घर कामगार संघटनेचा सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा

 मोर्चातील घोषणांनी परिसर गेला दणाणून ; विविध मागण्यांचे निवेदन सादर.

प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी येथे राज्य शासनाने घरेलू कामगारांना किमान वेतन सूचीमध्ये समाविष्ट करावे, सामाजिक सुरक्षा योजना लागू कराव्यात यासह विविध मागण्यांसाठी कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्यावतीने सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी जोरदार घोषणाबाजीने परिसर दणाणून सोडला. मागण्यांचे निवेदन कार्यालयास सादर करण्यात आले.

१६ जून हा दिवस आंतरराष्ट्रीय घरेलू कामगार दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्त घरेलू कामगारांच्या अनेक प्रलंबित व तातडीच्या मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी सिटू अंतर्गत कोल्हापूर जिल्हा घर कामगार संघटनेच्या वतीने इचलकरंजी येथे सहाय्यक कामगार आयुक्त कार्यालयावर मोर्चा काढून विविध मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.यामध्ये प्रति ताशी ७५ रुपयांप्रमाणे किमान वेतन निश्चित करून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी तज्ज्ञ समिती नेमावी, नोकरीच्या सुरक्षेची हमी, महागाई भत्ता, पगारी सुट्टी पगार, पगारी रजा, बोनस, ग्रॅच्युईटी आदींचा लाभ देणारा कायदा करण्यात यावा, किमान ३ हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळावे, कोविड अनुदान मिळावे, त्यांना ओळखपत्र देण्यात यावे, अनेक वृद्ध महिलांना काम करावे लागत असल्याने महाराष्ट्र घरेलू कल्याण मंडळ अधिनियम २००८ मध्ये दुरुस्ती करून ६० वर्षे वयाची कमाल मर्यादा काढून टाकावी, भारत सरकारने आयएलओ सनद १८९ ला त्वरित मंजुरी द्यावी, राष्ट्रीय अन्न सुरक्षा कायद्यांतर्गत प्राधान्य कुटुंब म्हणून समाविष्ट करावे, पाल्यांसाठी शिष्यवृत्ती योजना लागू करावी, यासह विविध मागण्यांचा समावेश करण्यात आला आहे. 

या मोर्चामध्ये ज्येष्ठ कामगार नेते दत्ता माने, पार्वती जाधव, शहाजाद मुजावर, जाहीरा शेख, माया सुतार, सुलोचना नीलकंठ, लता हेगडे, सावित्री चौगले, उज्वला शेलार, ज्योती शिंदे यांच्यासह महिला कामगार मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या.

Post a Comment

Previous Post Next Post