हिंदू- मुस्लीम एकता वृद्धींगत व्हावी : डॉ.कुमार सप्तर्षी

 द्वेष वाढवून देश टिकणार नाही : डॉ.कुमार सप्तर्षी

'धर्म, अधर्म आणि धार्मिकता ' विषयावरील  परिसंवादाला प्रतिसाद

जमाते इस्लामी हिंद ,पुणे कडून ईद मिलन आणि  परिसंवादाचे आयोजन.


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : जमाते इस्लामी हिंद ,पुणे या संघटनेकडून शनिवारी ईद मिलन कार्यक्रम आणि 'धर्म, अधर्म आणि धार्मिकता ' या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. या परिसंवादाला चांगला प्रतिसाद मिळाला.शनिवार, दिनांक २१ मे २०२२ रोजी सायंकाळी सहा वाजता हा कार्यक्रम गांधी भवन, कोथरूड येथे झाला. 

युवक क्रांती दल आणि महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष  डॉ. कुमार सप्तर्षी, ख्रिश्चन धर्मगुरू रेव्हरंड चित्रलेखा जेम्स आणि जमाते इस्लामी हिंदचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष तौफीक अस्लम खान हे या परिसंवादात सहभागी झाले.

डॉ.कुमार सप्तर्षी म्हणाले, ' धर्माच्या नावाखाली वाह्यात गोष्टी सांगीतल्या जातात, त्यामुळे धर्म लांब जातो. माणसाला जोडतो, तो धर्म, आणि माणसाला माणसापासून तोडतो, तो अधर्म होय. भारताच्या भूमीत बंधूभाव आहे. सर्व धर्मात सच्चाई आहे, त्यामुळे धर्मांतराची गरज नाही.

सर्व धर्मातील चांगल्या कल्पना आपण भारतीयांनी स्वीकारल्या पाहिजेत. भोंग्यावरुन वाद घालणे हा वाह्यातपणा आहे, जणू इतर सर्व प्रश्न संपले आहेत. हिंदू - मुस्लीम एकता होणे गरजेचे असून त्यासाठी त्यांना एकत्र आणणारे कार्यक्रम झाले पाहिजेत. द्वेष वाढवून देश टिकणार नाही.

तौफीक अस्लम खान म्हणाले, ' जोपर्यंत शिक्षण होत नाही, तोपर्यंत प्रगती, जागृती होणार नाही. सर्व धर्मांची माहिती होण्यासाठी भेटीगाठी होत राहिल्या पाहिजेत.देशात द्वेष भरला जात आहे. देशच नव्हे तर जग आपले मानले पाहिजे. भारतातील विविधता हीच मोठी शक्ती आहे.

चित्रलेखा जेम्स म्हणाल्या, ' शाश्वत जीवन जगायचे असेल इतरांचा कळवळा आला पाहिजे.ज्याला इतरांचा कळवळा येणार नाही, त्याला धर्म कळणार नाही. देवावर आपण जेवढे प्रेम करतो, तेवढे शेजाऱ्यांवर केले पाहिजे.येशू ख्रिस्ताने संवेदनशीलता, प्रेम शिकवले.वाचनातून परिवर्तन होते, त्यामुळे वाचन करीत राहिले पाहिजे. भारतातील आजच्या परिस्थितीत धार्मिकतेचा अर्थ परिपूर्ण न्याय हा असला पाहिजे.डॉ. भागवत गुरुजी यांच्यासह मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.परिसंवाद झाल्यानंतर शिरखुर्म्याचा आस्वाद घेवून कार्यक्रमाचा समारोप झाला. करीमुद्दीन शेख यांनी आभार मानले


Post a Comment

Previous Post Next Post