराबाबत माहिती देताना ग्रामविकास अधिकारी

शासनाच्या सूचनेनुसार आत्ताच स्थलांतर करा - चिखली आणि आंबेवाडी गावातील काही नागरिक शासनाच्या सूचना असून, सुद्धा पुराचे पाणी गावात शिरेपर्यंत स्थलांतर करत नाहीत. त्यामुळे या सर्वांना रेस्क्यू करून गावातून बाहेर काढावे लागते. त्यामुळे अशा पद्धतीने बेसावध निष्काळजीपणा न करता प्रशासनाच्या सूचनांचे पालन करून आत्ताच स्थलांतर करा, असे आवाहन करण्यात येत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post