पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून आज डीपी रोडवर कडक कारवाई करण्यात आली



प्रेस मीडिया लाईव्ह :

जिलानी उर्फ मुन्ना शेख :

पुणे मनपाच्या अतिक्रमण विभागाकडून आज डीपी रोडवर कडक कारवाई करण्यात आली आहे.डीपी रोड म्हटला की मोठमोठ्या हॉटेल्स, मंगल कार्यालये  पुणेकरांच्या डोळ्यांसमोर उभे राहतात. पण त्यातील अनेक हॉटेल्स आणि मंगल कार्यालये ही सरकारी जागेवर अतिक्रमण करुन बांधण्यात आली होती, अशी धक्कादायक माहिती आज समोर येत आहे. या हॉटेल आणि मंगल कार्यालयांनी अनेक वर्षांपूर्वी जागेवर ताबा मिळवून अतिक्रमण केलं होतं, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून अतिक्रमण झालेल्या या जागेवर आता पुणे महापालिकेकडून कडक कारवाई करण्यात येत आहे.


या कारवाईला आजपासून सुरुवात झाली आहे. या कारवाईत आज डीपी रोडवरील राजाराम पूल ते म्हात्रे पूलपर्यंतचे सर्व हॉटेल्स आणि मंगल कार्यालये पुणे महानगरपालिकेकडून जमीनदोस्त करण्यात आले आहेत. पुणे महापालिकेकडून अतिक्रमण विरोधातील ही कारवाई आजपासून जास्त कडक करण्यात आली आहे. पुण्यात रहदारीच्या असलेल्या डीपी रस्त्यावर आज पालिकेचा हातोडा पडला आहे.



डीपी रस्त्यावर 80 ते 100 हॉटेल्स, रेस्टॉरंट, लॉन्स आणि मंगल कार्यालयं आहेत. हे सर्व अतिक्रमण असल्याचा प्रशासनाचा दावा आहे. त्यामुळे पुणे महापालिकेने आज डीपी रोडवर अतिक्रमण विरोधातील कारवाई सुरु केली आहे. डीपी रोडवर नेहमी नागरिकांच प्रचंड वर्दळ असते.

बरेच नागरीक रात्रीच्यावेळी त्यांच्या कुटुंबासह या रोडवर असणाऱ्या विविध हॉटेल्समध्ये जेवणासाठी येतात. दरम्यान, पुणे महापालिकेची अतिक्रमणाची टीम आज सकाळपासून डीपी रोडवर आलेली आहे. या टीमकडून सलग कारवाई सुरुच होती. या टीमने राजाराम पूल ते म्हात्रे पूल पर्यंतची सर्व हॉटेल्स आणि मंगल कार्यालये पुणे महानगरपालिकेकडून जमीनदोस्त केली आहेत. कारवाईला कोणी विरोध करु नये यासाठी पोलीस यंत्रणादेखील सज्ज होती. डीपी रोडवर पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला होता.

ज्या हॉटेल्स होत्या त्या जमीनदोस्त करण्यात आल्यानंतर तिथल्या व्यवस्थापकांनी आपल्याला कारवाई करणार असल्याची माहिती अवघ्या 24 तासांपूर्वीच देण्यात आली होती, असा दावा केला आहे. आपल्याला एकदिवसआधी नोटीस आली होती. त्यामध्ये 24 तासात जागा खाली करा नाहीतर कारवाई होईल, असा इशारा देण्यात आला होता, अशी माहिती स्थानिकांनी दिली. दरम्यान, महापालिकेकडून आज कारवाई करण्यात येत असताना बघ्यांची मोठी गर्दी परिसरात बघायला मिळाली.

Post a Comment

Previous Post Next Post