स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून सदृढ आरोग्यदायी समाजाची निर्मिती करुया-विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया



प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे, दि. २४: पंढरपूरच्या वारीमध्ये नागरिकांपर्यंत  पोहोचून त्यांच्या अंगी स्वच्छता भावना वाढीस लागण्यासाठी प्रतिकात्मक रुपात स्वच्छता दिंडीचे आयोजन केले असून सदृढ, आरोग्यदायी समाजाच्या निर्मितीसाठी या दिंडीच्या माध्यमातून स्वच्छतेचे महत्व पटवले जाईल, असा विश्वास कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया यांनी व्यक्त केला. 

ग्रामविकास आणि पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२' च्या शुभारंभ प्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी अतिरिक्त विभागीय आयुक्त डॉ. अनिल रामोड, जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागचे सहसचिव अभय महाजन, पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख, यशदाचे उपमहासंचालक मल्लीनाथ कलशेट्टी, उपायुक्त विजय मुळीक,  उपमुख्य कार्यकारी अधिकारी जामसिंग गिरासे, मिलींद टोणपे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. भगवान पवार आदी उपस्थित होते. 

श्री. लोहिया म्हणाले, १०० वर्षापूर्वी संत गाडगेबाबांनी  स्वच्छतेबाबत दिलेली शिकवण आपण अंमलात आणत आहोत. प्लास्टिकमुक्ती, हागणदारीमुक्ती स्वच्छता मोहिमेबाबत शासनाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात येतात. कोरोनाच्या महामारीत सर्वांना स्वच्छतेचे महत्व पटले आहे. आता सर्वांनी मिळून स्वच्छता मोहिमेला अधिक व्यापक करायचे आहे. परिसर स्वच्छतेमुळे आपले आरोग्य चागंले राहते. आरोग्य चांगले राहिल्यास मनाची सुदृढता निर्माण होवून आपल्या हातून सामाजिक बांधिलकीची जोपासना होते. कोणत्याही योजना लोकाच्या माध्यमातून राबविल्यास त्यावेळी यश दिसून येते. 

डॉ. रामोड म्हणाले, संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज, संत श्री तुकाराम महाराज व संत श्री सोपान महाराज पालखी पुणे जिल्ह्यातून मार्गक्रमण करीत असून त्यामध्ये लाखो वारकरी सहभागी होतात. वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा समजली जाते. या वारकऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी, आरोग्याची अडचण सोडविण्यासाठी स्वच्छ पाणी, महिला व पुरुषांकरीता स्वतंत्र शौचालय, राहण्याची व्यवस्था आदी सेवा-सुविधा जिल्हा प्रशासनाच्यावतीने उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आहेत. आरोग्य विभागाच्यावतीने ३१ आरोग्य पथके गठित करुन सेवा देण्यात येत आहे. पालखी मार्गावर ५६ ठिकाणी पाण्याचे स्त्रोताद्वारे तसेच जवळपास ७५ टँकर अधिग्रहित करून पाण्याची सुविधा केली आहे. स्वच्छता दिंडीद्वारे स्वच्छतेचा संदेश घरोघरी पोहोचेल.

श्री. कलशेट्टी म्हणाले, निर्मलग्राम कार्यक्रमांतर्गत २००५ या वर्षी स्वच्छता दिंडीची सुरुवात झाली. शाश्वत विकास कार्यक्रमांतर्गत उद्दिष्टपुर्तीसाठी शासन काम करीत आहे. ग्रामविकास विभागाने मोबाईल शौचालय उपलब्ध करुन देण्यात आले आहेत. गावातील लोकांसाठी शंभर टक्के निर्मलवारी करण्याचा उपक्रम सुरु करण्यात आला आहे. हागणदारीमुक्त गावाबरोबरच घनकचरा व्यवस्थापन, प्लास्टिक मुक्तीच्यादृष्टीने जनजागृती करण्याची गरज आहे. सर्वांनी मिळून स्वच्छतेबाबत काम करण्याची गरज असल्याचे त्यांनी म्हटले. 

श्री. महाजन म्हणाले, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मनामध्ये भक्तीची भावना घेवून वारीमध्ये वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येने सहभागी होत असतात. या भावनेचा आदर करुन पालखी सोहळ्यामध्ये स्वच्छता दिंडीच्या माध्यमातून  स्वच्छता व आरोग्याबाबत जनजागृती करण्याचे काम करण्यात येत आहे. लोककलावंतच्या माध्यमातून स्वच्छतेचे संदेशाविषयी मोठ्या प्रमाणात जनजागृती केली जाते. स्वच्छतेचा संदेश वारकरी गावागावात पोहचवितात. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने दिंडीमध्ये विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबवत असून त्याची दखल राष्ट्रीय पातळीवर घेण्यात आलेली आहे. 

श्री. प्रसाद यांनी प्रस्ताविकामध्ये सांगितले की, श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे 'स्वच्छता व ग्रामसभा दिंडी-२०२२' तसेच आरोग्य दिंडीचे आयोजन करण्यात येत आहे. निर्मलवारीच्या संकल्पना मागील सात वर्षापासून सुरु आहे. प्रत्येक ठिकाणी स्वच्छ वारी व्हावी, यासाठी नियोजन करीत आहे. पुणे जिल्हा परिषदेच्यावतीने वारीच्याबाबतीत सहा प्रकारचे नियोजन करण्यात आले असून त्यामध्ये कचरामुक्त वारी, हागणदारीमुक्त वारी करण्यात येणार आहे. दिंडीच्या माध्यमातून गावामध्ये पालखी जाण्यापूर्वी व गेल्यानंतर स्वछता केली जाणार आहे. शासनाने ठरवून दिलेले शंभर टक्के हागणदारीमुक्त वारीबरोबरच निर्मलवारीची संकल्पना साध्य करण्यात येणार आहे.  शाश्वत विकासाची माहिती देण्यात येणार असून राज्यातील कानाकोपऱ्यांपर्यंत योजना पोहचविण्यास मदत होणार आहे. आरोग्य विभागाच्यावतीने आरोग्य सेवकासाठी मोटारसायकल उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. वारीमध्ये प्रशासकीय अधिकाऱ्याला महत्वाचे निर्णय घेण्यासाठी कॅराव्हॅन उपलब्ध करुन देण्यात येणार आहे, असेही ते म्हणाले. 

यावेळी वारकऱ्यांना योजनांची माहिती होण्यासाठी प्रचार प्रसिद्धी साहित्य, वारीमध्ये दिंडी प्रमुखांना वाटप करण्यात येणाऱ्या प्राथमिक उपचार किटचे अनावरण करण्यात आले.  

Post a Comment

Previous Post Next Post