हेरवाड गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला

 असा ठराव करणारी हेरवाड ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत.

प्रेस मीडिया लाईव्ह :

हेरवाड (ता. शिरोळ ) या गावात विधवा प्रथा बंद करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. विधवांना समाजात सन्मानाने जगता यावे, यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ठराव ग्रामसभेत मंजूर करण्यात आला आहे.असा ठराव करणारी हेरवाड ही राज्यातील पहिली ग्रामपंचायत ठरली आहे.

पतीच्या निधनानंतर महिलेचे मंगळसूत्र तोडण्यात येते, कुंकू पुसण्यात येते, बांगडय़ा फोडल्या जातात, जोडवी काढण्यात येतात, त्याचबरोबर आयुष्यभर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमात पुढाकार घेता येत नाही, अशी सद्यस्थिती आहे. सती प्रथा बंद झाली, मात्र विधवा झाल्यानंतरच्या प्रथेमुळे सन्मानाने जगण्याच्या महिलेच्या हक्कावर गदा येत असल्याने सामाजिक परिवर्तनाच्या दिशेने पाऊल टाकण्यासाठी हेरवाड ग्रामपंचायतीने ठराव मंजूर केला. सरपंच सुरगोंडा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सभेत मुक्ताबाई संजय पुजारी यांनी ठराव मांडला, तर सुजाता केशव गुरव यांनी अनुमोदन दिले आहे.करमाळा येथील महात्मा फुले सामाजिक संस्थेचे प्रमुख प्रमोद झिंजाडे यांची ही मूळ संकल्पना असून त्यापासून प्रेरणा घेऊन अशा प्रकारची विधवा प्रथा बंदचा ठराव केला प्रत्येक ग्रामपंचायतीने हा विषय गावसभेत चर्चेत घ्यावा अशी मागणी आता जोर धरत आहे .

आज प्रत्येक क्षेत्रात महिला पुरुषांच्या बरोबरीने किंबहुना एक पाऊल पुढे आहेत . सन्मानाने जगण्याचा त्यांनाही हक्क आहे , मात्र महिला विधवा झाल्याक्षणीच तिचे समानतेचे मूलभूत हक्क हिरावून घेतले जातात व आयुष्यभर तिच्यावर अन्याय होतो . तो होऊ नये यासाठी अशा प्रकारची भूमिका व त्याला कायदेशीर अधिष्ठान राहावे यासाठी हा ठराव गावसभेत मंजूर केल्याचे सरपंच सुरगोंडा पाटील यांनी सांगितले .

Post a Comment

Previous Post Next Post