सॅलीसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या लढाईचे कौतुक


पुणे मनपात आपचे नगरसेवक निवडून आल्यानंतर नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या नावाचे बोर्ड सार्वजनिक वास्तू अथवा ठिकाणाला लावणार नाहीत. आम आदमी पक्षाची ग्वाही...

इतर राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी : विजय कुंभार, आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष

प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुण्यातील सॅलीसबरी पार्क येथील मोकळी जागा वाचावी आणि त्या ठिकाणी गार्डन व्हावे यासाठी सॅलीसबरी पार्क रेसिडेंट फोरम गेल्या अनेक वर्षापासून लढा लढत आहे. या लढ्याला यश आल्यानंतर त्या पार्कला भारतीय जनता पक्षाचे गटनेते श्रीनाथ भिमाले यांच्या वडिलांच्या नावाचा बोर्ड रातोरात बसवण्यात आल्याने नागरिकांमध्ये प्रचंड असंतोष निर्माण झाला आहे. या विरोधामध्ये सॅलीसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या नेतृत्वाखाली अनेक नागरिक एकत्र येऊन जवळजवळ गेली दोन महिने लढा देत आहेत. भिमाले यांच्या वडिलांच्या नावाचा बोर्ड सार्वजनिक पार्कला देण्याचे कोणतेही औचित्य नसताना देखील हा प्रकार करण्यात आला आणि त्याचे समर्थन देखील भारतीय जनता पक्षाचे नगरसेवक करताना दिसून आले आहे. 

पुण्यामध्ये आपण बघतो की, नगरसेवकांचे कोणतेही कर्तृत्व नसताना, संकल्पनेचा अर्थ देखील नगरसेवकांना माहित नसताना संकल्पनेच्या नावाखाली नगरसेवकांचे बोर्ड अनेक ठिकाणी लावण्यात येतात. पैसे पुणेकर जनतेचे, बिल्डिंग अथवा ठिकाण पुणेकरांच्या मालकीचे आणि संकल्पनेचे बोर्ड मात्र नगरसेवकांचे ? हे कमी आहे म्हणून की काय नगरसेवकांच्या नातेवाइकांचे बोर्ड सुद्धा आता बागांसारख्या सार्वजनिक ठिकाणाला लावण्यात येत आहेत. त्यासाठी नागरिकांनी दोन महिने संघर्ष करुन देखील प्रशासन ढीम्म आहे. हा प्रकार अत्यंत चुकीचा असून या प्रकाराविरुद्ध लढणाऱ्या सॅलीसबरी पार्क रेसिडेंट फोरमच्या लढाईचे कौतुक आम आदमी पक्ष करत आहे. पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांनी याची दखल घेऊन हा बोर्ड उतरवण्याची कारवाई करावी अशी मागणी आम आदमी पक्ष करत आहे.


याप्रकरणी सॅलीसबरी पार्क रेसिडेंट फोरमचे शिष्टमंडळ नुकतेच विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यानंतर भाजपच्या कार्यकर्त्यांनी स्व. यशवंतराव भिमाले या उद्यानाच्या नावाच्या समर्थनार्थ आंदोलन केले आणि ते नागरिकांचे आंदोलन असल्याचा आव आणला. 

आता या प्रश्नावर सर्व राजकीय पक्षांनी आपापली भूमिका स्पष्ट करण्याची वेळ आली आहे. पुणे मनपात आम आदमी पक्षाचे नगरसेवक निवडून आल्यानंतर नगरसेवकांच्या नातेवाईकांच्या नावाचे बोर्ड सार्वजनिक वास्तू अथवा ठिकाणाला लावणार नाहीत, अशी ग्वाही आम आदमी पक्ष देत आहे. पुण्यातील इतर राजकीय पक्षांनी त्यांची भूमिका स्पष्ट करावी  अशी मागणी श्री विजय कुंभार (9923299199), आप राज्य संघटक व पुणे शहर कार्याध्यक्ष यांनी आज प्रसिद्धी पत्रकाद्वारे केली आहे.*



Post a Comment

Previous Post Next Post