पाणीबाणी विरोधात आपचा मनपावर सोमवारी हंडा मोर्चा

टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुण्यातील पाणीटंचाई कृत्रिमरीत्या वाढवून तिचे रूपांतर पाणीबाणीमध्ये केलेले आहे. पुणे मनपा प्रशासनाला पाणीचोरीला पायबंद घालण्यात अपयश आले आहे. *टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवकांचे आणि भ्रष्ट प्रशासकीय अधिकाऱ्यांचे संरक्षण असून या पाणीबाणी विरोधात सोमवारी दिनांक २० जून रोजी सकाळी ११ वाजता आम आदमी पक्षातर्फे हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात त्रस्त नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे आवाहन आप पुणे शहर जल हक्क आंदोलन समितीचे आबासाहेब कांबळे (8390906656) व सुदर्शन जगदाळे (9527911911) यांनी केले आहे.

टँकर लॉबीच्या दबावाखाली पुणे शहरात तीव्र पाणीटंचाई निर्माण केली गेली असून त्यामूळे टँकर लॉबीचे उखळ पांढरे झाले आहे. या टँकर लॉबीला प्रस्थापित नगरसेवक आणि प्रशासनाचे संरक्षण आहे. पुण्यातील विशेषत: बाणेर, बालेवाडी, हडपसर, फुरसुंगी, काळे पडळ, साडे सतरा नळी, मोहम्मदवाडी, खडी मशीन चौक, उंद्री, पिसोली, वडकी नाला, येवलेवाडी, कोंढवा बू. वनावडी, कात्रज, आंबेगाव पठार,आंबेगाव बू. , नऱ्हे, वडगाव बू. सिंहगड रोड, धायरी, नांदेड फाटा, किरकटवाडी, कोल्हेवाडी, खडकवासला, वारजे_ माळवाडी गणपती माथा, कोंढावे- धावडे, NDA गेट, बावधान, ससरोड, सुसगाव, बाणेर, बालेवाडी, म्हाळुंगे, दापोडी, बोपोडी, मुळा रोड, विश्रांतवाडी, कळस, धानोरी, लोहगाव, विमान नगर, खराडी, चंदन नगर बायपास, मांजरी, वाघोली या भागांमध्ये तीव्र पाणटंचाई निर्माण केली गेल्याने या परिसरातील हजारो गृह सोसायट्यांना पिण्यासाठी पाणी विकत घ्यावे लागत आहे. त्यासाठी अक्षरशः लाखो रुपये प्रत्येक महिन्याला एका सोसायटीला मोजावे लागत आहे. महागाईच्या जमान्यात तुटपुंज्या पैशात घर चालवणारे वस्तीत राहणाऱ्या लोकांना सुद्धा पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. 

माननीय उच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा पुणे मनपाने शहराच्या परीघावरील नवीन समाविष्ट गावांना आणि पूणे मनपा हद्दीतील जुन्या भागांना पुरेसा पाणी पुरवठा केलेला नाही. नको त्या योजनांवर, भ्रष्ट कंत्राटावर, फुटकळ खरेदीवर, वायफळ बांधकामांवर कोट्यावधी रुपये खर्च करणारी पुणे मनपा नागरिकांना पाणी देण्यासाठी मात्र हात वर करत आहे. या मनपाला तिच्या जबाबदारीची जाणीव करून देणे गरजेचे आहे. 

पुणे मनपाला पाणीपट्टी भरुन देखील पाण्यासाठी लाखो रुपये नागरिकांना मोजावे लागत आहेत. या विरोधात आम आदमी पक्षाच्या जल हक्क समितीद्वारे वेळोवेळी निदर्शने देखील केली आहेत. तसेच याबाबत अभियान राबवून शेकडो गृह सोसायट्यांनी पुणे मनपाला आम आदमी पक्षातर्फे निवेदने दिलेली आहेत. पण मुर्दाड व्यवस्था अजूनही तशीच आहे. या पाणी चोरीच्या भ्रष्ट व्यवस्थेला जनतेने धक्का द्यायची वेळ आली आहे. याकरिता या हंडा मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.



Post a Comment

Previous Post Next Post