तर आज राज ठाकरे सुध्दा मुस्लिम झाले असते ---- केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवले

 मातोश्री हौसा आईंचे स्मारक ढालेवाडी मध्ये उभारणार.प्रेस मीडिया लाईव्ह

सांगली दि.9 -   गावातील दलित आणि  सवर्ण आहेत आमचे मित्र कारण आमच्या मनात आहे डॉ बाबासाहेब आंबेडकर आणि  छत्रपती शिवाजी महाराजांचे चित्र असे सांगत छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले.जर छत्रपती शिवाजी महाराज मुघलांशी लढले नसते तर आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुसलमान झालेले असते असे प्रतिपादन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांनी केले. 

ना.रामदास आठवले यांच्या मूळगावी संगली जिल्ह्यातील कवठेमहांकाळ तालुक्यातील ढालेवाडी या गावी महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शिवाजी महाराज भगवान बुद्ध तसेच सर्व महापुरुषांचा संयुक्त जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला होता.त्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून ना.रामदास आठवले बोलत होते. यावेळी ना.रामदास आठवले यांच्या पत्नी सौ.सीमाताई आठवले; पुत्र जित आठवले;दिवंगत गृहमंत्री आर आर पाटील (आबा ) यांचे पुत्र रोहित पाटील  विठ्ठल पाटील उर्फ काकाजी ; सुरेश बारशिंग; विवेक कांबळे; जगन्नाथ ठोकळे; राजेंद्र खरात;संजय कांबळे; सरपंच रामदास साळुंखे; काकासाहेब आठवले; लालासाहेब वाघमारे; पिंटू माने  तसेच ज्येष्ठ आंबेडकरी गायक कवी प्रतापसिंग बोदडे; मुकुंद ओव्हाळ;विजय साबळे  आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

  ना.रामदास आठवले यांचे मुळगाव असलेल्या ढालेवाडीतील त्यांचे घर नूतनीकरण करण्यात आले असून मातृदिनाचे  औचित्य साधत या घराला मातोश्री नाव देऊन घराचे उदघाटन ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी गावात महामानवांचा संयुक्त जयंती महोत्सव  आयोजित करण्यात आला होता. यावेळी ढालेवाडी गावचे सुपुत्र भारत सरकार चे दोन वेळा राज्य मंत्री  झाल्याबद्दल कौतुक अभिमान म्हणून ग्रामस्थांतर्फे ना.रामदास आठवले यांचा सत्कार करण्यात आला. 

ढालेवाडी या गावात रस्ते बांधून विविध विकास कामे करण्यात येतील तसेच गावात दिवंगत हौसा आई आठवले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बहुउद्देशीय  सभागृह आणि प्रशिक्षण केंद्र उभारून मातोश्री हौसा आईंचे स्मारक उभारू. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना औद्योगिक प्रशिक्षण देणाऱ्या कौशल्य विकास प्रशिक्षण देणाऱ्या तसेच महाराष्ट्र लोक सेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी योग्य प्रशिक्षण मार्गदर्शन करणाऱ्या प्रशिक्षण  केंद्राच्या रूपाने मातोश्री हौसाआईं आठवले यांचे स्मारक उभारणार असल्याची घोषणा ना रामदास आठवले यांनी यावेळी केली. माझ्या आईने खूप कष्ट केले. मला वाढविले .तिचे उपकार फाटणार नाहीत. आज जागतिक मातृदिनी माझ्या आईची आठवण येते.मी माझ्या आईला आदरांजली अर्पण करतानाच आपल्या सर्वांच्या  आईंना आदरांजली अर्पण करतो असे ना.रामदास आठवले भावुक होऊन म्हणाले. 

पोटात तुझ्या पेटली आग ऊठ दलिता  

तोफा डाग अशा बुलंद घोषणा देत आम्ही आंबेडकरी विचार गावागावात पोहोचविला. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या पायातील गुलामीच्या शृंखला तोडल्या. आम्ही डॉ बाबसाहेब आंबेडकर आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांना मानणारे आहोत.छत्रपती शिवाजी महाराजांनी दलित मराठा मुस्लिम सर्व जातींच्या मावळ्यांना एकत्र करून स्वराज्य उभारले.  छत्रपती शिवाजी महाराजांनी मुघलांशी मुकाबला केला नसता तर इतिहास वेगळा झाला असता. मराठी मुलुखात मुघल असते आणि आज कदाचित राज ठाकरे सुद्धा मुस्लिम असते असे ना.रामदास आठवले म्हणाले.


                 

Post a Comment

Previous Post Next Post