वृक्षारोपणात सहभाग घ्यावा; किमान ७५ रोपे लावावीत जिल्हाधिकारी राहुल रेखावार

 प्रेस मीडिया लाईव्ह :

 कोल्हापूर :  (जिमाका) : आझादी का अमृत महोत्सवानिमित्त जिल्ह्यातील प्रत्येक शाळेने वृक्षारोपण कार्यक्रमात सहभाग घेऊन किमान  ७५ झाडांची लागण करावी.  लागण केलेल्या झाडांना किंवा वनांना त्या-त्या भागातील स्वातंत्र्य सैनिकांची नावे द्यावीत. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षण विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी आज दिल्या

राष्ट्रीय हरित सेना योजना जिल्हास्तरीय अंमलबजावणी व सनियंत्रण समितीची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात झाली. बैठकीस  सामाजिक वनीकरण विभागाचे विभागीय वन अधिकारी एम. बी. चंदनशिवे, अशासकीय सदस्य उदय गायकवाड, अनिल चौगले यांच्यासह यांच्यासह संबधित अधिकारी उपस्थित होते.

 जिल्ह्यात हरित सेनेच्या २५० शाळा असून १७० शाळांनी १० हजार ८८९ रोपांची लागवड केली आहे.  जिल्ह्यातील सर्व शाळांनी या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन  करून हा उपक्रम विहित कालावधीत पूर्ण करावा, अशा सूचना जिल्हाधिकारी श्री. रेखावार यांनी दिल्या.

 गायरान जमिनीवर ‘देवराई’ उपक्रम करण्यासाठी प्रत्येक ग्रामपंचायतीने ४ हेक्टर गायरान उपलब्ध करून द्यावे. यासाठी ग्रामसेवकांनी आपल्या गावातील गायरान जमिनीची निश्चिती करावी.  त्यानुसार वृक्ष लागवड करण्याचे नियोजन करावे. तसेच जिल्ह्यातील औद्योगिक वसाहतीमध्येही वृक्ष लागवड करण्यात येणार असून  ही वृक्ष लागवड वसाहतीमधील रिकाम्या जागा, रस्त्याच्या दोन्ही बाजूला करण्यात यावी. रोपांच्या उपलब्धतेबाबत सामाजिक वनीकरण विभागाने नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.

 आझादी का अमृत महोत्सवानिमित्त वृक्ष लागवड करण्यासाठी  सामजिक वनीकरण विभागाकडे रोपे विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे  विभागीय वन अधिकारी श्री. चंदनशिवे यांनी सांगितले.  शाळा व शासकीय कार्यालयांनी  रोपांची मागणी केल्यास त्यांना रोपे मोफत उपलब्ध करून दिली जातील, असेही त्यांनी बैठकीत सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post